आणि नागपूरचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले…
जून २०२२ मध्ये राज्यात बंड झालं, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युतीचं सरकार आलं. राज्यात जे काही सत्तानाट्य रंगलं त्यानंतर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकाच मंचावर हसतखेळत दिसतील, असं वाटण्याची शक्यता फार कमी होती. फक्त पवार आणि शिंदे-फडणवीसच नाही, तर त्याच मंचावर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईक ही उपस्थित राहिले.
हे सगळं शक्य झालं, ते मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात MCA च्या निवडणुकांमुळे.
भारतातलं सगळ्यात श्रीमंत स्टेट क्रिकेट असोसिएशन अशी ओळख असणाऱ्या एमसीएचा कारभार जितका क्रिकेटर्सनं हाकला नसेल, तितका राजकारण्यांनी हाकला. यंदाच्या एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांचं पॅनल विरुद्ध शरद पवारांचं पॅनल अशी लढाई होण्याची चर्चा होती.
शरद पवार पॅनलकडून भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील हे अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील आणि त्यांचा सामना आशिष शेलारांविरुद्ध होईल हे जवळपास नक्की मानलं जात होतं.
मात्र इथंही ट्विस्ट आला आणि शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र आले. त्यामुळं या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे क्रिकेटर्स विरुद्ध राजकारणी अशी लढाई म्हणून पाहिलं जाऊ लागलं. त्यात आशिष शेलार बीसीसीआयचे खजिनदार झाले, त्यामुळं त्यांच्या पॅनलनं उमेदवार बदलला. आता सामना रंगेल, माजी क्रिकेटर संदीप पाटील विरुद्ध शेलार-पवार पॅनलचे उमेदवार अमोल काळे.
या निम्मितानं प्रश्न विचारले जातायत की, अमोल काळे कोण आहेत ? आणि त्यांच्यावर ‘उपरे’ असल्याचा आरोप का होतोय ?
अमोल काळे हे मूळचे नागपूरकर. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लहानपणापासूनचे मित्र. काळे राजकारणात थेटपणे सक्रिय नसले, तरी राजकारण्यांशी त्यांचा संबंध जुनाच आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात नागपूर महापालिकेपासून केली. त्यांच्या जे. के. सोल्युशन या कंपनीला नागपूरच्या रस्त्यांवर एलईडी लाईट्स बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. पण यावरुन बराच गदारोळ झाला आणि काळेंच्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट सोडावं लागलं.
यानंतर काळेंनी रियल इस्टेट, हेल्थ केअर, आयटी, मीडिया मॅनेजमेन्ट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कंपन्यांचा विस्तार केला. २०१९ मध्ये ते तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही झाले.
पण त्यांचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत आलं ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर.
याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप अमोल काळे यांचं नाव घेऊन केले. ‘Who is Amol Kale ?’ हा संजय राऊतांचा प्रश्न तेव्हा चांगलाच गाजला होता.
सध्या अमोल काळे चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत ते एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळं…
त्यांच्यासमोर उमेदवार म्हणून उभे आहेत, भारताचे माजी क्रिकेटर आणि वर्ल्डकप विनर संदीप पाटील. हा सामना क्रिकेटर विरुद्ध नॉन क्रिकेटर होतोय आणि अमोल काळेंच्या पॅनलचं राजकीय वजन पाहता ही लढाई राजकारणी विरुद्ध क्रिकेटर अशीच असल्याची चर्चा रंगली आहे. पण अमोल काळे आणि एमसीए ही सूत्रं पहिल्यांदाच जुळली आहेत का ? तर नाही.
२०१९ मध्ये एमसीएच्या निवडणुका झाल्या, तेव्हा अमोल काळे बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांनी एमसीएमध्ये अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या बाळ महादळकर गटाकडून अर्ज भरला होता. मात्र त्यांच्या या निवडीवरुनही वादाची ठिणगी उडाली होती.
काळे यांच्यावर आरोप करण्यात आले की, ‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच त्यांना हे पद मिळालं. नाहीतर नागपूरच्या माणसाचा मुंबई क्रिकेट असोसिएशनशी काय संबंध ?’ मात्र काळे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले.
तेव्हा मुंबईच्या फ्रेंड्स युनियन स्पोर्ट्स क्लबचं काळे यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. तेव्हा त्यांनी असंही सांगितलं की, ‘मी मागच्या काही वर्षांपासूनच मुंबईत स्थायिक झालो आहे, फडणवीस माझे मित्र असले तरी त्यांचा यात काहीही सहभाग नाही. मी मागच्या अनेक वर्षांपासून एमसीएशी संबंधित आहे. पण आत्ता निवडणूका झाल्या आणि त्यामुळं मला प्रशासनात काम करण्याची संधी मिळाली.’
