दाऊदच्या सगळ्या कामांना प्रत्यक्षात उतरवणारा व्यक्ती म्हणजे, “अनीस इब्राहिम”

देशातच्या इंटेलिजन्स एजन्सीपासून ते गल्लीतल्या पिंटुकल्या पोरांना पण माहित असलेलं हे नाव म्हणजे, दाऊद…

प्रत्येकाला माहित आहे दाऊद पाकीस्तानच्या कराचीत आहे. पण जगाला पाहीजे असतो तो पुरावा. असा पुरावा भारताला मिळाला तो मागच्या महिन्यात. ईडीच्या चौकशीत दाऊदचा पुतण्या अलीशाह पारकर यांने सांगितलं की दाऊद कराचीत आहे.

अलीशाह पारकर म्हणजे दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा. आता हसीना पारकरबद्दल नवीन काय सांगणार. तिचे किस्से भारतभर फेमस आहेत. कमी पडू नये म्हणून तिच्यावर चित्रपट देखील निघालाय. पण दाऊदची फक्त एवढी एकच बहीण नव्हती जी त्याच्या डी गँगशी संबंधित होती.

यात अजून एका व्यक्तीचा समावेश आहे, ज्याच्या जोरावर दाऊदने डी गॅंगचे धंधे ठासून चालवले.

अनीस इब्राहिम

दाऊदला एकूण ६ भाऊ. मोठा भाऊ साबीर जो ८० च्या दशकात पठाण टोळीशी झालेल्या टोळीयुद्धात मारला गेला. दुसरा भाऊ नूर हा चित्रपटांत गाणी लिहायचा. काही वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. अजून एक भाऊ इक्बाल कासकर. याला २००३ मध्ये दुबईहून मुंबईला हद्दपार करण्यात आलं होतं. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने इक्बाल कासकरला अटक केली आणि सध्या तो तुरुंगात आहे.

मुस्तकीम आणि हुमायूं नावाचे अजून दोन भाऊ होते, दोघेही लॉ प्रोफाइल वाले. त्यांनी स्वत:ला दाऊदच्या काळ्या व्यवसायापासून दूर नेहमीच दूर ठेवलं. यातील हुमायूंचं २०१६ मध्ये कराचीत कर्करोगाने निधन झालं.

या सगळ्यांत फक्त अनीस इब्राहिम हा एकमेव भाऊ होता जो दाऊदच्या डी गँगशी जोडला गेला. एकटा असला तरी सगळ्यांना पुरून उरेल असा. सगळ्या भावांमध्ये खुंखार अशी त्याची लहापनापासून ख्याती. आणि नेमकं हेच तर अंडरवर्ल्डला लागतं!

दाऊदच्या मोठमोठ्या कामांमध्ये हमखास अनीस असायचाच. याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा आयएसआयने भारत विरोधी मोहिमेतील पाहिलं काम दाऊदला दिलं. 

९० चं दशक होतं. दशकाच्या सुरुवातील दाऊद दुबईवरून मुंबईतील त्याचा कारभार चालवत होता. तेव्हाच आयएसआय दाऊदकडे पोहोचली. 

एखाद्या गुप्तचर संस्थेला दुसऱ्या देशात घातपात घडवण्याचा कट आखायचा असेल, तर सगळ्यात पहिले त्या देशात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांची ओळख पटवणं आणि सरकारशी काही ना काही संघर्ष करणाऱ्या संघटनांशी संपर्क साधनं, हा दहशतवादी संघटनेची मुख्य रणनीती असते. 

सगळ्यात पहिले ही रणनीती आखली होती अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने. त्यानंतर शीतयुद्धाच्या वेळी सीआयएने पाकिस्तानी लोकांना पैसे पुरवले आणि सोबत दहशतवादी प्रशिक्षणही. 

ही रणनीती त्याच प्रशिक्षणाचा भाग म्हणून सीआयएने आयएसआयला दिली. आणि त्याच्याच जोरावर  आयएसआय दाऊदकडे पोहोचली होती. मुंबईचा सगळ्यात मोठा गँगस्टर दाऊदच्या माध्यमातून त्यांना भारताला निशाणा बनवायचं होतं.

