गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री घरात बसून राहिले तर फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढला..

काळ कठीण असला, संकटाचा असला तर अशा संकटाच्या काळात अशा कठीण परिस्थितीत जो खंबीरपणे लोकांच्या पाठीमागे उभा राहतो तोच नेतृत्व करण्यास सक्षम असतो. राज्याचे नेतृत्व सध्या उद्धव ठाकरे करत आहेत तर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी संभाळत आहेत.

दूसरीकडे कोरोनासारख्या रोगाने थैमान मांडल आहे. अशा काळात हे नेते काय करत आहेत. यांनी काय केलं हे आपण विचारायला हवं. जितकी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची तितकीच विरोधी पक्षनेत्यांची देखील.

यासाठी आपण एक साधं परिमाण लावू ते म्हणजे प्रत्यक्ष रणांगणावर हे दोन्ही नेते कितीवेळा गेले. लोकांना संकटाच्या काळात किती धीर दिला.

त्यासाठी आपण पहिल्यांदा उद्धव ठाकरे कोरोना आल्यापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून ते एप्रिल २०२१ या एका वर्षात कितीवेळा घराबाहेर पडले ते पाहू.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  – एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१

उद्धव ठाकरे यांच्या ऑफिसच्या @OfficeofUT या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, 

उद्धव ठाकरे एप्रिल आणि मे २०२० मध्ये बाहेर पडले नव्हते. याकाळात त्यांच्या सर्व बैठका आणि चर्चा ऑनलाईनच झाल्या होत्या. याच काळात त्यांच्यावर घराबाहेर पडत नसल्याची टीका होत होती.

त्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले ते ५ जून २०२० रोजी. एप्रिल आणि मे महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन होता. कामगार व मजूरांच्या जेवणाची बिकट अवस्था होती. मात्र उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले ते देखील काही तासांकरताच. त्यावेळी ते काही तासांकरिता निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात आले होते. मुंबईवरून रोरो बोटीने ते अलिबागला आले होते. त्यानंतर लगेचच परत जावून त्यांनी मुंबईत बैठक घेतली.

मुख्यमंत्री ठाकरे दुसऱ्यांदा बाहेर पडले ते आषाढी एकादशीवेळी. ३० जून रोजी ते मुंबईवरून स्वतः गाडी चालवत विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला आले होते.

जुलै : २०२० 

१६ जुलै रोजी उद्धव ठाकरे हे मुंबईमधील फोर्ट येथील मिंट रोडवरील भानुशाली इमारती पडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी पोहचले होते. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता.

३० जुलै रोजी मुख्यमंत्री ठाकरे पुण्यातील आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. कोरोनाकाळातील हा त्यांचा पहिलाच पुणे दौरा होता.

त्यावेळी पुणे जिल्ह्यात जवळपास ८० हजार कोरोनाचे रुग्ण होते. या बैठकीत पुण्यात देखील मुंबईच्या धर्तीवर जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुण्याची परिस्थिती अत्यंत बिकट होती. अशा वेळी होणारी टिका वाचवण्यासाठी मुख्यमंत्री घराबाहेर पडले होते.

ऑगस्ट : २०२०

पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी २४ ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेत जाऊन तिथल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यावर भर असला तरी गाफील न राहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सप्टेंबर २०२० मध्ये उद्धव ठाकरे कुठेही बाहेर पडल्याचा उल्लेख आढळत नाही.  

ऑक्टोबर : २०२० 

१९ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे त्यावेळी झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी सांगावी, अक्कलकोट या भागाला भेट देऊन आर्थिक मदत देखील देऊ केली होती. त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री दत्तामामा भरणे देखील होते.

नोव्हेंबर २०२० मध्ये उद्धव ठाकरे कुठेही बाहेर पडल्याचा उल्लेख आढळत नाही.  

डिसेंबर : २०२० 

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे ५ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी बहुचर्चित दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद आणि अमरावती इथं दौरा केला होता. यावेळी त्यांनी १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम पूर्ण करून तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला होईल अशी घोषणा केली होती.

१० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

१२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या ‘पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं होतं होतं. तसंच स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, सफारी पार्क आणि शहरातील १५२ कोटींच्या रस्त्यांच्या कामांच भूमिपूजन करण्यात आलं होतं.

