गुलाबराव पाटील म्हणतात, ते उद्धव ठाकरेंच्या भोवतीचे बडवे आहेत तरी कोण..?

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अगदी शांतपणे पार पडली, त्यानंतर सगळ्यांचं लक्ष होतं, ते बहुमत चाचणीकडे, विशेष म्हणजे बहुमत चाचणीही निवांत पार पडली. या सगळ्यात कुठली गोष्ट गाजली असेल, तर ती म्हणजे भाषणं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात बंडखोर आमदारांना मिळालेल्या निधीचे आकडे वाचून दाखवले, बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरारमधल्या समस्या मांडल्या, सुधीर मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीवर टीका केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अगदी दिलखुलास भाषण केलं तर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला.

सभागृहातलं आणखी एक भाषण प्रचंड गाजलं, ते म्हणजे आमदार गुलाबराव पाटील यांचं.

आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी, ‘आम्ही बंड नाही, तर उठाव केला आहे’ असं वक्तव्य केलं. सोबतच त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांवर नाव न घेता टीका केली. 

ते म्हणाले,

“आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो, पण कुणी फोन उचलला नाही. आम्हाला आजही दुःख सलतंय की या चार लोकांच्या कंडोळ्यानं आमच्या उद्धव साहेबांना बावळट केलं. ज्यांची लायकी नाही आमच्यावर बोलण्याची, ते आमच्यावर बोलतात. आमची मतं घेऊन खासदार होतात. आम्हाला गटारातली पिल्लं आणि डुक्कर म्हणता, पण या डुकरांची मतं घेऊन तुम्ही निवडून आलात. 

आजही आदरणीय उद्धव साहेबांना आमची हात जोडून विनंती आहे, हे जे आजूबाजूचे कोंबडे आहेत, त्यांना बाजूला करा. जे तुम्हाला पट्टी बांधून धृतराष्ट्रासारखं सांगतायत, त्यांना लांब करा. तुमची माणसं तुमच्यापासून लांब नाही गेलीत, तर त्यांना लांब लोटलं गेलंय.”

शिवसेना आमदारांनी जेव्हा बंड केलं, तेव्हाही एक पत्र काढून उद्धव ठाकरेंभोवतीच्या बडव्यांमुळं आजची स्थिती उद्भवल्याचं म्हणलं होतं, आज पुन्हा एकदा गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावरच निशाणा साधला.

नेहमी चर्चा होणारे, हे उद्धव ठाकरेंभोवतीचे बडवे आहेत तरी कोण..? तर ज्याज्या वेळेस हा विषय निघतो, तेव्हा प्रामुख्यानं चार नावांची चर्चा केली जाते.

१. सुभाष देसाई –

बाळासाहेबांच्या पहिल्या फळीतल्या शिवसैनिकांपैकी आजही कार्यरत असणारे शिवसैनिक म्हणून सुभाष देसाई यांचं नाव घेतलं जातं. देसाई पहिल्यांदा आमदार झाले १९९० मध्ये. त्याचवेळी महाराष्ट्र्भर शिवसेना झपाट्यानं वाढत होती. सुभाष देसाईंनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

बाळासाहेब ठाकरेंनी १९९० मध्येच पहिल्यांदा अधिकृतपणे ‘शिवसेना नेते’ कुणाला म्हणायचं याची यादी जाहीर केली होती. त्या पहिल्या फळीत देसाई यांचं नाव होतं. त्यानंतर शिवसेनेत झालेली बंड, सेना-भाजप युतीचं पहिलं सरकार आणि कित्येक स्थित्यंतरातही सुभाष देसाईंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योग आणि खाणकाम मंत्रालय देण्यात आलं, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये ही दोन्ही खाती कायम ठेवत मराठी भाषा मंत्रालयाचा कारभारही त्यांच्याकडेच सोपवण्यात आला. 

२०१९ मध्ये जेव्हा सत्तांतर झालं, तेव्हा उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदासाठी जी नावं विचाराधीन होती, त्यात सुभाष देसाईंचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतं.

ठाकरे सरकारच्या काळात ज्या मंत्रालयांची कामं झटकन झाली, त्यात सुभाष देसाईंचं मंत्रालय होतं, अशी चर्चा कायम रंगते. अत्यंत जुने शिवसैनिक असल्यानं त्यांना मातोश्रीवर मुक्त प्रवेश तर आहेच, पण सोबतच उद्धव ठाकरेंनी जी जुन्या शिवसैनिकांची फळी राखली होती, त्यातही देसाईंचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यामुळं शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेत देसाई यांची भूमिका प्रचंड महत्त्वाची आहे. 

२. अनिल परब –

अनिल परबांबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी सामान्य शिवसैनिक ते मंत्री असा प्रवास केला. वकिलीची प्रॅक्टिस करत त्यांनी केबल व्यवसायावरही जम बसवला होता. परब बाळासाहेबांचे इतके जवळचे होते, की त्यांनी बाळासाहेबांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम पाहिलं. शिवसेनेचे निष्ठावान म्हणून अनिल परब ओळखले जातात.