दुबईतून मुंबईतील कारभार चालवणाऱ्या दाऊदला आयएसआयने दाऊदला ऑफर दिली की, तो पाकिस्तानात स्थायिक होऊन तिथून त्याचा कारभार चालवू शकतो. पाकिस्तान भारताच्या जवळ असल्याने त्याला त्याच्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवणं तर सोपं जाईलच मात्र कारभारात वृद्धी करायची असेल, तर त्यासाठी ही सोनेरी संधी आहे. 

फक्त याच्या बदल्यात दाऊदला आयएसआयची भारतविरोधी मोहीम राबवावी लागणार आहे.

दाऊदने अर्थातच फायदा बघता ऑफर स्वीकारली. त्याला पाहिलं काम देण्यात आलं..

मुंबई बॉम्बस्फोटांचं

मुंबईत दाऊदचं आधीपासूनच सोने-चांदी तस्करीचं नेटवर्क होतं. त्याचाच वापर करायचं दाऊदने ठरवलं, कारण हा सोयीस्कर मार्ग होता. प्लॅन आखला आणि १९९३ मध्ये आरडीएक्स मुंबईजवळच्या रायगडच्या किनाऱ्यावर उतरवलं गेलं.

दाऊदला देण्यात आलेल्या या पहिल्याच मोहिमेत अनीस इब्राहिम सामील होता. तोही लीड रोलमध्ये. म्हणजेच ही मोहीम राबवण्याची जबाबदारीच दाऊदने अनीसवर सोपवली होती. तेव्हा या कटात सामील असलेल्या बाकीच्या लोकांशी समन्वय साधण्याचं काम अनीसने केलं आणि मोहीम फत्ते केली. 

म्हणूनच तर सीबीआयने मुंबईतील टाडा कोर्टात दाखल केलेल्या बॉम्बस्फोटाच्या आरोपपत्रात अनीसचं नाव ‘वॉन्टेड’ आरोपी म्हणून नोंदवण्यात आलंय.

याच अनीसमुळे अभिनेता संजय दत्तला जेलवारी झाली होती. 

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी आपल्या ‘डायल डी फॉर डॉन’ या पुस्तकात अनीस आणि संजय दत्त यांच्याशी संबंधित हा किस्सा सांगितलाय…

दुबईमध्ये यलगार चित्रपटाच्या शूटिंग सुरु होती. संजू बाबा यावेळी अंडरवर्ल्डच्या बऱ्यापैकी संपर्कात होता. कोणत्या ना कोणत्या कारणाने अंडरवर्ल्डच्या भाई लोकांशी त्याच्या भेटीगाठी असायच्याच. याच दरम्यान अनीस इब्राहिमसोबत संजय दत्तची ओळख झाली होती. तेव्हा संजय दत्तने अनीसला त्याच्या संरक्षणासाठी बंदूक पाठवण्याची विनंती केली.

अनीसने देखील त्वरित अबू सालेमच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या शस्त्रांच्या मालातून काही रायफली संजय दत्तला पाठवल्या. याच प्रकरणात पुढे संजय दत्तला टाडामध्ये अटक करण्यात आली होती आणि शस्त्रास्त्र कायद्यात दोषी ठरल्यानंतर त्याला पाच वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला होता.

अनीसने संजय दत्तला शस्त्रं पाठवली ही गोष्ट मात्र दाऊदला माहित नव्हती. जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने अनीसला भयानक हाणला. खुद्द दाऊदने नीरज कुमारला फोन करून ही गोष्ट सांगितली होती.

९० च्या दशकात जितका दाऊद सक्रिय होता तेवढाच अनीस सुद्धा होता. तो प्रत्यक्ष कारभारात उतरलेला होता. शुटर लोकांना हत्यारं पोहोचवणं आणि पैशांचा व्यवहार बघणं हे डिपार्टमेंट अनीसवर सोपवून दिलं होतं. दर दिवशी त्याच्या वतीने व्यावसायिकांना धमकीचे फोन करण्यात यायचे. खून केले जायचे. मुंबईत त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि तस्करीचे २४ गुन्हे आजही दाखल आहेत. 

डी कंपनीत अनीसचं पद दाऊदनंतर यायचं. म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर त्याची दहशत होती. 

