पुण्यात जन्मलेला माणूस वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पोहोचलाय

वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष असलेले डेविड मालपास यांनी साधारण आठवड्याभरापुर्वी राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांची टर्म संपण्याच्या आधीच ते पद सोडणार असल्यानं चर्चा सुरू झाली ती नवे अध्यक्ष कोण होणार याची. या चर्चेमुळं सगळ्यांचं लक्ष लागलं ते अमेरिकेकडं. आता अमेरिकेकडं लक्ष लागण्याचं कारण ही तसंच आहे.

वर्ल्ड बँक ग्रूपमध्ये अमेरिकेचे सर्वाधिक १७.२५ टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे अमेरिका ज्या व्यक्तिला या वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये उमेदवारी देते तो माणूस वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष होतो हा सर्वसाधारण इतिहास आहे.

२३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यासंदर्भातली देशाची भुमिका स्पष्ट करत मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बांगा यांचं नाव जाहीर केलं. बायडेन यांनी म्हटलंय,

“अजय बांगा यांना ग्लोबल कंपनीज चालवण्याचा ३० वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे.”

हे अजय बांगा कोण आहेत? हे बघुया.

बांगांचा जन्म हा पुण्यात झालाय.

आता अमेरिकेचं रहिवास्य स्विकारलेले अजय बांगा यांचा जन्म मुळात भारतात झालाय. नुसता भारतातच नाही तर आपल्या महाराष्ट्रात, आपल्या पुण्यात झालाय. अजय बांगा यांचे वडील हरभजन सिंग बांगा हे भारतीय सैन्यात होते. त्यावेळी हरभजन सिंग यांची पोस्टींग पुण्यातल्या खडकी कंटेन्मेंट झोनमध्ये झालेली. या पोस्टींग दरम्यानच अजय बांगा यांचा जन्म झाला.

पुढे हरभजन सिंग यांची पोस्टींग बदलली.

अजय बांगा हे ही आपल्या वडिलांच्या पोस्टींगप्रमाणे हैद्राबादला आले. त्यामुळं, अजय बांगा यांचं शालेय शिक्षण हे हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण झालं. यानंतर दिल्ली युनिव्हर्सीटीतल्या सेंट स्टीफंस महाविद्यायात त्यांनी प्रवेश मिळवला.

सेंट स्टीफंसमधून इकोनॉमिक्सचं पदवीचं शिक्षण घेतलं त्यानंतर मॅनेजमेंट स्टडीज साठी त्यांनी अहमदाबाद इथल्या इंडीयन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं.

नेसले कंपनीतून कामाला सुरूवात केली.

१९८१ साली त्यांनी कामाला सुरूवात केली ती नेसले कंपनीमधून. त्यानंतर, पुढची साधारण १३ वर्ष त्यांनी नेसले साठी सेल्स, मार्केटींग अशा विविध डीपार्टमेंट्समध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी पेप्सीको या फूड कंपनीसाठीही काम केलं. शिवाय रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स या कंपन्यांमध्येही त्यांनी काम केलंय.

त्यानंतर २००९ साली मास्टर कार्ड या कंपनीसाठी त्यांनी काम सुरू केलं. मास्टर कार्डचे सीईओ म्हणूनही त्यांनी काम केलंय.
जवळपा १३ वर्ष मास्टरकार्डसाठी काम केल्यानंतर २०२१ साली त्यांनी मास्टर कार्डला राम राम करत एका प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक फर्ममध्ये काम सुरू केलं. सध्या ते याच कंपनीत व्हाईस चेअरमन या पदावर कार्यरत आहेत.

२०१५ साली बराक ओबामा यांनी बांगा यांना व्यवसाय व्यापार धोरणासंबंधित समितीमध्येही घेतलं होतं.

याशिवाय, राष्ट्राध्यक्ष कार्यालयासोबत पार्टनरशिप फॉर सेंट्रल अमेरिका या एनजीओसाठीही त्यांनी काम केलंय. ही एनजीओ मुख्यत: नागरिकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत कशाप्रकारे करता येईल यासाठी काम करते. तसंच मध्य अमेरिकेत खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हा या एनजीओचा उद्देश आहे जेणेकरून अमेरिकेकडे येणाऱ्या स्थलांतरितांच्या गर्दीला आळा घालता येईल.

जाणकारांचं असं म्हणणं आहे की, अजय बांगा हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष झाल्यास त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर ते प्रायव्हेट सेक्टरला सोबत घेऊन चांगलं काम करू शकतील.

आता जाणकारांच्या म्हणण्यानुसार ते चांगलं काम करू शकतील का नाही हे त्यांची निवड होऊन त्यांनी काम सुरू केल्यानंतरच स्पष्ट होईल, पण वर्ल्ड बँक नेमकं काय करते ते थोडक्यात बघुया.

वर्ल्ड बँकेच्या वेबसाईटवर म्हटलंय,

“जगभरातून गरिबी संपवणं आणि सर्वांच्या विकासाला चालना देणं हे वर्ल्ड बँकेचं मुख्य उद्दिष्ट आहे.”

बांगा यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा थेट अनुभव नसल्यामुळं, त्यांच्यासाठी अध्यक्षपद मिळाल्यनंतर यशस्वीरित्या काम करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. दुसरीकडे काही देश हे सध्या कर्जामध्ये बुडालेत. त्या देशांना मदत करणं हे ही एक मोठं आव्हान असणार आहे. वातावरण बदल ही समस्या सोडवणंही वर्ल्ड बँकेच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. असं असताना या क्षेत्रातला अनुभव नसताना हे सारं करणं बांगा यांच्यासाठी जड जाऊ शकतंय.

दरम्यान, अमेरिकेने उमेदवार म्हणून अजय बांगा यांचं नाव जाहीर केल्यामुळं, त्यांचीच निवड होणार हे निश्चित असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आहे. त्यामुळं, २०१६ साली पद्मश्री मिळालेल्या बांगांच्या निमित्तानं वर्ल्ड बँकेला पहिले भारतीय वंशाचे अध्यक्ष मिळतील असं चित्र दिसतंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.