कोण आहेत हुती विद्रोही ज्यांना सौदी अरेबिया आणि यूएईसुद्धा घाबरतात?

आतंकवाद. ही अशी गोष्ट आहे जी सध्या समाजात खूप मोठ्या प्रमाणात पसरली असून प्रत्येक देश याच्याशी दोन हात करण्यात सरसावले आहे. प्रत्येक देशाचं एकंच ध्येय आहे की त्यांच्या देशाला आतंकवादापासून आणि आतंकी हल्ल्यांपासून कसं दूर ठेवता येईल. ज्या देशाची व्यवस्था हे करण्यात अयशस्वी ठरते त्यांचं काय होतं हे गेल्यावर्षी आपण बघितलं. तालिबानने अफगाणिस्तानवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आता तिथल्या लोकांची दुरावस्था झाली आहे.

सध्याही देशाच्या एका भागात असंच काही तरी घडत आहे. सोमवारी १७ जानेवारीला संयुक्त अरब अमिरात (यूएई) विमानतळ आणि तेल डेपोवर तीन मोठे स्फोट झाले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय सहा जण गंभीर जखमी आहेत. नुकतंच येमेनच्या हुती बंडखोरांचा यामागे हात असल्याचं समोर आलंय. शिवाय या संघटनेने यूएईवर हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

याला प्रतिउत्तर म्हणून सौदीच्या नेतृत्वाखालील एका संघटनेने येमेनच्या हुती बंडखोरांविरुद्ध आघाडी उघडली आहे. या संघटनेच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी मध्यरात्री येमेनची राजधानी सना इथल्या हुती केंद्रांवर बॉम्ब हल्ला केला आहे. सौदीच्या नेतृत्वाखालील संघटना आणि हुती बंडखोर यांच्यात दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष २०१५ मध्ये सुरु झाला जेव्हा हुती बंडखोरांनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली. यानंतर बंडखोर आणि अरब देशांमध्ये पलटवार सुरू झाले.

कोण आहेत  हे हुती बंडखोर?

१९८० च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. हे हुती शिया इस्लामचं अनुसरण करतात आणि उत्तर येमेनच्या बहुतेक भागावर नियंत्रण ठेवतात. तिथली ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. उत्तर येमेनमध्ये सुन्नी इस्लामच्या सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला हुतींचा विरोध आहे. येमेनच्या सुन्नी मुस्लिमांशी हुतींचा खराब संबंधांचा इतिहास आहे. या चळवळीने सुन्नींशी भेदभाव केला, पण त्यांच्याशी युती करून त्यांची भरतीही केली.

येमेनमध्ये हुतींनी दोन राष्ट्राध्यक्षांना सत्तेवरून हकलूनसुद्धा लावलं आहे.

हुसेन बद्रेद्दीन अल-हुती यांच्या नेतृत्वाखाली, हा गट येमेनचे माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांचा विरोधक म्हणून उदयास आला. सालेह यांच्यावर त्यांनी खूप मोठ्या आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि सौदी अरेबिया तसंच अमेरिकेच्या पाठिंब्यावर टीका केली. २००० च्या दशकात बंडखोर शक्ती बनल्यानंतर, २००४ ते २०१० पर्यंत येमेनचे अध्यक्ष सालेह यांच्या सैन्याशी हुतींनी सहा वेळा युद्ध केलं. २०११ मध्ये, अरब देशांच्या हस्तक्षेपानंतर हे युद्ध शांत झालं. मात्र, देशातील जनतेच्या निदर्शनामुळे हुकूमशहा सालेह यांना पद सोडावं लागलं.

यानंतर अब्दरब्बू मंसूर हादी येमेनचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. पण हुती त्यांच्यावरही खूश झाले नाहीत आणि त्यांनी पुन्हा बंडखोरी करत मंसूर हादींना अध्यक्षपदावरून काढून टाकून राजधानी सना ताब्यात घेतली.

का लढतात हे हुती?

असं सांगितल्या जातं की, येमेनच्या सत्तेवर हुतींनी कब्जा केल्यावर शेजारील देशांतील सुन्नी मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुन्नी बहुल सौदी अरेबिया आणि यूएई हे घाबरले होते, म्हणून त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडे मदतीसाठी धाव घेतली. पाश्चिमात्य देशांच्या मदतीने हुतींवर हवाई आणि जमिनीवर हल्ले सुरू केले. शिवाय या देशांनी अब्दरब्बू मंसूर हादी यांना पाठिंबा दिला. परिणामी, येमेन आता गृहयुद्धाचे रणभूमी बनलं असून इथे सौदी अरेबिया, यूएईचे सैन्य हुती बंडखोरांचा सामना करत आहेत.

गेली सहा वर्ष हा लष्करी संघर्ष सुरूच आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये अदन शहरात उतरल्यानंतर, संघटनेच्या भूदल सैन्याने हुती आणि त्यांच्या सहयोगींना दक्षिणेतून बाहेर काढण्यास मदत केली. तरीही  बंडखोरांना सना आणि बहुतेक उत्तर-पश्चिम भागातून बाहेर काढण्यात ते अपयशी ठरले.

या बंडखोरांना प्रोत्साहन देण्यात इराणचं नाव घेतलं जातं.

इराण आणि हुती बंडखोर शिया इस्लामचं पालन करतात. या संगतीमुळे इराण त्यांना शस्त्रे आणि पैसे देऊन मदत करत असल्याचा आरोप इराणवर केला जातो. इराण आणि सौदी या दोघांनाही इस्लामिक जगताचं प्रमुख व्हायचं आहे. इराणला या बंडखोरांच्या मदतीने येमेनमध्ये शिया सरकार स्थापन करायचं आहे, तर सुन्नी विचारसरणीवर विश्वास ठेवणारा सौदी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

इराण आणि सौदीच्या या संघर्षात हुती बंडखोर प्रमुख हत्यार बनले आहे. हा हल्ला-प्रतिहल्ल्याचा खेळ  आता कोणतं वळण घेईल आणि अजून किती निष्पाप लोकांना जीव गमवावा लागेल, याची माहिती येणाऱ्या काळातंच होईल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.