जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू !
‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’! असा मजुकर असलेला फ्लेक्स सध्या सोशलमिडीयावर फिरतांना दिसत आहेत. काही दारूड्यांना राग आला असेल, च्यायला निवडणुकीच्या येळेसच नवीन ब्रॅण्ड प्यायला भेटतोय. जिभेचे चोचले पुर्ण होतेत. अजून एक पेग घ्या म्हणून आमदार- खासदार साहेबच विंनती करतेत.
अन् आता असला आगाऊपणा आणि आमच्या पोटावर पाय द्यायची हिंमत ह्या बायका करत्यात म्हणल्यावर काही दारूड्यांचा मर्दपणा जागा झाला असेल. पण ते काही का असेना पण असे फ्लेक्स लावलेत ही तर अभिमानाचीच गोष्ट आहे.
मात्र असा कोणता राजकारणी आहे बाबा त्यो निवडणुकीच्या तोंडावर असे फ्लेक्स लावून जनजागृती करेल? असा प्रश्न आम्हालाबी पडला. कारण ह्या असल्या राजकारण्याचं संधान तर ह्या दारूवरच असतं की, निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना फुकटात भिंगरी, संत्रा, किंवा गावठी दारू रट्टावून पाजायची अन् त्यांची मत आपल्या खिशात घालायची.
प्रश्न पडला म्हणल्यावर उत्तर शोधलच पाहिजे की, म्हणून आम्ही शोधाशोध सुरू केली. दोन चार फोन घुमवले. कुठं? केव्हा? कोणी? का? असली सगळी ए टू झेड माहिती मिळवलीय.
झालं असं की, नुकत्याच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज सुद्धा भरलेत. पार प्रचाराची रणधुमाळी उडालीय. अन् अशा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मतदारांना आमिष दाखवलं जातात.
त्यांना फुकटात पोटभर दारू पाजून खुश केलं जातं. आणि मत खिशात घातली जातात. हे कुठंतरी थांबावं, मतदारांनी जागृत व्हावं म्हणून
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्हय़ात मुक्तिपथ हे अभियान तीव्र करण्यात आलं आहे.
तंबाखू आणि दारूमुक्त करण्यासाठी मुक्तीपथ अभियान गडचिरोलीमध्ये काम करतंय. महाराष्ट्र सरकार, टाटा ट्रस्ट आणि सर्च अशा संस्थेचा माध्यमातून ही दारूमुक्तीसाठी मुक्तीपथ अभियान चालवलं जात आहे.
या अभियानाशी जोडलेल्या पराग मगर यांच्याशी आम्ही बोललो तेव्हा ते म्हणाले, गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे. मात्र अवैध मार्गानं हे सगळं चालतं. त्यातच निवडणुका जाहीर झाल्यामुळे दारूचं प्रमाण वाढेल. दारू पाजून मतदारांना वळवलं जाईल. हे होऊ नये त्यांनी आपलं अमुल्य असं मत शुद्धीत राहून द्यावं, म्हणून ही जनजागृती मोहिम आम्ही हाती घेतलेली आहे.
मुळात या दरम्यान माणसं मोठ्या प्रमाणात दारू पितात. घरी येवून धिंगाणा घालतात. कुटुंबाचे हाल होतात. त्यामुळे महिलांचा सहभाग या अभियानात मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे,
‘दारू पिऊन मतदान करू नका’, ‘ही निवडणुक दारू मुक्त निवडणूक’, ‘दोन पैशांची दारू घेऊन अमुल्य असं मत देऊ नका’, ‘जो पाजील माझ्या नवऱ्य़ाला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’,
अशा स्लोगनचे फ्लेक्स आम्ही गडचिरोलीच्या अनेक गावात आणि तालुक्यात लावले आहेत. गावोगावी जाऊन मुक्तीपथ अभियान आम्ही तिव्र करत आहोत.
खरं तर गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असली तरी अवैध मार्गानं ह्या गोष्टी अजूूनही सुरू आहेत. याचाच फायदा निवडणुकीच्या काळात घेऊन मतदारांना भुलवलं जातं. त्यामुळे हे होऊ नये. मतदारांनी आपलं अमुल्य मत योग्य त्याच उमेदवाराला द्यावं. तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर भारताच्या उज्वल भविष्यासाठी करा, असं आवाहन डाॅ. अभय बंग यांनी केलेलं आहे.
त्यामुळे मुक्तीपथ अभियानाच्या जनजागृतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूमुक्त निवडणुक पार पडलेच. आणि जर कोणत्या शेठनं मत मिळावं म्हणून कोणाला दारू पाजली तर त्यांच्या बायका शेठला निवडणुकीत गाडतच असतात.
पण कार्यकर्त्यांनो ह्या निवडणुकीत तुम्ही भी असली फुकटात भेटतीय म्हणून पिऊ नका आपलं लाखमोलाचं मत दारूचं अमिष दाखवणाऱ्या राजकारण्यांना देऊ नका.