जानेवारी : २०२१ 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नववर्षातील पहिला दौरा विदर्भातील होता. ८ जानेवारी रोजी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी अपूर्ण जलसिंचन आणि भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचा आढावा घेतला होता.

त्यानंतर १० रोजी उद्धव ठाकरे पुन्हा भंडाऱ्यामध्ये आले होते. त्यादिवशी भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची पाहणी केली. तसेच या दुर्घटनेतील एका दुर्दैवी कुटुंबाची प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती.

१६ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे मुंबईतील बीकेसीमध्ये पोहचले होते. त्यादिवशी त्यांनी इथल्या कोरोना लसीकरण केंद्राच आणि राज्यातील लसीकरण मोहिमेच उदघाटन केलं होत.

२२ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी पुण्याला भेट दिली होती. कोरोना लस बनवणाऱ्या पुणे स्थित सिरम इन्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीनंतर त्यांनी या परिस्थितीचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला होता.

२५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कल्याण डोंबविलीमधील स्मार्ट सिटी प्रकल्पनांतर्गत काही प्रकल्पांचं उदघाटन आणि पत्री पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता.

२६ जानेवारी रोजी शासकीय ध्वजवंदनानंतर उद्धव ठाकरे नागपूरमध्ये जाऊन स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच उदघाटन केलं होतं.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईमध्येच २८ ते ३१ असे सलग चार दिवस अनुक्रमे महानगरपालिकेच्या हेरिटेज वॉक उपक्रमाचं उदघाटन, चारकोप मेट्रो अनावरण समारंभ, दैनिक सकाळ वृत्तपत्राचा सकाळ सन्मान २०२१, आणि व्हेंटीज कार उदघाटन असे विविध कार्यक्रम पार पडले होते.

फेब्रुवारी : २०२१ 

३ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी नरिमन पॉईंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी संपादक गिरीश कुबेर यांना मुलाखत देखील दिली होती.

५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरला भेट दिली होती. त्यानंतर औरंगाबाद येथे भेट देऊन जिल्हा क्रीडा संकुलाचा भूमिपुजन केलं होत.

१२ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याला भेट देऊन जव्हार, मोखाडा, धापरपाडा भागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला होता.

१९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील मंत्री देखील उपस्थित होते.

मार्च : २०२१ 

१९ मार्च रोजी उद्धव ठाकरे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नाशिकमधील ओझरहून सुरुवात करून तिथून ते नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगावला पोहोचले. याठिकाणी त्यांनी लसीकरण मोहीम आढावा आणि आरोग्य केंद्रांची पाहणी केली होती.

२० मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरण निर्मितीसाठी मुंबईमधील हापकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. यावेळी त्यांनी इथल्या प्रयोगशाळेची पाहणी केली होती.

त्यानंतर २६ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी भांडुप मधील मॉलमध्ये असलेल्या कोरोनाच्या उपचारातील सनराईज हॉस्पिटल आग दुर्घटनेची घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच ५ लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली होती.

३१ मार्च रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं भूमिपूजन समारंभ उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती होती.

एप्रिल : २०२१ 

१४ एप्रिल २०२१ रोजी उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीमध्ये जाऊन त्यांना अभिवादन केले होते.

त्यानंतर राज्यात कोरोनाच्या संख्या वाढत असल्यानं पुन्हा लॉकडाऊन लावला गेला आहे. त्यामुळे अद्याप उद्धव ठाकरे बाहेर पडलेले नाहीत.

एकूण आकडेवारीत सांगायचं तर मुंबई, औरंगाबाद, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, पालघर, बुलढाणा, अमरावती अशा निवडक जिल्ह्यांना ते भेटी देत गेले.  एकूण २९ वेळा ते मुंबईच्या बाहेर पडल्याचं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून दिसत. मात्र यातील अनेक दौरे हे राज्याचं संकट कमी झालेलं असताना म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेलं दिसून येतं.  

 

देवेंद्र फडणवीस (एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१) 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊन काहीस शिथिल करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली. त्यापूर्वी ते ऑनलाईन बैठक, ऑनलाईन आढावा, ऑनलाईन रुग्णांशी चर्चा सुरु होते.

२८ एप्रिल रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळान राज्यपाल भगतसिंग कोशयरी यांची भेट घेत राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचं म्हंटलं होतं. त्यावेळी ABP माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर अर्णब गोस्वामी यांना १२ तास चौकशीसाठी बोलावून घेतलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मे : २०२०

त्यानंतर ६ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज,  जीटी आणि नायर रुग्णालयांना भेटी देऊन त्यांची भेट घेतली होती. तिथं उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी यांची विचारपूस केली होती.

