आमदार नाव, नंबर सांगताना गंडले, पण या ३ माणसांमुळं विधानसभेतलं मतदान निवांत पार पडलं

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 आठवड्यांपासून नुसता धुरळा चालू होता. एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी होऊन ते मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि हा धुरळा आता हळू हळू सेटल होऊ लागलाय.  विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि आज बहुमतासाठी विधानसभेत झालेलं मतदान हे आपल्या पैकी बऱ्याच जणांनी लाइव्ह पाहिलं. 

विशेषतः हेडकाऊन्ट किंवा शिरगिणती सारख्या मतदानाच्या पद्धती देखील कळल्या. त्यात पण उभं राहून नुसतं आपलं नाव आणि नंबर सांगायचं असताना देखील माननीय सदस्यांची फजिती देखील आपण पहिली. आमदारांचा गोंधळ, शेरेबाजीही आपण पहिली.

मात्र हे सगळं चालू असताना सभापतींची निवड, बहुमताची चाचणी अगदी सुरळीत झाली. आणि त्यात टीव्हीवर दिसली ती तीन माणसं जी प्रत्येक सदस्याच्या जवळ जात होती आणि त्याच्या मतदानाची नोंद करत होती, चुकलेल्या सदस्याला आपला क्रमांक दुरुस्त करायला सांगत होती.

पण हे तीन जण आहेत तरी कोण..?

तर आपल्या या विधिमंडळ अधिवेशनांचं कामकाज यशस्वीपणे चालण्यासाठी बरेच अधिकारी आणि कर्मचारी काम करत असतात.

त्यात अध्यक्षांच्या खुर्चीसमोर काही अधिकारी बसलेले आपल्याला दिसतात, हे अधिकारी म्हणजे प्रधान सचिव आणि उपसचिव असतात.

प्रधान सचिव हे विधानमंडळाचे प्रशासकीय काम पाहणार्‍या विधानमंडळ सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात.

सध्या राजीव भागवत हे महाराष्ट्र विधी मंडळाच्या प्रधान सचिव पदावर कार्यरत आहेत.

तर प्रधान सचिवांच्या मदतीला दोन उपसचिव असतात, ते दोघेही जेष्ठ सचिव असतात. ते प्रधान सचिवांना आणि अध्यक्षांना त्यांच्या कामात मदत करत असतात.

आता हे तीनही अधिकारी या संपूर्ण विधान मंडळाच्या कामकाजात नक्की काय काय कामं करतात हे बघू..

विधान मंडळाचं जे काही कामकाज चालतं त्या संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवणं आणि त्याचं योग्य नियंत्रण करण्याचं महत्वाचं काम हे तीन अधिकारी करत असतात. विधानभवनात काम करणार्‍या वेगवेगळ्या अधिकार्‍यांना कामासंबंधीच्या सूचना करण्याचं महत्वाचं काम हे करतात, विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या कामात मदत करणे, विधान मंडळ कामकाजा संबंधीच्या काही महत्वाच्या बाबी त्यांना समजाऊन सांगणे अशी महत्वाची जबाबदारीही याच अधिकाऱ्यांवर असते.

बहुमत सिद्ध करताना बहुमताच्या बाजूने आणि विरुद्ध असणारे सदस्य आपल्या जागेवर उभे राहून आपले नाव आणि क्रमांक वाचत असतात.

हे आपण टीव्हीवर पाहतो त्यावेळी सदस्यांच्या मतांची नोंद घेण्यासाठी जे ३ अधिकारी हातात नोंदवही आणि पेन घेऊन या मतांची नोंदणी करण्याचे काम करत असतात, ते उपसचिव दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले. 

या उपसचिव दर्जाच्या अधिकार्‍यांची इतर कामं काय असतात ते आपण बघू..

विधानमंडळाचं सगळं कामकाज सांभाळणं. विधानमंडळातले प्रश्न, लक्षवेधी सूचना यासंदर्भातल्या सगळ्या माहितीची नोंद ठेवणं आणि वेळोवेळी त्यावर काम करणं ही महत्वाची कामं सुद्धा या उपसचिव दर्जाच्या अधिकार्‍यांद्वारे पार पाडली जातात.

त्यांना विधानमंडळात वेगवेगळे विभाग ठरवून दिलेले असतात, त्या त्या  विभागांची कामे योग्य प्रकारे करण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांची असते. सोबतच विधिमंडळ समित्यांची कामे पार पाडण्याचं काम देखील हीच मंडळी करत असतात. अशी विविध प्रकारची महत्वाची कामं या अधिकार्‍यांची असतात.

प्रधान सचिवांच्या समोर एका मोठ्या राऊंड टेबलवर 10 अधिकारी, कर्मचारी बसलेले असतात त्यांना रिपोर्टर्स असं म्हणतात. 

यात काही अधिकारी दर्जाची लोकं असतात तर काही स्टेनोग्राफर, टायपिस्ट, लघुलेखक असे कर्मचारी असतात. संपूर्ण सभागृहाचं कार्यवृत्त तयार करण्याचं काम या रिपोर्टर्स मार्फत केलं जातं. विधानसभा सदस्यांचा एखादा विषय किंवा एखादे वाक्य रेकॉर्ड वर घेण्या किंवा न घेण्यासंबंधीच्या सूचना या रीपोर्टर्सना वेळोवेळी अध्यक्ष देत असतात आणि ते या सुचनांचं पालन करतात.

संपूर्ण विधानमंडळाच्या कामकाजाचं लिखित स्वरुपात रेकॉर्डिंग ठेवणं हे या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचं काम असतं.

महत्वाचे विषय, वाक्यं, सूचना यांच्या नोंदी ठेवण्याचं महत्वाचं काम हे या टेबलवर बसलेली मंडळी पार पाडतात.

विधानसभा अध्यक्षांच्या आसनांच्या बाजूला एक किंवा २ व्यक्ती उभ्या असतात त्यांना पट्टेवाले असे म्हणतात. 

शिपाई या पदाच्या वरच्या लेव्हलचे हे कर्मचारी असतात. अध्यक्षांना हव्या असलेल्या गोष्टी त्यांच्या पर्यंत सहजरीत्या पोहचवण्यासाठी हे कर्मचारी त्यांच्या बाजूला उभे असतात. त्यांच्या डोक्यावर पट्टेरी फेटा असतो. विधानसभा सदस्यांच्या चिठ्ठी स्वरूपातल्या काही सूचना, महत्वाच्या फाइली, कागद, पेन इत्यादि गोष्टी अध्यक्षांपर्यंत पोहचवण्याचं काम हे पट्टेवाले करत असतात.

अशाप्रकारे फक्त मतदानच नाही, तर विधान मंडळाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यात या अधिकारी आणि कर्मचारी मंडळींचं मोलाचं योगदान असतं..

हेही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.