सर्वाधिक लोकसंख्या भारतात असणाऱ्या खोजा मुस्लिमांचा इतिहास काय आहे ?

श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर गूगलवर एक गोष्ट सगळ्यात जास्त सर्च केली जात आहे. ते म्हणजे श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पुनावाला याचा धर्म काय आहे?

कारण पुनावाला हे आडनाव बहुतांश पारशी समाजात ऐकायला मिळते, तसेच पारशी हे मुळात इराणचे असल्यामुळे त्यांची नावं सुद्धा मुस्लिम समाजातील लोकांशी मिळती जुळती असतात. त्यामुळे अनेक लोक आफताबच्या धर्मावरून कन्फ्युज आहेत.

परंतु माध्यमांशी बोलताना, श्रद्धाच्या वडिलांनी आफताब अमीन पुनावाला हा मुस्लिम आहे आणि श्रद्धाची हत्या हे लव्ह जिहाद आहे असा आरोप केला आहे.

यावर माध्यमांनी आफताब अमीन पुनावाला याच्या धर्माबद्दल माहिती घेतलीये. त्या माहितीनुसार आफताबचा धर्म पारशी नसून तो खोजा मुस्लिम समाजातला आहे असं समोर आलंय. 

आता मुस्लिम धर्मीय लोकांबद्दल सामान्यपणे सर्वांनाच माहिती असते, पण हे खोजा मुस्लिम कोण आहेत? ज्यांची नावं पारशांसारखी आहेत. 

तर हे खोजा मुस्लिम मुळात भारतीय वंशाचे हिंदूच आहेत ज्यांनी १४ व्या शतकात मुस्लिम धर्मात धर्मांतर केलं होतं.  

खोजा हा मुळात अविभाजित भारतातील सिंध आणि गुजरातच्या भागात राहणार व्यापारी समुदाय आहे. जेव्हा मुस्लिम धर्मियांचं भारतात आगमन झालं तेव्हा काही हिंदू समुदायांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता, त्यातीलच एक समुदाय म्हणजे खोजा.

१४ व्या शतकात इराणमध्ये पीर सद्र-अल-दीन नावाचे पीर होऊन गेले. हे मुस्लिम धर्मातील शिया पंथाचे पीर होते जे इराणमधून भारताच्या सिंध प्रांतात आले होते. त्यांनी निझारी इस्माइली विचारांची सुरुवात केली आणि मुस्लिम धर्मात स्वतःचं तत्वज्ञान मांडलं. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतीय लोकांनी धर्मांतर केलं असं सांगितलं जातं. 

परंतु या धर्मातराबाबत काही मतभेद आहेत. 

काहींच्या मते भारतीयांना धर्मांतरित करण्यासाठी त्यांना धमकावण्यात आलं किंवा बळजबरी त्यांचं धर्मांतर करण्यात आलं होतं. तर काहींच्या मते भारतीयांनी स्वतःच्या मर्जीने धर्मांतर केलं होतं. 

बहुतांश खोजा मुस्लिम शिया पंथातील इस्मायली नियमांना मानतात तर काही खोजा सुन्नी पंथीय आहेत. या इस्माइली नियमांना मानणाऱ्या शिया मुसलमानांना एकत्र करण्यासाठी १९ व्या शतकात इस्माइली इमामतचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. तेव्हा बहुतांश खोजा या संघटनेशी जुळले तर काहींनी या संघटनेशी फारकत घेत सुन्नी किंवा अशहरी पंथ स्वीकारला. 

इस्माइली इमामात ही संस्था जगभरात पसरलेली आहे. यात जगभरातील इस्माइली लोक सहभागी आहेत. चौथे आगा खान हे या इस्माइली इमामातचे ४९ वे इमाम आहेत. चौथे आगा खान हे सुलतान मुहम्मद शाह तिसरे आगा खान यांचे नातू आहेत. ज्यांनी पुण्यातील आगाखान पॅलेस बांधलं होतं. चौथे आगा खान यांच्याकडे ब्रिटन आणि पोर्तुगालचं नागरिकत्व असून ते इस्माइली समाजाचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत.

यात जर इस्लाम धर्मातील पंथांना समजण्यात घोळ होत असेल तर इस्लाममधील पंथ आणि त्यातील विचारधारांची माहिती थोडक्यात अशी आहे. 