७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीला ते उपस्थित होते. इथं त्यांनी सरकारनं आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं.

११ मे रोजी कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांनी २६/११ हल्ल्यातील मुख्य साक्षीदार हरिशश्चंद्र श्रीवर्धनकर यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. तसेच त्यांच्या उपचाराचा १० लाख खर्च भाजपकडून करण्यात येणार असल्याचं सांगितलं होत.

१४ मे रोजी फडणवीस यांनी नागपूरमधील  मेडिकल रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या कोरोना व्यवस्थेंचा आणि नव्यानं बांधण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा आढावा घेतला होता. त्याचदिवशी त्यांनी शहरात पक्षाकडून सुरु असलेल्या विविध सेवाकार्यांचा आढावा घेतला होता.

१९ मे रोजी देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेत केंद्राप्रमाणे राज्य सरकारनं देखील कोरोना संकटामुळे अडचणीत आलेले शेतकरी, मजूर आणि छोटे व्यावसायीक यांना पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती.

२२ मे रोजी फडणवीसांनी महाराष्ट्र सरकारविरोधात ‘महाराष्ट्र बचाओची मागणी करत आंदोलन केलं होत. यात राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचं म्हणत ५० हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली होती.

जून : २०२०

जूनच्या सुरुवातीला फडणवीसांनी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं मुंबईत ससुरु असलेल्या आदिवासी आंदोलन पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थिती लावली होती.

त्यानंतर त्याच दिवशी त्यांनी गोरेगावमधल्या नेस्को कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी वरील इतके दौरै आखले होते तोपर्यन्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नव्हते.

८ जून रोजी भाजपकडून कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीसाठी पाठवण्यात येणाऱ्या १४ ट्रकच्या रवानगीसाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.

त्यानंतर १० आणि ११ तारखेला फडणवीस स्वतः निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीवर्धन, मुरुड या भागाच्या पहाणी दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी शासनाने पाठवलेली मदत पुरेशी आहे का याचा देखील आढावा घेतला होता.

१२ तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी निसर्ग वादळातील मदतीनिम्मित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट यांची भेट घेतली होती.

त्यानंतर २३ जून रोजी ते पक्षाच्या सभेसाठी पुण्यामध्ये आले होते.

२८ जून रोजी देवेंद्र फडणवीस विदर्भांच्या दौऱ्यावर होते. इथं त्यांनी अकोला, अमरावती मधल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत इथल्या कोरोना केअर सेंटरला भेट देखील दिली होती. विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देखील दिल्या. त्याच दिवशी त्यांनी चांदुर बाजारमधील शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

जुलै : २०२०

४ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस पनवेल आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. या भागातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावर इथल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी हॉस्पिटल आणि सेंटर्सना भेटी दिल्या होत्या. तसेच महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती.

५ जुलै रोजी फडणवीस भिवंडीच्या दौऱ्यावर होते. इथं देखील महानगपालिकेत भेट देत इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता.

६ जुलै रोजी ते कल्याणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी संपूर्ण MMR क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता.

७ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता.

८ जुलै रोजी फडणवीसब नाशिक जिल्हयाच्या पाहणी दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी इथल्या कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासह खाजगी रुग्णालयांच्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता, अंडी प्रशासनाला काही सूचना देखील केल्या होत्या.

९ जुलै रोजी फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इथं त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत जामनेरसह जळगावमधील कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली होती.

१० जुलै रोजी देवेंद्र फडणवीस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इथं त्यांनी घाटी रुग्णालयाला भेट देत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच जिल्ह्यातील इतर भागातील देखील माहिती घेतली होती.

१६ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते. इथं त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने यांच्यासाठी पॅकेजची मागणी केली होती. तसेच साखरेला किमान हमीभाव मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती.

२८ तारखेला देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात कामकाज सल्लागार समितीसोबत बैठक पार पडली होती.

ऑगस्ट : २०२०

१० ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्गमध्ये होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत पडवे मधील लाइफटाईम हॉस्पिटलमधील लॅबच उदघाटन करत त्याच लोकार्पण केलं होत.