२०१९ ते २०२२ अशी पूर्ण टर्म त्यांनी एमसीएचे उपाध्यक्ष म्हणून पार पाडली आणि जेव्हा नव्यानं निवडणूका जाहीर झाल्या तेव्हा पुन्हा एकदा अमोल काळे हे नाव चर्चेत आलं.
सुरुवातीला त्यांचं नाव पुन्हा एकदा उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत होतं. पण आशिष शेलार हे बीसीसीआयचे खजिनदार झाल्यानं, अध्यक्षपदासाठी कोण याची चर्चा सुरु झाली आणि अमोल काळेंचं नाव पुढे आलं.
शेलार-पवार पॅनलचे उमेदवार अमोल काळे हे निश्चित झाल्यावर पुन्हा एकदा आरोपांची राळ उठली.
अमोल काळेंना अध्यक्ष करायचं म्हणून शेलार-पवार हे विरोधक एकत्र आले असा आरोप झाला. क्रिकेटर्सच्या पॅनलला हरवण्यासाठी सगळे राजकारणी एकत्र आले अशी चर्चाही झाली.
अमोल काळेंनी मात्र पुन्हा एकदा या आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं. ‘माझे फक्त देवेंद्र फडणवीसांसोबतच नाहीत तर आशिष शेलार आणि इतर राजकारण्यांशीही चांगले संबंध आहेत. मला माझ्या पॅनलनं सांगितलं की अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे रहा म्हणून मी फॉर्म भरला. कुठल्याही क्रिकेटर्सचा आम्ही आदरच करतो. मुंबई क्रिकेटला प्रगतीपथावर न्यायचं हेच आमचं ध्येय आहे. राहिला प्रश्न माझ्यासाठी शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र आले आहेत का, तर हे दोघंही मागच्या अनेक वर्षांपासून क्रिकेट प्रशासनामध्ये आहेत. या दोघांकडे अनुभवही मोठा आहे आणि क्रिकेटसाठी राजकारण्यांनी एकत्र येणं हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये.’
बघायला गेलं तर याआधीही राजकारण्यांनी क्रिकेटर्सचा पराभव करत एमसीएची सत्ता मिळवल्याची बरीच उदाहरणं आहेत. मनोहर जोशींनी माधव मंत्रींचा, शरद पवारांनी अजित वाडेकरांचा आणि विलासराव देशमुखांनी दिलीप वेंगसरकरांचा पराभव करुन एमसीएचं अध्यक्षपद मिळवलं आहे. त्यामुळे राजकारणी विरुद्ध क्रिकेट हा सामना काय नवा नाही.
पण एमसीएच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीकडं नेमक्या काय जबाबदाऱ्या असतात ?
तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखाली जे विभाग येतात त्यांच्या क्रिकेट प्रशासनाचं कामकाज पाहणं. खेळाडूंना नव्या सुविधा उपलब्ध करुन देत, जुन्या समस्यांवर तोडगा काढणं. डोमेस्टिक मॅचेसचं आयोजन करणं, इंटरनॅशनल मॅचेसचं नियोजन करणं. वेगवेगळ्या कायदेशीर मार्गातून असोसिएशनसाठी फंड उभा करणं, खेळाडूंना स्कॉलरशिप देणं, क्लब्सला मदत करणं अशी जी सगळी कामं स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होतात, त्या सगळ्या कामांचा कंट्रोल हा अध्यक्षांकडे असतो.
त्यामुळं बघायला गेलं तर, मुख्य जबाबदारी ही क्रिकेट वाढवण्याची आणि खेळाडूंना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची आहे. क्रिकेटर्सच्या नेमक्या समस्या क्रिकेटर्सलाच माहिती असतात, असं अनेकदा बोललं जातं, पण त्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि राजकारणी यांचीच मदत घ्यावी लागते, ही वस्तुस्थिती विसरुन चालणार नाही.
साहजिकच आता एमसीएमध्ये क्रिकेटर्स बाजी मारणार की राजकारणी हे पाहावं लागेल, फक्त या सामन्यात क्रिकेट मागे पडायला नको, इतकीच चाहत्यांची अपेक्षा असेल.
हे ही वाच भिडू:
- MCA निवडणूक सोप्पी करण्यासाठी “शरद पवारांनी” अर्ज माघारीचं आवाहन केलं का..?
- BCCI म्हणजे राजकारणी हे इक्वेशन फिक्स झालं ते आपल्या एका मराठी माणसामुळेच…
- 31 टक्के टॅक्स एकट्या मुंबईतून : म्हणून प्रत्येकाचा मुंबईवर डोळा आहे….