वल्लभभाई पटेलांना सरदार हि पदवी कोणी दिली होती……

भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे वल्लभभाई पटेल शाळेतसुद्धा तितकेच बंडखोर होते. त्यांच्या शाळेतल्या कारवाया बघूनच ते पुढे काहीतरी मोठं काम करणार याची प्रचिती आली होती. पण वल्लभभाई पटेल यांना सरदार हि पदवी कुणी दिली ? त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

लहानपणापासूनच सरदार पटेल हे आक्रमक स्वभावाचे होते. शाळेत असताना आपल्या बंडखोरपणाचा हिसका त्यांनी सगळ्या शाळेला दाखवला होता. एक किस्सा आहे त्यांच्या शाळेतल्या काळाचा. हा तो काळ होता जेव्हा वल्लभभाई पटेल हे प्राथमिक शिक्षण घेत होते. तेव्हा नियम होता कि विद्यार्थ्यांना पुस्तक आणि लिखाणाचं साहित्य हे शिक्षकांकडून खरेदी करावं लागत असे. सरदार पटेलांना हि गोष्ट अजिबात आवडली नव्हती. त्यामुळे त्यांना शाळेचा राग येऊ लागला होता.

पटेलांनी शाळेतली मुलं एकत्र केली त्यांना आपला मनोदय सांगितला आणि शाळेमध्येच आंदोलन सुरु केलं. सुरवातीला शाळेतल्या शिक्षकांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. पण हे आंदोलन तब्बल ६ दिवस चाललं यात वल्लभभाई पटेलांची आक्रमकता बघून शिक्षक लोकं वठणीवर आले. या आंदोलनापुढे शिक्षकांनी हार मानली आणि आपले नियम विद्यार्थ्यांवर लादणे बंद करण्यात आलं. हे सगळ्यात सुरवातीचं यश वल्लभभाई पटेल यांचं होतं.

दुसरा किस्सा आहे वल्लभभाई पटेल यांना सरदार हि पदवी कोणी दिली. १९२८ सालची हि गोष्ट. ब्रिटिश सरकारने गुजरातमध्ये शेतकऱ्यांवर जास्तीचा शेतसारा वसूल करण्याकडे आपला मोर्चाचे वळवला. इतका कर भरणं शेतकऱ्यांना शक्यच नव्हतं आणि याच्याविरुद्ध वल्लभभाईंनी मोहीम उघडली. या जबरदस्तीने कर वसूल करण्यास पटेलांचा विरोध होता.

बारदोलीमध्ये ब्रिटिशांविरोधात आंदोलनाला वल्लभभाई पटेलांनी सुरवात केली. या आदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता आणि इंग्रजांना थोपण्याचा हा काळ होता. सुरवातीला ब्रिटिश सरकारनेही वल्लभभाई पटेल यांना दुर्लक्ष केलं पण आंदोलनातील तीव्रता बघून ब्रिटिशाना हार मानवी लागली. पटेलांचा आक्रमक रूप बघून आणि आंदोलन भडकण्याची चिन्ह दिसताच ब्रिटिशांनी शेतसारा किंमत घटवून अगदी शेतकऱ्यांना परवडेल तिथपर्यंत कमी केली. 

या आंदोलनाला मोठा जमाव आलेला होता. स्थानिकांचा यात सहभाग तर होताच शिवाय यात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता. बारदोलीमधल्या महिलांनी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या वल्लभभाई पटेल यांना पदवी दिली आणि ती पदवी होती सरदार. पुढे वल्लभभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल झाले.

महात्मा गांधीजींचा पटेलांवर मोठा प्रभाव होता आणि गांधीजींचे ते जवळचे सहकारी होते. अनेक आंदोलनांमध्ये सरदार पटेलांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आज सरदार हि पदवी वल्लभभाई पटेल यांच्या नावापुढे आदराने लावली जाते. अगदी शाळकरी वयापासूनच त्यांच्यातला बंडखोरपणा दिसत गेला आणि पुढे ते स्वातंत्र्यलढ्यातले सगळ्यात मोठे नेते बनले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.