इस्लाम धर्मात दोन प्रमुख पंथ आहेत ज्यात ८० टक्के लोक सुन्नी आहेत तर २० टक्के लोक शिया आहेत. यात सुन्नी पंथात हनफी, मलिकी, शहाफी, वहाबी, हंबली, अहमदिया, देवबंदी अशा विचारधारा आहेत. तर शिया पंथामध्ये इस्ना अशहरी, जैदी आणि इस्माइली या विचारधारा आहेत.

यातच इस्माइली विचारांना मानणारे काही समाज आहेत, ज्यात बोहरा, नूसहरी, फातमी आणि खोजा यांचा समावेश आहे. यावरून समजून येते की खोजा हा मुस्लिम धर्माच्या शिया पंथातील इस्माइली विचारांना मानणारा एक समाज आहे.  

परंतु खोजा हे मुस्लिम असले तरी ते आजही हिंदू धर्मातील काही परंपरा पाळतात.

खोजा समाजात असलेल्या अनेक परंपरा या हिंदू धर्मातील परंपरांसारख्याच असल्याचे दिसते. १८-१९ व्या शतकात हिंदू धर्मात स्वामी नारायण नावाचे धार्मिक संत होऊन गेले. यांच्याच पंथातर्फे जगभरात स्वामी नारायण मंदिरे बांधण्यात येतात. आजही खोजा मुस्लिम समाजातील काही महिला स्वामी नारायण यांची पूजा करतात. तसेच खोजा मुस्लिमांमध्ये बाळाच्या जन्मानंतर हिंदू धर्मियांप्रमाणे सहाव्या दिवशी छटीची परंपरा पाळली जाते. जी इतर मुस्लिमांमध्ये दिसून येत नाही.

१८६६ मध्ये बॉम्बे हायकोर्टाने एका निकालामध्ये खोजा समाजाला अर्धे मुस्लिम आणि अर्धे हिंदू म्हटले होते. त्यामुळे खोजा हे जरी मुस्लिम धर्मीय असले त्यांची हिंदू धर्माशी असलेली नाळ अजूनही तुटलेली नाही असं सांगितलं जातं. 

खोजा समाज हा मुळात व्यापारी समाज आहे, त्यामुळे या समाजातील लोक हे प्रामुख्याने उद्योगपती आहेत. हा समाज भारतात प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात राहतो, यात मुंबई शहरातील खोजा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. तर व्यापाराच्या निमित्ताने काही लोकं पूर्व आफ्रिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा स्थायिक झालेले दिसतात. या खोजा समाजात अनेक नामवंत लोकं आणि उद्योगपती आहेत. ज्यात काही लोकांनी भारताच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे.

विप्रो कंपनीचे माजी संचालक अजीम प्रेमजी हे सुद्धा खोजा मुस्लिमच आहेत. 

अजीम प्रेमजी यांना आशिया खंडातील सगळ्यात दानवीर उद्योगपती म्हणून ओळखलं जातं. २०१९ मध्ये त्यांनी ५२ हजार ७५० कोटी रुपयांची संपत्ती अजीम प्रेमजी फाऊंडेशनला दान केली होती. या संपत्तीचा वापर शिक्षण, आरोग्य या सामाजिक कामांसाठी करण्यात येतोय. तर त्यांनी स्वतःच्या पूर्ण आयुष्यात एकूण १ लाख ४५ हजार कोटींची संपत्ती धर्मार्थ कार्यांसाठी दान दिली आहे.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना सुद्धा खोजा मुस्लिम समाजातील होते.

पाकिस्तानची स्थापना केल्यानंतर जिना यांनी अजीम प्रेमजी यांचे वडील मुहम्मद हाशिम प्रेमजी यांना पाकिस्तानात येण्याची विनंती केली होती. यासाठी जिना यांनी प्रेमजींना पाकिस्तानचे अर्थमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती असं सांगितलं जातं, पण प्रेमजी पाकिस्तानात गेले नाही. प्रेमजी यांच्याप्रमाणे बहुतांश खोजा समाजातील लोक भारताचं राहतात. 

जगभरात जवळपास ६.५ लाख खोजा मुस्लिम आहेत, त्यातील ५ लाखांच्या आसपास खोजा मुस्लिम एकट्या भारतात राहतात. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.