दांडगा जनसंपर्क असला, तरी अनिल परब विधानसभेवर निवडून गेले नाहीत. २०१२ मध्ये ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांची विधान परिषदेचे गटनेते म्हणून निवड झाली. २०१८ ते पुन्हा विधान परिषदेवर निवडून गेले. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, तेव्हा अनिल परब यांना परिवहन मंत्री बनवण्यात आलं.

सरकारच्या कार्यकाळात जेव्हा एसटी कामगारांचं आंदोलन झालं, तेव्हा अनिल परब यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली, त्यांच्या राजीनाम्याची आणि खातेबदलाची मागणी करण्यात आली, मात्र शिवसेना नेतृत्वाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. 

ईडीचा ससेमिरा पाठीमागे लागल्यावरही मातोश्री त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं.

विधान परिषदेत मिळणारी संधी, मातोश्रीवरचा वावर या गोष्टी परबांना उद्धव ठाकरेंचं खास बनवतात. इतकंच नाही, तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याआधी, त्यांच्यावतीनं राजभवन गाठणारे अनिल परबच होते.

३. मिलिंद नार्वेकर

उद्धव ठाकरेंचा हुकमी एक्का म्हणून नार्वेकर ओळखले जातात. शाखाप्रमुख बनण्यासाठी मातोश्रीवर आलेले नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक बनले. जवळपास २६ वर्षांपासून नार्वेकर सावलीप्रमाणे उद्धव यांच्यासोबत आहेत. असं म्हणतात उद्धव यांना भेटायचं असेल, तर आधी मिलिंद नार्वेकरांची भिंत पार करावी लागते.

उद्धव यांच्या भेटीपासून ते तिकीटवाटपापर्यंत प्रत्येक निर्णय प्रक्रियेत मिलिंद नार्वेकरांचा महत्त्वाचा रोल असतो. सक्रिय राजकारणात नार्वेकर नसले, तरी पडद्यामागून सूत्र हलवायची जबाबदारी त्यांचीच असते. त्यांचा मातोश्रीवरचा होल्ड आणि उद्धव यांचं सावली म्हणून वावरणं, कित्येकांना रुचलं नाही. 

याआधी नारायण राणेंनी नार्वेकर शिवसेनेत तिकीटवाटपासाठी खंडणी घेतात असा आरोप केला होता. भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली तेव्हाही मिलिंद नार्वेकरांवरच आरोप केला होता, तेच राज ठाकरेंच्या बाबतीत झालं होतं. त्यामुळं कुणीही शिवसेना सोडली तरी निशाण्यावर नार्वेकरच असतात. 

एकनाथ शिंदे यांचं बंड मोडायला उद्धव ठाकरेंनी पहिली जबाबदारी नार्वेकरांवरच दिली होती.

गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले, “साहेबांची भेट मिळत नाही, चहापेक्षा किटली गरम.” यावेळी त्यांचा रोख मिलिंद नार्वेकरांवरच होता, असं बोललं जातंय. त्यामुळं शिवसेनेच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावणारे मिलिंद नार्वेकर बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत.

४. संजय राऊत –

गुलाबराव पाटील असतील, दीपक केसरकर असतील किंवा अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सगळ्यांनीच संजय राऊतांना या बंडासाठी जबाबदार धरलं. संजय राऊतही बाळासाहेबांच्या फळीतले शिवसैनिक, त्यांनी सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं.

महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊतांना ओळखलं जातं. शरद पवारांसोबत समन्वय साधून त्यांनी महाविकास आघाडीची भट्टी जमवून आणली. त्यानंतर शिवसेनेत संजय राऊत यांचं वजन आणखीनच वाढलं. जवळपास दररोज सकाळी, ते टीव्ही चॅनेल्सवर शिवसेनेची बाजू मांडतायत.

त्यात राज्यसभेचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करणं अपेक्षित असताना, संजय राऊतांनी घोषणा केली. शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना डावलून बरेच निर्णय संजय राऊत घेत होते, असा आरोपही वारंवार त्यांच्यावर झाला. आमदारांनी बंड केल्यावर त्यांनी केलेल्या विधानांवरुन टीकाही झाली. त्यात संजय राऊत लोकांमधून निवडून जात नाहीत, या बाबतचा रोषही आमदारांनी अनेकदा व्यक्त केलाय.

शरद पवारांशी वाढलेली जवळीक, भाजपला थेट अंगावर घेणं, आमदारांमध्ये असलेला रोष आणि उद्धव ठाकरेंनंतरचं सत्ताकेंद्र म्हणून काम करणं यामुळं राऊतांचं नाव या चार जणांमध्ये असल्याची शक्यता वाढते.

आता ही चारही नावं म्हणजे चर्चांमधून व्यक्त करण्यात आलेलं अंदाज आहेत, हेही तितकंच खरं.. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.