धर्मसंसदेत उपस्थिती लावणारे हे ‘महामंडलेश्वर’ नेमके कोण असतात.

हरिद्वारमधल्या वादग्रस्त धर्मसंसदेनंतर टीव्हीची स्क्रीन नुसती भगवी झालेय. नुसते साधूच साधू दिसतायत. आता त्यांच्या सगळ्यांची नावं तर लक्षात येत नाहीयेत पण त्यातल्या काही जणांच्या पुढं महामंडलेश्वर असं डॉक्टरेटचं डॉक्टर लावल्यासारखं दिसतंय. तसेच ह्या महामंडलेश्वरांची बाकीच्या साधूंपेक्षा जास्त हवा आहे, त्यांना इतर साधू जास्त मान देतायत एवढं ही कळतंय.

तसेच हरिद्वार धर्मसंसदेचे आयोजक यती नरसिंगांनंद हे ही जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर असण्याचं सांगण्यात येतंय.

मागे कुंभमेळात पण मोठ्या थाटामाठात ह्या महामंडलेश्वरांची मिरवणूक काढण्यात आली होती हे ही पाहिलं होतं. त्यामुळं बघावं म्हटलं ही नेमकी भानगड काय आहे.

तर मग थोडा रिसर्च केल्यावर माहिती मिळाली. पण हिंदू धर्मातील परंपरा आणि चालीरीती या एका पिढ्याकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकरीत्या जात असल्याने सगळीकडे या महामंडलेश्वर पदाबाबत सगळीकडे थोडी वेगवेगळी माहिती आहे. 

पण ज्या मुख्य आखाड्यात ज्या परंपरा आहेत त्यानुसार तुम्हाला माहिती सांगतो.

तर आखाड्याचा विषय निघाला आहे तर पाहिलं लक्षात घ्या की भारतात हिंदू साधूंचे तसे १३ आखाडे आहेत आणि सगळे आखाडे आपापले महामंडलेश्वर नेमतात.

सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी आखाड्यांचे प्रतिनिधी म्हणून या महामंडलेश्वरांची नेमणूक केली जाते. 

मात्र आखाड्याच्या कार्यकारी मंडळाद्वारे चालवल्या जाणार्‍या आखाड्याच्या अंतर्गत संघटना आणि आर्थिक व्यवहारात महामंडलेश्वरची कोणतीही भूमिका नसते. 

महामंडलेश्वरांच्या नियुक्तीसाठी प्रत्येक आखाड्यांचे स्वतःचे नियम आहेत. काही आखाड्यात, संभाव्य महामंडलेश्वराचे नाव विद्यमान महामंडलेश्वर किंवा इतर वरिष्ठ साधू संतांकडून ठरवले जाते. तर काही आखाड्यात हे पद जेष्ठतेनं येतं. काही आखाड्यात तर परीक्षा पण घेत असल्याचं सांगण्यात येतंय. 

महामंडलेश्वर होण्यासाठी काही निकष ही असतात. या पदासाठी ज्या व्यक्तीची निवड होणार आहे त्याला शास्त्राचं संस्कृत, वेद आणि पुराणांचं ज्ञान असावं, त्या व्यक्तीनं पूर्णपणे संन्यास घेतला असावा, तसेच प्रवचन, भजन देण्यासाठी त्या व्यक्तीची वाणी सुस्पष्ट आणि त्याच्याकडे लोक जमवण्यासाठी भाषणकौशल्य असावं असे निकष लावण्यात येतात. मात्र वयाची अट मात्र काही ठिकाणी शिथिल आहे. अगदी बालवयात किंवा वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेल्या व्यक्तीचीही महामंडलेश्वर म्हणून निवड केली जाऊ शकते. महिलांनाही ही पदवी दिली जाते. काही आखाड्यानी तर तृतीय पंथियांनाही महामंडालेश्वरांची पदवी दिलेय.

कोणत्याही संताला महामंडलेश्वर ही पदवी मिळणे हा मोठा सन्मान आहे. या उपाधीनंतर धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची प्रतिष्ठा, ओळख वाढते.कुंभ मेळ्यामध्ये शाही स्नानात महामंडलेश्वर रथावर बसून बाहेर पडतात.

महामंडलेश्वरासाठी कुंभमध्ये स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असते त्यांच्यासाठी व्हीआयपी बंदोबस्त केला जातो.

आदी शंकराचार्यानी आखाड्यांची जी व्यवस्था बसवली होती तेव्हापासूनच ही परंपरा चालू असल्याचं सांगण्यात येतंय. हजारो वर्षांपासून चालू असणारी ही परंपरा अजूनही आखाड्याकडून तंतोतंत पाळली जाते.

मात्र काही महामंडलेश्वरांनी केलेल्या विवादित वक्तव्यांमुळे या पदाची प्रतिष्ठाही कमी होत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. बाकी जेवढी होती नव्हती तेवढी पण कामाची माहिती तुम्हाला सांगितलेय बघा.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.