क्रेडिट कार्ड वाल्यांपासून घर विकणाऱ्यांपर्यंत, टेलीकॉलर्सना आपला फोन नंबर देतं कोण..?

त्यादिवशी घरात जेवत असतानाच एक फोन आला, स्पीकरवर टाकून बोलायला सुरुवात केली. पलीकडच्या ताई गोड आवाजात म्हणाल्या, ‘सर आमच्याकडे पहिली ते चौथीचे क्लासेस सूरू झालेत. तुमच्या मुलांना ऍडमिशन घ्यायची असेल, तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.’ घरचे इतक्या डेंजर नजरेनं बघायला लागले की सांगायला नको. पोरगं इतके दिवस लग्नाला नाही का म्हणतंय याचा वेगळाच डाऊट त्यांना आला.

हे फक्त एकाच्याच आयुष्यात घडतं असं नाही, असे लई कार्यकर्ते आहोत ज्यांना टेलिकॉलर्सच्या फोननी हैराण केलेलं असतं, आपण डीएनडीला नंबर टाकलेला असतो, नंबर ब्लॉक करायला ॲप्स घेतलेली असतात, पण आपल्याला येणारे फोन काय थांबत नाहीत.

तुम्ही जरा कुठं शॉपिंगला जाऊन आलात की, पुढच्या दोन दिवसात क्रेडिट कार्ड वाल्यांचा हमखास फोन येतो. ऑनलाईन घर बघत असलात, तर इस्टेस्ट एजंट लोकांचा फोन यायला सुरुवात होते.

पण या सगळ्या जनतेला आपला फोन नंबर मिळतो कुठून? त्यांना नंबर देतं कोण?

साधा विचार करा, आपण आपला नंबर देतो कुठे कुठे? एखादं ॲप डाऊनलोड करताना तिथं नंबर टाकतो. कुठली खरेदी करायला गेलो की, तिथं नंबर देऊन येतो. मग इथून आपला नंबर फिरायला लागतो…

एखाद्या ठिकाणी नंबर देताना तो नंबर का द्यायचाय, कशासाठी द्यायचाय हे प्रश्न विचारत बसत नाही. इथंच आपण चुकतो. त्या नंबरचं काय होतं, तर आपल्या वयोगट, आर्थिक सुबत्ता, खरेदी करण्याच्या सवयी यांच्यानुसार नंबर वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जातो. ज्या कंपन्यांना या डेटाबेसमधून फायदा असतोय, ते हा डेटाबेस विकत घेतात. सोबतच काही ऑनलाईन साईट्सवर असे डेटाबेस फुकटही मिळतात.

हे नंबर विकत घेणाऱ्यांचा उद्देश फक्त मार्केटिंग करणं हाच असतो असं नाही, तर आपल्याला ज्या फेक लिंक्स येतात, त्याही याच नंबरवरून. ज्यावर आपण क्लिक केलं की, बँक अकाऊंटमधनं पैसे गायब होतात.

या लिंकवाल्यांचाही एक वेगळा विषय असतो, समजा तुम्हाला एका नंबरवरुन लिंक आली आणि तुम्ही क्लिक केली नाही; की तुमचा नंबर दुसरीकडे जातो आणि मग त्या नंबरवरुन तुम्हाला पुन्हा लिंक येते.

कंपनीकडे आपला नंबर मागण्याची अनेक कारणं असतात, प्रॉडक्टच्या गॅरंटी वॉरंटी पासून, युझर एक्सपिरियन्स पर्यंत बरीच काही. मात्र आपला नंबर ते का घेतायत, त्याचं ते पुढं काय करणार याबद्दल फार कमी कंपन्या पूर्ण माहिती देतात.

एखादं ॲप असेल, तर त्याच्या नियम आणि अटी इतक्या मोठ्या असतात की आपण सगळ्या न वाचताच त्यावर क्लिक करतो आणि मग आपला नंबर वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जातो.

ट्रूकॉलरनं केलेल्या एका संशोधनात २०२१ मध्ये स्पॅम कॉल्सनं बाजार उठलेल्यांच्या देशात भारताचा क्रमांक चौथा होता. त्याआधीच्या वर्षी हा क्रमांक नववा होता, पण लॉकडाऊन दरम्यान या अशा फोन कॉल्सचं प्रमाण प्रचंड वाढलं. या संशोधनानुसार एका दिवसाला ६ लाख ६४ हजार टेलिमार्केटिंग, स्कॅम आणि स्पॅम कॉल्स केले गेले होते.

थोडक्यात पार झेरॉक्सच्या दुकानापासून ते कार शोरुमपर्यंत आणि चहाच्या टपरीपासून पिझ्झा आऊटलेटपर्यंत, साध्या मोबाइल गेमपासून बँकिंगच्या ॲपपर्यंत,  जिथं जिथं आपण आपला नंबर देतो, तिथून तो बाहेर टेलीमार्केटिंग आणि फ्रॉड वाल्यांकडे विकला जाण्याची पूर्ण शक्यता असते.

या सगळ्याबाबत केंद्र सरकार आगामी माहिती सुरक्षा विधेयकात काय भूमिका घेणार आणि त्यामध्ये या सगळ्याला आळा घालता येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसऱ्या बाजूला आपला नंबर आणि खाजगी माहिती विकली म्हणून आपण एखाद्या कंपनीवर कारवाई करु शकतो का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबत बोल भिडूनं काही कायदेतज्ञांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की,

“जर तुमचा नंबर कुणी तुमच्या परवानगीशिवाय विकला असेल, तर तुम्ही त्याबाबत TRAI कडे तक्रार करु शकता. नंबर विकणं हा तुमच्या खाजगीपणाच्या अधिकाराचा भंग आहे. सुप्रीम कोर्टानंही जर एखादी कंपनी नंबर लीक करत असेल, तर त्यांच्यावर करावी करण्याचे आदेश TRAI ला दिलेले आहेत.”

थोडक्यात काय, तर जिथं कुठं नंबर द्याल जरा जपूनच द्या, नायतर नये दोस्त बनाने के लिए दो दबाए  ऐकून २ दाबाल आणि अकाउंटमधले पैसे एंजल प्रियाला देऊन बसाल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.