पक्षात घेताना घ्यायची काळजी…
नुकतच अजितदादांनी बारामतीच्या सभेत, “धनंजयला राजकारणाची अंडी पिल्ली माहिती नाहीत.” अशी सिंहगर्जना केली. तुम्हाला माहितच आहे दादांचा शब्द म्हणजे अंतिम असतो. त्यावर चार पाच वर्ष तरी राडे होतात. त्यांच्या शब्दांना इतकी किंमत आहे की ते माघारी घ्यायचे झाले तर खुद्द त्यांनाच आत्मक्लेश करावा लागतो. तर अशा या शब्दसम्राट अजितदादांनी धनंजय मुंडेना सांगितल होतं, तुला पक्षातली अंडी पिल्ली माहिती नाहीत. याच अंडीपिल्लांमधलं एक अंड म्हणजे पक्षांतर. नुकत्याच झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू पक्षांतर करुन घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते.
१) प्रामाणिकपणा –
राजकारण आणि प्रामाणिकपणा या गोष्टींचा तसा दूरदूरचा संबध नाही. मात्र राजकारणात प्रामाणिकपणाचा उपयोग सबळ कारणासाठी देण्यात येतो. म्हणजे “मी आणि माझा प्रामाणिकपणा” या वाक्याचा उपयोग करुन राजकारणात खेळलेले डाव मागे घेता येतात. परिणामी आपण खूपच जवळचा निष्ठावंत फोडतोय म्हणून खूश होवू नये. हे निष्ठावंत त्यांच्या प्रामाणिकपणाचा डाव खेळून पुन्हा माघारी जावू शकतात.
२) उपयोगीता मुल्य –
आपण जो व्यक्ती पक्षात घेतोय त्याच उपयोगीतामुल्य नेमकं काय हे शंभर पानी दुरेघी वहिवर लिहून काढावे. नेमका या व्यक्तीचा समावेश आपण कोठे करणार आहोत हे पुन्हा पुन्हा पडताळून घ्यावं. पुर्वीच्या पक्षात असणारं त्याचं स्थान व नविन पक्षात त्यांना मिळणार स्थान यामध्ये जास्तित जास्त एका टप्याचा फरक असावा. क्रमांक तीन वरती येणारा डाव आपण उत्तम खेळला असला तर तुम्ही हे स्थान कमी करण्याची रिस्क घेवू शकता. पण त्यासाठी वरिष्ठाची मर्जी आणि हुकूमशाही आवश्यक असते याचं पुरेसं भान असू द्यावं.
३) परतीचे मार्ग बंद करण्याबाबत पुरेसी दक्षता –
अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर राणेचं कस केलं तसच करायचं. कधी कधी ये रे माझ्या मागल्या म्हणत जूना पक्ष नव्याने बोलवण्याची शक्यता निर्माण होवू शकते. म्हणूनच पक्षांतर केलेला हक्काचा माणूस मागे फिरणार नाही यासाठी मागचे दोर कापणं आवश्यक असत. यासाठी पुरेसा वेळ देणं, वातावरण निर्माती करणं आणि पक्षातल्याच लोकांवर टिका करायला लावणं यांसारखे डाव खेळावे लागतात. लक्षात ठेवा पक्षांतराच स्पीड जितकं जास्त तितका मागे फिरण्याचा धोका अधिक.
४) अंतर्गत राजकारण कळु न देणं –
आतल्या गोष्टी नविन पाहूण्याला न सांगण. पक्षांतर करुन आलेला पाहूणा हा पक्षाचे अंदाज घेत असतो. कोणता गट सक्रिय आहे. कोणाचं ऐकलं जातं. वरिष्ठ कोणाचा निर्णय अंतिम मानतात. तुमच्याकडे नेमका कोठून फंड येतो, अशा प्रश्नांचं त्याला कुतूहल असतं. किमान पाच वर्ष त्या व्यक्तीचं कुतूहल तसच ठेवणं गरजेचं असतं अन्यथा ती व्यक्ती कुतूहल संपल की पक्षात राडे करण्याची शक्यता असते.
५) पुरेशा टिका करायला लावणे –
“तू बोल भिडू बोल” म्हणून पक्षांतरापुर्वी वातावरण निर्मीती करणं आवश्यक असावं. जर अस वातावरण निर्मीत करण्यास आपण अयशस्वी ठरलात, तर पक्षांतर करणाऱ्या व्यक्तीस “हे सगळं आपण का करतोय. राहूदे पक्षांतर” म्हणून निराशा येण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपण त्याचं राजकिय वजन वाढवण्याचा प्रयत्न पक्षात राहून करण्यास भाग पाडावं. उदाहरणार्थ नाना पटोले. पक्षातीलच लोकं, यांना काढा रे बाहेर म्हणतं आवाज देवू लागले की आपला कार्यभाग साधला अस समजून जावं.
अजूनही सल्ले असतील. असायलाच हवेत. राजकारण थोडीच गुगलवर सर्च करायची गोष्ट आहे. आपण एक काम करु शकतो अजून काही सल्ले असतील तर कमेंटमध्ये लिहू शकतो.
सुविचार – घटस्फोटाच्या अनेक कारणांपैकी कंटेन्ट कॉपी पेस्ट करणं हे देखील एक कारण म्हणून नमुद करण्यात आलं आहे.
हे ही वाचा राजकारण करायचं असेल तर महत्वाचं आहे.
सतत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आयाराम ; गयाराम का म्हणतात ?