क्रिकेट मध्ये खेळाडुंचा जर्सी नंबर कोण आणि कस ठरवतं ?

आपले भिडू दोस्त म्हणजे लई क्युरिअस बाबा. काय काय प्रश्न त्यांना पडत असतेत आणि मग ती आम्हाला इनबॉक्स करतेत. मग आमचे संपादक म्हनतेत प्रश्न पडण चांगल हाये. प्रश्न पडल्यानेच मानवजातीची प्रगती हुते. आम्हाला पण ते पटत.(बॉसन सांगितलेलं सगळ पटवून घेतोच)

मग भिडूंच्या प्रश्नाची उत्तर शोधायला आम्ही मांडी घालून बसतो. तर असाच आम्हाला एक भन्नाट प्रश्न आपल्या अमरदीप नावाच्या भिडून विचारलेला.

भिडूचा सवाल असा आहे की,

“क्रिकेट मध्ये खेळाडुंच्या जर्सी नंबर. कोण आणि कसा ठरवतो ?”

डोक खाजवून शोधलं. वरवर सोपा दिसणारा हा विषय खोल हुता.आधी पहिल्यापासून इस्कटून सांगतो.

तर पूर्वीच्या काळात हे जर्सी नंबर वगैरे काय प्रकार नव्हता. अहो जर्सी तर कुठे होती? कपिल देव, गावस्कर वगैरे मंडळी बटनवाला पांढरा शर्ट घालून मैदानात उतरायची. क्रिकेट म्हणजे जंटलमन लोकांचा गेम ओ. इथ काय रंगीत कपडे त्यावर नंबर असले काय प्रकार नव्हते. त्यांच्या टेस्ट कॅपचा नंबर असयचा. त्यो नंबर तुम्ही कधी खेळायला आला त्या क्रमाने मिळायचा.(सोboring)

कॅरी पॅकरची सर्कस म्हणून हिणवल्या गेलेल्या वर्ल्ड सिरीज मध्ये पहिल्यांदा कलर जर्सी दिसली. मग ऐशीच्या दशकात क्रिकेटमध्ये रंग आले. याच काळात भारतात पण कलर टीव्ही आले होते. भारतात केबल टीव्ही आली आणि आयसीसीने १९९२च्या वर्ल्ड कप पासून ऑफिशियली वनडे मध्ये जर्सी रंगीत केली.

हे सगळे बदल ज्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या पुढाकाराने होत होते. त्यांनी १९९६साली आपल्या खेळाडूंच्या जर्सीला नंबर दिले. आणि १९९९सालच्या वर्ल्ड कप पासून सगळ्या जगातल्या क्रिकेट टीमच्या जर्सीना नंबर कम्पल्सरी झाले.

मग हे नंबर द्यायचे कसे हा प्रश्न उभा राहिला.

आयसीसी म्हणाली भावानो हा तुमचा विषय. उगीच आम्हाला त्यात वडू नका. तुम्हाला आवडतय ते नंबर घ्या , फक्त एका टीम मध्ये दोन नंबर रिपीट करू नका. पण तेव्हाचे खेळाडू शहाणे होते. त्यांनी १ ते १५ नंबर वाटून घेतले. कॅप्टनला १ नंबर देण्यात आला. फक्त दक्षिण आफ्रिकाचा कप्तान हॅन्सी क्रोनियेने तेवढ आपला ५ हा नंबर बदलला नाही. (आधी पास्नच हे क्रोन्जे जरा काड्या करणार हुत).

भारताचा विषय आला. जगात १० नंबरच्या जर्सीला मान आहे. कारण काय तर जगात फुटबॉल मध्ये एक प्रथा आहे (नियम नव्हे) की तुमचा गोलकीपर ला १ नंबर देऊन तिथनं पुढ खेळाडूना नंबर द्यायचे. या क्रमान ९, १०, ११ हे स्ट्राईकर असायचे. पण या हिशोबान साधारण हे तीन खेळाडू जास्त गोल करायचे आणि त्यामुळ ते जरा जास्त फेमस असायचे.

अशातच योगायोगाने पेले , मॅराडोना या सारख्या फुटबॉलमधल्या बेस्ट खेळाडूंनी १० नंबर जर्सी घातल्यामुळे हा नंबर लीजंडरी बनला. ह्याच परंपरेला क्रिकेटमध्ये फॉलो केल गेल.