त्याचं दिवशी परत जाताना त्यांनी गोव्यामध्ये जातं तिथले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती.

१५ ऑगस्ट दिवशी फडणवीस पुण्यात होते. त्यादिवशी त्यांनी पुणे महापालिका, रा. स्व. संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरचा शुभारंभ केला होता.

तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्टरोजी फडणवीस नागपूरमध्ये होते. त्यादिवशी त्यांनी नागपूरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच टेस्टिंग वाढविण्या संदर्भांत प्रशासनाला सूचना केल्या होत्या.

१९ तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या परिस्थितीच्या आढाव्यासाठी वर्ध्याला भेट दिली होती. इथं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला होता.

त्याच दिवशी त्यांनी यवतमाळ जिल्हयाला भेट दिली होती. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देत डॉक्टर आणि परिचारिकांची विचारपूस केली होती.

२१ तारखेला फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्याला भेट देऊन बैठक घेत इथल्या कोरोना सेंटरची पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती.

२३ तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पार पडलेल्या एका शैक्षणिक कार्यकमात उपस्थिती दर्शवली होती.

२८ आणि २९ ऑगस्ट रोजी  देवेंद्र फडणविस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कराड, इस्लामपूर, सांगली, मिरज, कोल्हापूर, भुईंज, सातारा, पुणे या शहरांना भेट देऊन दोन दिवसांमध्ये पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता.

सप्टेंबर : २०२०

२ सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ५ जिल्ह्यांमधील पूरग्रस्त परिस्थितीचा ब्रम्हपुरी तालुक्याला भेट देत पाहणी दौरा केला होता.

त्यानंतर ७ सप्टेंबरपासून ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईमध्ये होते.

१७ सप्टेंबर रोजी फडणवीसांनी कोरोना परिस्थिती संदर्भांत सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यात नागपूर, मुंबई, पुणे या शहरातील परिस्थितीचा प्रामुख्याने आढावा घेतला होता.

१८ सप्टेंबर रोजी भाजपच्या व्हर्चूएल रॅली साठी ते मुंबईत होते.

२२ सप्टेंबर रोजी फडणवीस यांनी नागपूर शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी महानगपालिका पदाधिकाऱ्यांना जम्बो रुग्णालयांपेक्षा छोट्या रुग्णालयांवर भर देण्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची बिहार प्रभारी पदी नियुक्ती झाली आणि त्यांचा ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपातील बैठका सुरु झाल्या होत्या. या दरम्यान त्यांचा २८ सप्टेंबर रोजी बिहार दौरा देखील झाला होता.

ऑक्टोंबर : २०२०

५ ऑक्टोंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंबंधी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजपअध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती.

७ ऑक्टोंबर रोजी ते पुन्हा बिहार दौऱयावर गेले होते.

८ ऑक्टोंबर रोजी देवेंद्र फडणवीस मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारणीच्या बैठकीत हजर होते.

यानंतर १० ऑक्टोंबरच्या दरम्यान फडणवीस यांनी अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावले. केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीत फडणवीस यांच्यासोबत जे.पी. नड्डा, राजनाथ सिंग, शहानवाज हुसैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतरच्या दरम्यान फडणवीस यांचा बिहार दौरा सुरू झाला.

१३ ऑक्टोंबरच्या दरम्यान फडणवीस प्रवरानगरला होते. इथे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह भाजपचे मान्यवर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानिमित्त उपस्थित होते.

याच दरम्यान जामनेर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले.

१४ ऑक्टोंबरला फडणवीस बिहारमध्ये होते. मधुबनी येथून त्यांनी सभेत दमदार भाषण केले. दूसऱ्या दिवशी सितामढी येथे सभा घेण्यात आली. तुफान गर्दीत अनेकांच्या संपर्कात हा कार्यक्रम चालू होता. त्यानंतर १६ ऑक्टोंबरला गोरियाकोठी येथे सभा घेण्यात आली. १७ तारखेला मुंगेर येथे सभा घेण्यात आली. १८ तारखेला गया करुन फडणवीसांनी बिहारचा दौरा आटोपला.

राज्यात अतिवृष्टी झाल्याने ते राज्यात परतले.

१९ ऑक्टोंबर पासून त्यांनी आपला शेतकरी दौरा बारामती येथून सुरू केला. दौंड, इंदापूर, केतकी निमगाव असा दौरा आटपून फडणवीस सोलापूर जिल्ह्यात गेले. सोलापूर जिल्ह्यातून उस्मानाबाद असा दौरा होता.

