‘जय संतोषी माँ’ पिक्चरला जाताना लोक मंदिरात जावं अश्या श्रद्धेने हार, फुले, उदबत्ती घेऊन जायचे

अनपेक्षितरित्या दणकून चाललेले चित्रपट हा एक प्रकार सिनेमाच्या दुनियेत दिसून येतो. काहीही अपेक्षा नसताना एखादा चित्रपट निर्मिला जातो; यशाची अजिबात खात्री नसते. सिनेमाचा खर्च देखील बेतास बात असतो. सिनेमात कोणतीही बडी स्टार कास्ट नसते. गीतकार, संगीतकार, गायक हे सर्व लो प्रोफाईलचे असते.

एवढेच काय वितरक सिनेमाला हात लावायला तयार नसतात. अशा सर्व नकारात्मक बाजू असताना हाच सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जर धो धो गर्दीने सुपरहिट होत असेल तर? असाच अनुभव १९७५ साली ’जय संतोषी मॉं’ या धार्मिक सिनेमाच्या वेळी आला.

या सिनेमाने या शतकातील महान चित्रपट ’शोले’ला टक्कर देत अफाट यश मिळविले. त्या वर्षी ’शोले’ सोबतच ’दिवार’, ’दस नंबरी’, ’प्रतिज्ञा’, जूली, आंधी, चुपके चुपके, संन्यासी हे सिनेमे प्रदर्शित तर झालेच होते शिवाय मा. भगवानचा १९५२ सालचा म्युझिकल हिट ’अलबेला’हा सिनेमा देखील रणजित बुधकरांनी पुन्हा प्रदर्शित केला होता.

या सार्‍या वलयांकीत सिनेमापुढे ’जय संतोषी मां’ म्हणजे ’निर्बल से लडाई बलवान की’ असाच सामना होता. पण या सिनेमाच्या भविष्यात यशाचा योग होता आणि ते त्याने मिळवलेच. या सिनेमाचा झंझावात एवढा होता की देशातल्या १०४ थिएटर मध्ये हा सिनेमा एकाच वेळी चालू होता.

देशातील जनता वेडी झाली होती ते मंदीरात जातात त्याच श्रध्देने सिनेमा बघायला जात.

सोबत हार, फुले, उदबत्ती, पेढे घेवून जात. गाणी सुरू झाल्यावर मोठ्या भक्ती भावाने नृत्य करीत; पडद्यावर पैशाचा पाऊस पडे. आजच्या पिढीला कदाचित हे मोठे काल्पनिक व अतिरंजित वाटेल पण हि वस्तुस्थिती होती.त्या काळात सिनेमागृह अक्षरशः मंदीर झाले होते.

या सिनेमाच्या मेकींगची कहाणी रंजक आहे. सिनेमाचे निर्माते सतराम रोहरा यांनी संजीवकुमारला घेवून ’रॉकी मेरा नाम’ (१९७३) हा सिनेमा बनविला होता पण सिनेमा फ्लॉप झाल्याने ते आथिक संकटात सापडले. त्यांच्या एका ओळखीच्या स्त्रीने संतोषीमातेवर सिनेमा काढावयास सांगितले व त्या साठी अर्थ सहाय्याची तयारी दाखवली.

पं. प्रियदर्शी हे धार्मिक कथांकरीता प्रसिध्द होते. त्यांच्याकडे कथा पटकथेची जवाबदारी दिली. दिग्दर्शक म्हणून विजय शर्मा यांना घेतले. त्यांच्या नावावर तोवर एकही यशस्वी सिनेमा नव्हता.

सिनेमाचे बजेट नाममात्र असल्याने कानन कौशल,आशिशकुमार अशा बी ग्रेडच्या कलाकारांना निवडले. संगीत सी अर्जुन यांच्याकडे दिले तर गीत लेखनाची जवाबदारी राष्ट्रीय कवी प्रदीप यांच्यावर सोपवली.अनेक अडथळ्यांची शर्यत करत करत सिनेमा एकदाचा पूर्ण झाला. पण कुणीही वितरक त्याच्याकडे ढूंकुनही पहायला तयार नव्हता.पण चमत्कार घडला.

३० मे १९७५ ला मुंबईच्या अलंकार चित्रपट गृहात ’जय संतोषी मॉं’ प्रायोगिक तत्वावर प्रदर्शित झाला.

आणि मौखिक प्रचाराने हा हा म्हणता प्रचंड गर्दी खेचू लागला. हे सारे अनपेक्षित होते. प्रेक्षकांची गर्दी हटायला तयार नव्हती.निर्मात्याने अधिकच्या प्रिंटस काढून देशभर सिनेमा प्रदर्शित केला. धार्मिक सिनेमा असल्याने अनेक कथा, दंतकथांनी जन्म घेतला व सिनेमाला लोक पुन्हा पुन्हा येवू लागले.

उषा मंगेशकरने गायलेल्या ’मैं तो आरती उतारू रे’या गाण्याने कहर केला. अनिता गुहा व भारतभूषण या अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या कलावंताचा पुन्हा उदय झाला. या सिनेमाने सामाजिक वातावरण बदलून गेले. संतोषी माताच्या मंदीराची संख्या वाढली. प्रेक्षक आता प्रेक्षक राहिले नाहीत ते संतोषी मातेचे भक्त बनले. एच एम व्ही ने मोठ्या दिमाखात गाण्यांची एल पी रीलीज केली.

’करती हूं तुम्हारा वृत मै स्वीकार करो मां’,’यहां वहां जहां कहां मत पूछो कहां कहां’,’मदत करो संतोषी माता’ हि घराघरात पोचली. गरबा देशपातळीवर पोचला. या सिनेमाच्या यशाच्या धास्तीने काही सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलले. हा मोठा करीष्मा होता.

देशातील तो काळ आणीबाणीचा होता. ’शोले’ आणि ’जय संतोषी मां’ हे दोन वेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी सारखेच यश मिळविले. पण आज चाळीस वर्षानंतर शोले जितका आठवला जातो तितका संतोषी माता आठवला जातो का तर याचे उत्तर नाही हेच आहे!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.