सचिन तेंडूलकर जगातला सर्वात बेस्ट अशी आपल्या भारतीयांची श्रद्धा होती म्हणून त्याला १० नंबर घालण्यात आला. पाकिस्तान्याची अंधश्रद्धा हुती की शहीद आफ्रिदी त्यांचा सचिन आहे. त्यांनी त्याला १० नंबर घातला.

बाकीचे कमी म्हत्वाचे खेळाडू आपापला नंबर निवडू लागले. आता या मागं कोणाच काय काय लॉजिक असेल काय सांगता येत नाही. धोनी युवराज सारख्यांनी आपल्या वाढदिवसावरन आपल्या जर्सीचा नबर ७ आणि १२ निवडला. विराट कोहली आपल्या पपांच्या बड्डे वरन १८ नंबर निवडला. काही प्लेयर आपल्या शाळेतल्या रोल नंबर वरण तर काही जण आपल्या नटीच्या रोल नंबरवरण आपला जर्सी निवडू लागले.

बरेच खेळाडूनी आपल्या सवयीप्रमाणे आकडेमोडीचा अंधश्रद्धेचा खेळ सुरु केला. बाकी काही नाही पण लकी जर्सी मूळ आपल्या रना होत्यात काय बघितल जावू लागल. नावाच स्पेलिंग बदलवणाऱ्या न्युमरोलोजिस्ट लोकांचा धंधा वाढला. लाखोंची फी घेऊन एक आकडा लावून दिला जाऊ लागला.

असाच किस्सा वीरेंद्र सेहवाग बरोबर झाला. सेहवागचा नंबर ४४ होता. एकदा त्याच्या आईने(तीच ती रिलायन्स फोनच्या जाहिरातीत मॅच चालू असताना पोराला फोन करून करलो दुनिया मुठ्ठी मै असा संदेश देणारी ) सेहवागला रना काढत नाही म्हणून एकदा अशाच ज्योतिषाकडे नेले. त्या बाबान सेहवागच्या जर्सीचा नंबर बदलायाचा सल्ला दिला. 

सेहवागच्या जर्सीचा नंबर बदलला आणि त्याचा फोर्म अजून गंडला. आता विरू म्हणजे आडव्या डोक्याचा प्राणी. ते चिडल. तिथन पुढ त्यान कधीच नंबरवाली जर्सीच घातली नाही. सेहवागच्या बिननंबरच्या जर्सी मूळ आयसीसी चिडली. पण विरू म्हणजे विरू .ते म्हणल,

एक बार अपुन ने कमिटमेंट करदी तो आपने आप की भी नही सुनता.

sehwag

सचिनला सुद्धा बेजान दारूवालाने नंबर १०चा ९९ करायला लावला होता. पण तेंडल्या थोड दिवस बघितला आणि गप्प आपल्या १० नंबर वर आला.

जगात पण असे लई आयटम झाले जर्सीवाले. उदाहरणार्थ ख्रिस गेल. भाऊचं सगळ कामच डोंगराएवढ. त्याचा जर्सी नंबर ३३३. तीन आकडी जर्सी नंबर त्यान टेस्टमध्ये त्याच्या हायेस्ट स्कोर वरन घेतला. अश्ले प्रिन्स नावाचा दक्षिण आफ्रिकेचा गडी, त्याचा नंबर हुता ५+० !! क्रोन्जेला रिस्पेक्ट म्हणून त्यान हा नंबर घेतला. एकदा हर्षल गिब्ज तर शून्य नंबरचा जर्सी घालून उतरला होता.

 आयपीएल मध्ये तर आकड्यांचा मोठा बाजार दिसतोय पण फक्त धोण्याचा ७ नंबर तेवढाच रिस्पेक्ट मिळवलाय.

किती नंबर आले आणि गेले पण सचिनच्या १० नंबरचा दरारा शेवट पर्यंत टिकला. तो रिटायर झाल्यावर शार्दुल ठाकूरन १० नंबर घेतला आपल्या जर्सीचा. आता उभ्या भारताची भावना दुखावली. दंगली व्हायच्या बाकी हुत्या.लोकांनी ठाकूरला लई शिव्या घातल्या. बिचाऱ्याला गप्प नंबर बदलायला लागला.

म्हणजे काय बीसीसीआयन हळूच कोपर्यात नेऊन त्याला आणि टीमला सांगितल,

भावानो आपण ह्यो डेंजर दहा नंबर रिटायर करूया. उगीच त्याच्या नादाला न लागता गप्प मैदानातल्या रनांचा नंबर वाढवता येईल ते बघा. सचिनचा दहा नंबर पाहिजे तर त्याच्या सारख १०० शतक मारा म्हणजे तुम्हाला देतो. काय?

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.