यानंतर लातूर जिल्हा करून फडणवीस बीड जिल्हात आले. इथल्या कार्यक्रमता त्यांच्यासोबत पंकजा मुंडे देखील होत्या. याच दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यांचा देखील दौरा झाला. त्यानंतर औरंगाबादमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली. त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा आटपून

त्यानंतर फडणवीस पुन्हा बिहारला रवाना झाले.

साधारण २७ ऑक्टोबरत्यानंतर फडणवीस यांना कोरोना झाल्याची बातमी आली.

त्यानंतर फडणवीस पुढचे जवळपास २० ते २२ दिवस कुठे बाहेर गेल्याचं दिसून येत नाही.

नोव्हेंबर : २०२० 

१८ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला हजेरी लावली होती.

२० नोव्हेंबर रोजी त्यांनी नागपूर पदवीधर निवडणूक प्रचारासाठी नागपुरात पदवीधर मेळावा घेतला होता.

२३ नोव्हेंबर यादिवशी देवेंद्र फडणवीस औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या निम्मिताने प्रचारासाठी गेले होते.

२४ नोव्हेंबर रोजी फडणवीस विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये गेले होते.

२५ नोव्हेंबर रोजी फडणवीस पुणे येथे प्रचारासाठी आले होते.

या महिन्यात उद्धव ठाकरेंनी एकही दौरा आखला नव्हता, न की ते कुठे बाहेर पडले होते. 

डिसेंबर :  २०२० 

१ डिसेंबर रोजी फडणवीसांनी नागपूरमधील कामठी मध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २१ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

त्यानंतर ३ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये विधानभवनात पार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी उपस्थित होते.

१३ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकित देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली होती.

१४ डिसेंबर रोजी मुंबई मध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्या शोकसभेच आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस याठिकाणी हजर होते.

२८ डिसेंबर रोजी कृषी कायद्यानं समर्थन देण्यासाठी भाजप आणि रयत क्रांती संघटनेनं काढलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रा समारोपसाठी ते इस्लामपूरमध्ये होते.

जानेवारी : २०२१ 

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस पुणेमध्ये भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते, यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजर होते.

८ जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास योजनेच्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेतली होती.

१३ जानेवारी रोजी अ. भा. शिंपी समाजाच्या शिष्टमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी फडणवीस यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला

२२ जानेवारी रोजी फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांनी पुणेमध्ये भाजपाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीचे उदघाटन केले होते.

२५ जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दूध, धान उत्पादक आणि शेतकर्‍यांचे विविध प्रश्न इत्यादी मागण्यासंदर्भात भंडार्‍यात विशाल धडक मोर्चा काढण्यात आला होता.

फेब्रुवारी : २०२१ 

देवेंद्र फडणवीस २ फेब्रुवारी रोजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होते.

५ फेब्रुवारी त्यांच्या हस्ते मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्व.प्रमोद महाजन कलादालनचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता.

११ फेब्रुवारी रोजी देवेंद्र फडणवीसांनी पुणे महानगरपालिकेच्या विविध विकासकामंचा आढावा घेतला होता.  यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निम्मित फडणवीस नागपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले होते.

त्यानंतर २५ फेब्रुवारी मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली होती. यानंतर उन्हाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती.

मार्च : २०२१

१ ते १० मार्च या दरम्यान देवेंद्र फडणविस अधिवेशनासाठी मुंबईत होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटक पदार्थ आणि  मनसुख हिरेन यांचा सापडलेला मृतदेह यामुळे हे अधिवेशन चांगलंच गाजलं होत.

अधिवेशन संपल्यानंतर देवेंद्र फडणविस यांनी थेट ११ मार्च रोजी चंद्रपूर गाठलं होत. इथं त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त मूलमधील सभेत महादेवाचं दर्शन घेतलं होतं.

त्यानंतर १३ मार्च रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई इथं झालेल्या सभेत फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांची प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

१४ मार्च रोजी त्यांनी पुणेमध्ये एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या ४०० व्या प्रयोगाला भेट दिली होती.

१५ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस मुंबईमधील दिंडोशीमध्ये उत्तर भारतीय मोर्चा आयोजित १००० चौपाल कार्यक्रम उपस्थित होते.

