शनिवारवाड्यावरचा ‘युनियन जॅक’ उतरवून तिरंगा कोणी फडकवला…?

‘शनिवारवाडा’ म्हणजे मराठा सत्तेचे प्रतीक!

‘दिल्लीचेही तख्त राखणारे’ मराठा साम्राज्य!

पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे आणि महादजी शिंद्यानी याच शनिवारवाड्यातून देशाचं राजकारण केलं. अटकेपार झेंडे लावले. पण इंग्रजांच्या उदयानंतर मराठा शक्ती क्षीण होत गेली. जशी सत्ता क्षीण झाली तशी एकेकाळी वैभवाची शिखरे पाहिलेल्या शनिवारवाड्याची कळा गेली. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात तर या ऱ्हासाचा वेग आणखीनच वाढला.

तिसऱ्या ‘अँग्लो-मराठा’ युद्धानंतर दुसरा बाजीराव पुणे सोडून पळून गेला आणि १७ नोव्हेम्बर १८१७ या दिवशी ब्रिटिशांनी पुणे जिंकले. शिवाजी महाराजांनी ज्या मराठा रियासतीचा पाया रचला होता ते मराठा राज्य अस्ताला गेले. त्याच दिवशी, जवळजवळ शंभर वर्षे डौलाने फडकत असलेला तो मराठा राज्याचा ‘भगवा’ झेंडा शनिवारवाड्यावरून उतरवला गेला आणि ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ त्या ठिकाणी फडकू लागला.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा ‘युनियन जॅक’ फडकविण्याचे काम एका स्वकीयानेच केले, तो म्हणजे बाळाजीपंत नातू !

मराठेशाहीचा अस्त झाला तोच इंग्रजांच्या भारत विजयाचा दिवस मानला जातो. १८१८ पासून संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचे राज्य सुरु झाले. याबरोबरच सुरु झाला देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठीचा स्वातंत्र्यलढा.

उमाजी नाईक, मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून सुरु झालेल्या स्वातंत्र्याच्या लढाईत पुढे टिळक, गांधी, भगतसिंग यांच्यापर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केला. संसदीय आणि क्रांतिकारी मार्गाने हा लढा भारतीयांनी लढला. अखेर १३० वर्षांची काळरात्र संपून १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्याचा मंगल दिवस उजाडला.

१४ ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच शनिवारवाड्यासमोर अथांग जनसागर लोटला होता. १५ ऑगस्टची तयारी सर्व भारतभर अगोदरच सुरु झाली होती. पुणे शहरात रस्त्यारस्त्यांवर  रोषणाई होती. शनिवारवाड्याच्या सर्व बाजूंनी दिवे लावले गेले होते.

आचार्य अत्रे, पुण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव सणस व्यासपीठावर होते. रात्र चढत गेली, वक्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. १४ ऑगस्टच्या रात्रीचे बारा वाजत आले. त्याचवेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या पहिलवानी चालीने शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजावर चढले. रात्री बाराच्या ठोक्याला त्यांनी त्यांच्या पहाडी आवाजात घोषणा दिली “भारत माता कि जय”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”.

nana patil
क्रांतिसिंह नाना पाटील

समोरच्या जनसागराच्या जयजयकाराने सारे शहर दुमदुमले. क्रांतिसिंह नाना पाटलांनी दिल्ली दरवाजावरील ‘युनियन जॅक’ उतरवला आणि अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज शनिवारवाड्यावर फडकवला. पुन्हा एकदा भारत “भारत माता की जय” अशी घोषणा दिली. शनिवारवाड्याच्या नगारखान्यातील नगारे, चौघडे, शिंगे यांचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला. भारत स्वतंत्र झाला!

ज्या क्षणी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू संसदेत बोलायला उभे राहिले त्याच वेळी नाना पाटलांनी शनिवारवाड्यासमोर एक भावनेने ओथंबलेले भाषण केले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि त्यांचा कंठ दाटून आला होता.

नाना पाटलांनी प्रतिसरकारच्या रूपाने, छत्रपती शिवरायांच्याच गनिमी काव्याच्या मार्गाने बलाढ्य इंग्रजी सत्तेला धूळ चारली होती . एक मोठा क्रांतिकारी लढा देऊन ब्रिटिश सत्तेला गुडघे टेकायला भाग पाडले होते. शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या प्रत्येक सभेच्या घोषणेत ते शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत सभेची सुरुवात करीत असत.

इंग्रजांनी मराठ्यांच्या राज्यावरील भगवा काढून तिथे युनियन जॅक फडकवला, तर नाना पाटलांसारख्या शिवरायांच्या एका ‘मावळ्याने’ तो युनियन जॅक उतरवून तिथे स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला हा नुसता योगायोग नव्हता तर ‘फार फार वर्षांपूर्वी नियतीशी केलेला तो एक करार होता.

-रणजीत यादव

 

 

2 Comments
  1. devendra says

    khare swatatraveer …

Leave A Reply

Your email address will not be published.