राम मंदीराच्या नावाने तुमची फसवणूक तर होत नाही ना.? जाणून घ्या वर्गणी कोणाला द्यावी..?

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशभरात राम मंदिर उभारण्यासाठी विविध पातळींवर काम सुरु झाले. मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन समारंभ देखील पार पडला. त्यानंतर आता मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे.

या मंदिराच्या बांधकामाची संपूर्ण जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारकडून  महंत नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या श्रीराम जन्म भूमी न्यासाकडे देण्यात आली आहे. एकूण १५ सदस्य असलेल्या या न्यासामध्ये विश्व हिंदू परिषदेचा या मुख्य सहभाग आहे.

मंदिराच्या खर्चाबाबत खजिनदार गिरीराज महाराज यांनी ‘बिझनेस टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार इतर काम वगळून प्रत्यक्ष मंदिरासाठी ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर इतर खर्च पकडून एकूण ११०० कोटी रुपयांचं बजेट प्रस्तावित आहे.

हे पैसे उभे करण्यासाठी देशभरातील आणि देशाबाहेरच्या भक्तांकडून निधी संकलन अभियानाला १५ जानेवारी २०२१ पासून सुरुवात झाली आहे. त्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ५ लाख १०० रुपयांची देणगी देऊन या अभियानाचा शुभारंभ केला. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग, इतर अनेक नेते आणि मंत्री यांनी देखील यासाठी निधी दान केला आहे.

आता पर्यंत १०० कोटीच्या वर निधी जमा झाला असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे. त्यानंतर देशातील ५ लाख शहरात आणि गावात जाऊन हा निधी ऐच्छिक स्वरूपात गोळा केला जात आहे. २७ फेब्रुवारी पर्यंत हे अभियान चालणार आहे.

याच दरम्यान उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये मंदिरच्या देणगी वरून अनेकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ‘राष्ट्रीय बजरंग दल’ या नकली आणि अधिकार नसलेल्या संघटनेने राम मंदिराच्या नावावर देणगी मागण्यास सुरुवात केली होती. राम मंदिर निधी समर्पण समितीचे मंत्री प्रभात गोयल यांच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात यासंबंधी तक्रार दाखल केली होती.

त्या आधारावर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र हा प्रकार बाहेर आल्यानंतर आता नागरिकांकडून प्रश्न विचारला जात आहे की मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे आहे? की कोणीही व्यक्ती किंवा हिंदुत्ववादी संघटना श्रीरामाचा आणि मंदिराचा फोटो असलेलं पावती पुस्तक घेऊन आल्यास त्याला देणगी द्यायची आहे का?

तर असं अजिबात नाही.

मग हा निधी गोळा करण्याचा अधिकार कोणाला?

वर उल्लेख केलेल्या राम मंदिर न्यासाकडेच अर्थात या ट्रस्टकडे निधी गोळा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे या निधी संकलन अभियानाची जबाबदारी असून विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित इतर संस्था यांच्या मार्फत हे अभियान कार्यान्वित करण्यात आले आहे.

व्यवस्था कशी आहे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातल्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या शहरांसाठी एक ठराविक रचना बनवली आहे, ज्या भागात हा निधी गोळा केला जात आहे तिथं एक निश्चित अशी टीम तयार केली आहे. त्याचे पदाधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. कोणी एक व्यक्ती कधीच हा निधी गोळा करण्यासाठी येत नाही.

कुपन कसे आहेत?

वर उल्लेख केलेल्या मुरादाबाद मध्ये २१ आणि २५ रुपये असे पर्याय असलेल्या पावत्या घेऊन निधी गोळा करण्यात आला होता. पण श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जी अधिकृत पावती तयार केली आहे, ती अनुक्रमे १०, १०० आणि १ हजार रुपये अशा स्वरूपाची आहे.

त्यावर ट्रस्टचे नाव, राम मंदिराचा आणि श्री रामाचा फोटो, कोषाध्यक्ष म्हणून गोविंद गिरी महाराज यांची सही आणि १०, १००, १००० रुपये असे उल्लेख असलेले कुपन देण्यात येत आहेत. तर २ हजारच्या वरील देणगीसाठी पावती देण्यात येत आहे.

स्थानिक पातळीवर व्यवस्था कशी आहे?

स्थानिक पातळीवर बघायचं झाल्यास पुण्याच्या उदाहरणावरून आपण समजू शकतो. इथं प्रत्येक भागासाठी म्हणजे कसाबा भागासाठी, महात्मा फुले भागासाठी वेगळी अशी व्यवस्था उभी केली आहे,  आणि त्यांना प्रत्येकांना ओळखपत्र देण्यात आलं आहे, अशी माहिती निधी संकलन अभियानांचे आशिष लाड यांनी दिली.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.