१६ मार्च रोजी ते आसाम निवडणुकीच्या निम्मिताने प्रचारसभांसाठी गेले होते.

१७ मार्च या दिवशी त्यांनी पुन्हा साखर उद्योगासंबंधी राज्यातील विविध नेत्यांसोबत दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

त्यानंतर १९ मार्च मुंबईमध्ये येऊन फडणवीसांनी २० मार्च रोजी नागपूर मध्ये कोरोना आढावा बैठक घेतली होती.

२४ मार्च रोजी भाजपच्या चंद्रकांतदादा पाटील आणि इतर भाजपच्या नेत्यांसोबत राज्यातील विविध प्रश्न  कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेत राज्यपाल भगतसिंग कोशयरी यांची भेट घेतली होती.

२५ मार्च रोजी देवेंद्र फडणविस यांच्याहस्ते वडाळा भाजप आयोजित क्रिकेट स्पर्धेच उदघाटन केलं होत. याच ठिकाणी त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला इशारा दिला होता.

२६ मार्च रोजी देवेंद्र फडणविस आणि भाजपच्या इतर  नेत्यांनी भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटल आग दुर्घटनेची पाहणी केली होती.

त्यानंतर ते नागपूरला रवाना झाले होते. २८ मार्च रोजी त्यांनी नागपूरमध्ये महाश्रमन महाराज यांची भेट घेतली होती.

एप्रिल : २०२१ 

३ एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील मेडिकल रूग्णालयात जाऊन कोविडच्या स्थितीचा आढावा घेवून तिथल्या अधिष्ठात्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर संध्याकाळी मेयो रूग्णालयात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता.

त्याचदिवशी फडणवीसांनी नागपूरमध्ये फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये उपस्थित राहून आत्मनिर्भर भारतातील रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शन केलं होतं.

‬५ एप्रिल रोजी मुंबईमधील घाटकोपर भागात आमदार पराग शाह यांनी पुढाकार घेत सुरु केलेल्या कोविड सेंटरचा उदघाटनासाठी फडणवीस हजर होते.

त्यानंतर १२ एप्रिल रोजी दिवसभर फडणवीस पंढरपूर निवडणूकीच्या प्रचारदौऱ्यावर होते. तिथं त्यांनी मतदारसंघामध्ये दिवसभरात विविध ठिकाणी ६ सभा घेतल्या होत्या.

तीन दिवसानंतर म्हणजे १५ एप्रिल रोजी फडणवीस बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी गेले होते. भाजपच्या उमेदवार मंगला अंगाडी यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली होती.

१६ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना सेंटरचे उद्घाटन केलं होते.

१७ एप्रिल रोजी सकाळी नागपूरमधील मेयो आणि मेडिकल रुग्णालय इंदिरा गांधी रुग्णालयालयाला भेट देवून फडणवीसांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता.

सोबतचं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आणखी २०० खाटा वाढविण्यासंदर्भात नियोजन कसे करता येईल, याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर शहरातील सुभाष नगर लसीकरण केंद्राला भेट देत लसीकरणासंदर्भातुन माहिती घेतली होती.

१८ एप्रिलच्या रात्री दमनमधील ब्रुक फार्माच्या मालकाला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि इतर नेते बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहचले होते.

१९ एप्रिल रोजी फडणवीसांनी दक्षिण-पश्चिम नागपूर या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात सुमारे ६ लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी मतदारसंघातील नरेंद्र नगर, मनिष नगर येथील लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या होत्या.

२१ एप्रिल रोजी देवेद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून नागपूरसाठी आगामी ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात चर्चा केली होती.

२२ एप्रिल रोजी फडणवीसांनी पुन्हा आपल्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील मनपा शाळा, जयताळा नगर आणि दीनदयाल नगर लसीकरण केंद्राना भेटी दिल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिलला त्यांनी सदरमधील आयुष कोविड सेंटर आणि पाचपावली येथील नागपूर महापालिका, मेडिकल सर्व्हिस सोसायटी आणि जमात-ए-इस्लामीतर्फे चालविल्या जाणार्‍या कोविड सेंटरला भेट देवून तिथला आढावा घेतला होता.


थोडक्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे क्वचितच घराबाहेर पडले तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने दौऱ्यावरच राहिले. या दरम्यान ते स्वत: कोरोना पॉझिटिव्ह झाले. तरिही त्यांच्या दौऱ्यांच सातत्य कायम राहिलं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.