राज्यपालांच अभिभाषण नेमकं कोण लिहून देतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे सत्तांतरानंतरच पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आणि भविष्यातील कामांचा लेखाजोखा अभिभाषणात मांडला. यात ७५ हजार तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा निर्णय, मराठा समाजासाठी विशेष योजना, पेन्शन योजनेत सुधारणा, राज्यात विविध क्षेत्रात नोकरभरती सुरू, केंद्राप्रमाणे राज्यातही आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना आदी बाबींचा उल्लेख राज्यपालांनी केला.
मात्र यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणात कोणताच वाद किंवा गदारोळ झालेला नाही. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषणातून वाद निर्माण करण्याची संधी सोडली नव्हती.
राज्यपालांनी केलेलं अभिभाषण नेमकं कोणी लिहून देतं? असा प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जायला लागेल. म्हणजे अगदी घटना तयार होतं असताना.
घटना समितीत राष्ट्रपतींनी संसदेचं अधिवेशन सुरु होताना करायच्या भाषणाबद्दल बरीच चर्चा झाली. यात राष्ट्रपतींच्या भाषणाचं स्वरूप कसं असावं, त्यात कोणकोणते मुद्दे असावे, याबद्दलही चर्चा होती. त्यावेळी घटना समितीतले एक ज्येष्ठ सदस्य प्रा. के. टी. शहा यांचं मत होतं की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात त्यांची स्वतःची मतं व्यक्त व्हावीत.
पण त्यावर जरा खोलात जाऊन चर्चा झाल्यावर असं ठरलं की, राष्ट्रपतींनी सरकारनं दिलेलचं भाषण वाचून दाखवावं, त्यात स्वतःची कोणतीही मतं मांडू नयेत.
त्याचं कारण सांगितलं गेलं कि, शासनाचा कारभार जरी प्रत्यक्ष पंतप्रधान करत असले तरी नाव मात्र राष्ट्रपतींचे असते. त्यामुळे माझं सरकार नेमकं काय धोरण राबवणार आहे, याचा उल्लेख त्यात असावा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली.
तेव्हापासून कलम ८७ (१) नुसार राष्ट्रपती संसदेसमोर दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला अभिभाषण देतात. मात्र ते पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळानेच तयार केलेले असते.
त्यात सरकारच्या मागच्या वर्षीच्या कामकाजाचा आढावा, येणाऱ्या वर्षात सरकार कोणती धोरण राबवणार आहे, कोणते नवे कायदे करणार आहे या सगळ्याची माहिती असते.
आता जे तत्व देशाच्या राष्ट्रपतींना आहे तेच तत्व राज्याच्या राज्यपालांना देखील लागू करण्यात आलं आहे. जसा केंद्र सरकारचा कारभार राष्ट्रपतींच्या नावानं चालतो अगदी तसाचं राज्य सरकारचा कारभार राज्यपालांच्या नावानं चालतो.
राज्यघटनेतील कलम १५४ नुसार राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे असतात व त्यांनी ते अधिकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरायचे असतात. तर कलम १७६ नुसार राज्यपाल विधिमंडळापुढे अभिभाषण करतात.
हे भाषण त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनीच तयार करून दिलेलं असते.
यात शासनाने मागच्या वर्षी केलेल्या कामाचा आढावा, या वर्षी स्वीकारलेली धोरणे, सरकारची पुढील वर्षाची उद्दिष्ट, राज्याची आर्थिक स्थिती, विकासाचा दर, सरकारने विविध पातळीवर मिळवलेलं यश या सगळ्याचा उल्लेख असतो.
सर्वसाधारणपणे सरकार या भाषणाची तयारी डिसेंबर महिन्यापासून सुरू करतं. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय विविध खात्यांना या भाषणासाठी माहिती पाठवण्याची सूचना देते. विविध खात्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारे भाषण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. भाषण तयार झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवलं जाते. जर ते मराठीत बोलणार असतील तर तसे अनुवादित करवून दिल जातं.
हे हि वाच भिडू.
- मुख्यमंत्र्यांचं काय घेऊन बसला, हे राज्यपाल थेट पंतप्रधानांना नडायचे
- शरद जोशी व लाखो पंजाबी शेतकऱ्यांनी राज्यपालांना ६ दिवस घरातून बाहेर पडू दिलं नाही
- सुचवलेल्या नावांना राज्यपाल संमती देतीलच अस नाही, पटत नसेल तर युपीचा हा किस्सा वाचा