आयपीएलच्या ९ पैकी ७ सिजनमध्ये या खेळाडूने आपली टीम बदललीये..!!!
सध्या क्रिकेटविश्वात आयपीएलचा फिव्हर आहे. रोज नवनवे रेकॉर्डस होताहेत, जूने रेकॉर्डस मोडले जाताहेत. कुठला खेळाडू कुठला रेकॉर्ड आपल्या नावे करेल, हे सांगता येत नाही. असाच एक आगळावेगळा रेकॉर्ड एका प्लेअरने आपल्या नावे केलाय. रेकॉर्ड असाय की आत्तापर्यंत त्याने आयपीएलच्या ९ सिजनमध्ये सहभाग घेतलाय आणि त्यापैकी ७ सिजनमध्ये तो वेगवेगळ्या टीमकडून खेळलाय. सहाजिकच प्रत्येक वेळी त्याच्या अंगावरच्या जर्सीचा रंग बदललाय…!!!
अँरोन फिंच. नाम तो सुना ही होगा. फिंची या टोपननावाने ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅटसमन. फिंच आतापर्यंत २०१० ते २०१८ दरम्यानच्या काळात आयपीएलच्या ९ सिजनमध्ये सहभागी झालाय. त्यातल्या ६७ सामन्यांतील ६६ इनिंग्जमध्ये २६.७१ च्या सरासरीने त्याने १६०३ रन्स फटकवल्यात. त्यात त्याच्या १३ फिफ्टीजचा समावेश आहे. असं असून देखील कुठल्याही संघाने दिर्घकाळासाठी त्याला आपल्या संघात ठेवणं पसंत केलेलं नाही. त्यामुळे जवळपास प्रत्येक वर्षीच त्याची आयपीएलची टीम बदललीये. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात कुठल्याही खेळाडूने काढलेल्या सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड त्याच्या नावे जमा आहे. २०१३ साली इंग्लडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात ६३ बॉल्समध्ये १५६ रन्स फटकवताना त्याने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. या तुफानी इनिंग दरम्यान त्याने १४ सिक्सर्स आणि ११ फोरचा पाऊस पाडला होता.
आता जरा नजर टाकूयात फिंचच्या आयपीएल कारकिर्दीवर. फिंचने आपल्या आयपीएलमधल्या इनिंगची सुरुवात केली ती २०१० मध्ये. त्यावेळी तो राजस्थान रॉयल्समध्ये होता. त्यानंतर २०११-२०१२ हे दोन सिजन तो दिल्ली डेअरडेव्हील्सकडून खेळला. २०१३ च्या आयपीएलमध्ये तो पुणे वॉरीअर्सच्या टीममध्ये होता, तर २०१४ साली तो सनरायजर्स हैद्राबादच्या जर्सीत क्रिकेटरसिकांना बघायला मिळाला. पुढच्या सिजनमध्ये परत त्याची टीम बदलली, २०१५ साली तो मुंबई इंडियन्सशी करारबद्ध झाला, पण दुखापतीमुळे त्याला खेळात आलं नाही. पुढची २ वर्षे त्याने गुजरात लायन्ससोबत घालवली आणि यावर्षीच्या आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना आपल्याला बघायला मिळतोय.
किंग्ज इलेव्हन पंजाबने६.2 कोटी रुपये खर्चून यावर्षीच्या सिजनसाठी त्याला विकत घेतलंय, पण सुरुवातीच्या दोन्हीही सामन्यात तो आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरलाय. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो ‘गोल्डन डक‘ ठरलाय. गोल्डन डक म्हणजे खेळत असलेल्या पहिल्याच बॉलवर आउट होणे. तर असा हा फिंचचा आयपीएलमधला प्रवास राहिलाय. आशा करूयात की यावर्षीच्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यात तरी तो काहीतरी करामत करेल, जेणेकरून पुढच्या Vवर्षीच्या सिजनमध्ये त्याला टीम बदलावी नाही लागणार.