पण हे अंडरवर्ल्ड आहे. एकमेकांचा बाप होण्याची कुरघोडी इथे सुरूच असते. अनीस सोबतही असंच होत होतं. याच गँगमध्ये आणखी एक चेहरा अनीसच्या वर्चस्वाला आव्हान देत होता आणि स्वत:ला अनीसच्या बरोबरीचा समजत होता. हा माणूस होता…

छोटा शकील

छोटा शकील म्हणजे दाऊदचा उजवा हात. त्याचं काम होतं – गँगमध्ये शूटर्सची भरती करणं आणि डी कंपनीचा प्रवक्ता म्हणूनची त्याची ओळख होती. 

छोटा शकील आणि अनीस इब्राहिम म्हणजेच कट्टर शत्रू. त्यांच्यातील लढाई अंडरवर्ल्डमध्ये कुणापासूनच लपून राहिलेली नव्हती. ते एकमेकांची थोडीपण इज्जत करत नव्हते. अनीस दाऊदचा भाऊ असूनही अनीस त्याला ढुंकूनही बघत नव्हता. मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटमध्ये डी कंपनीचे लोक क्रिकेट खेळायचे तेव्हा सगळे अनीस इब्राहिमला अनीस भाई म्हणून हाक मारायचे, पण शकील त्याला थेट अनीस म्हणायचा. 

शकील आणि अनीस यांच्यात नंतर जुंपत गेली. त्यातून शकीलने शक्कल लढवत अनीसला मागे टाकलं. अनीस दाऊदचा रक्ताचा भाऊ असला तरी शकीलने त्याला त्याचा गेम केला. तेव्हा अंडरवर्ल्डमधील खुर्चीचा गेम पुन्हा एकदा कळला. आपल्या हितापेक्षा कुणी सख्ख नाही, याचंच हे उदाहरण. 

जवळपास गेल्या दोन दशकांपासून अनीसचं नाव बातम्यांमधून गायब झालं होतं. मात्र २०१७ मध्ये मुंबईतील एका बिल्डर फ्रॉड प्रकरणात अनीसचं नाव समोर आलं. दाऊदच्या सांगण्यावरून अनीसने बिल्डरला फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर बिल्डरने पोलिसांत तक्रार केली होती.

२००८ साली गोराई परिसारातील एका जमिनीसाठी बिल्डरने करार केला होता. मात्र ती जमीन मूळ मालकाऐवजी दुसऱ्याच कोणाच्या तरी ताब्यात होती, असं बिल्डरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. बिल्डरने ७ कोटी रुपयांचा सौदा केला होता आणि दोन कोटी पैसे देखील दिले होते.

मात्र काही दिवसांनी त्याला फोन आला. दाऊदच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ अनीसने बिल्डरला फोनवरून धमकी दिली होती की, त्याने ती जागा विकत घेतली आहे आणि दोन कोटी रुपयांची रक्कम जी बिल्डरने करार केलेल्या व्यक्तीला दिली होती ती देखील अनीसकडे पोहोचली आहे. त्यानंतर अनीसने धमकावून बिल्डरकडून आणखी एक कोटी रुपये उकळले.

अशा प्रकारे वैतागलेल्या बिल्डरला ना जमीन मिळाली ना त्याचे पैसे परत मिळाले. उलट तीन कोटी रुपये बुडाले होते. पोलिसांनी या प्रकरणात दाऊद आणि अनीस यांना मुख्य आरोपी ठरवलं होतं आणि गुन्हा दाखल केला होता.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अनीसचं नाव पुन्हा माध्यमांमध्ये आलं. अनीस इब्राहिम भारतात अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. अनीस इब्राहिमचा जवळचा सहकारी आरिफ भुजवाला याला महाराष्ट्रातील रायगड इथून अटक करण्यात आली होती. तेव्हा अनीसचा दक्षिण मुंबईतील ड्रग सिंडिकेटशी संबंध असल्याचं उघड झालं होतं.

सप्टेंबरमध्ये अनीसचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सप्टेंबरमध्ये  टेरर मॉड्युल उघड केलं होतं. ते मॉड्युल अनीस इब्राहिमने तयार केलं होतं, अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. 

अलिकडच्या काही वर्षांत डी कंपनीने भारतातील त्यांचं कामकाज बंद केलं होतं. अशा परिस्थितीत अनीसचं नाव समोर आल्याने दाऊदची गॅंग पुन्हा एकदा भारतात सक्रिय झाली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि म्हणूनच भारतीय पोलिसांनी अजूनच डी गँगला रडारवर घेतलं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.