बाळासाहेब ते फडणवीस, सगळ्यांच्या जवळचे ‘मास्टरमाईंड’ आशिष कुलकर्णी कोण आहेत…?

साल १९९९, तारीख ३० जानेवारी. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याकडे शिवसेनेचा एक कार्यकर्ता पोहोचला. त्यानं जोशी सरांना एक पत्र दिलं. पत्र बाळासाहेबांचं होतं. जोशी सर मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यात आणि शिवसेनाप्रमुखांमध्ये वादाच्या ठिणग्या पडल्याच्या बातम्या सतत कानावर येत होत्या. त्यात जोशींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि बाळासाहेबांनी निर्णय घेतलाच. त्यांनी मनोहर जोशींना राजीनामा द्यायला सांगणारं पत्र या कार्यकर्त्याकरवी पाठवलं. 

जोशींनीही लगेचच राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. हे पत्र पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यानंच शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या मदतीनं या पत्राचा मसुदा लिहिला होता. या कार्यकर्त्याचं नाव, आशिष कुलकर्णी.    

सध्या आशिष कुलकर्णी चर्चेत आहेत, ते काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळं. काँग्रेसचे आमदार फुटणार, भाजपमध्ये लवकरच माजी मंत्र्यांचा प्रवेश अशा बातम्या येत असतानाच चव्हाण-फडणवीस भेटीमुळं या चर्चांना उधाण आलं.

आता या भेटीबद्दल अशोक चव्हाण म्हणाले की, ‘आशिष कुलकर्णींच्या घरी आम्ही फक्त उभ्या उभ्या भेटलो आमच्यात कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही.’ तर फडणवीस म्हणाले, ‘आमची भेट झाली नाही, मी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचलो, तेव्हा अशोक चव्हाण निघाले होते.’

पण हे दोन नेते एकत्र येणं हा केवळ योगायोग होता की ठरवून समन्वय साधला गेला, असा प्रश्न उपस्थित होतोय. याचं कारण म्हणजे ज्या आशिष कुलकर्णींच्या घरी हे नेते एकत्र आले, त्या आशिष कुलकर्णींचा राजकीय इतिहास.

आशिष कुलकर्णींचा राजकीय प्रवास सुरु झाला तो शिवसेनेतून.

आशिष कुलकर्णी हे काही आक्रमक शिवसैनिक नव्हते, पण तरीही त्यांनी बाळासाहेबांचे निकटवर्तीय म्हणून ओळख मिळवली. कुलकर्णी बाळासाहेबांच्या इतके जवळचे होते की, मनोहर जोशींना राजीनाम्याचा आदेश देणाऱ्या बाळासाहेबांच्या पत्राचा मसुदा कुलकर्णींनी लिहिला होता, पत्रही त्यांनीच नेऊन दिलं.

इतकं मोठं प्रस्थ असूनही, कुलकर्णी यांनी २००३ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं वर्चस्व वाढत होतं, त्यावेळी उद्धव यांच्या कारभारावर नाराज होऊन शिवसेना सोडणाऱ्यांपैकी आशिष कुलकर्णी सुद्धा होते.

त्यांचे नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. सेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसची वाट धरली.

आशिष कुलकर्णी शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय होते, तर काँग्रेसमध्ये असताना गांधी कुटुंबियांचे. काँग्रेसमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसोबत काम केलं. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना दिल्लीतून बोलावणं आलं. नव्यानंच स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेस कोऑर्डिनेशन सेंटर या काँग्रेसच्या वॉररूमचेही ते सदस्य होते. काँग्रेसच्या निवडणुक नियोजन आणि व्यवस्थापन कमिटीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

ज्या सहा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्याकडे होती, त्या सहाही ठिकाणी काँग्रेसनं बाजी मारली. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकींवेळी देशातल्या सगळ्या मतदारसंघांचा सर्व्हे करुन डेटा उपलब्ध करण्याच्या कामाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. पुढे ते काँग्रेसचे संकटमोचक असणाऱ्या अहमद पटेल यांच्यासोबत काम करु लागले. 

काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी पडद्यामागून राजकारण करण्यावरच भर दिला.

२०१७ मध्ये मात्र आशिष कुलकर्णींनी काँग्रेसचा हात सोडला. पक्ष सोडताना त्यांनी एक भलं मोठं पत्र लिहिलं. ज्यात काँग्रेसच्या कारभारावर आणि मुख्यत्वे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली होती. या पत्रात त्यांनी काँग्रेसमधल्या घराणेशाहीलाही लक्ष्य केलं.

 कुलकर्णींच्या या पत्रावर काँग्रेस नेतृत्वानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही, मात्र काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी, ‘आशिष कुलकर्णी कोण आहेत ? तुम्ही त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये कधी पाहिलंय का ?’ अशी टीका केली होती.

या सगळ्या राड्यानंतर आशिष कुलकर्णींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

इथं त्यांना लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीममध्ये स्थान मिळालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या आशिष कुलकर्णी यांच्यावर मोठी जबाबदारी आली ती राज्यसभा निवडणुकांची. शिवसेनेचा विजय सोपा मानला जात होता, त्यामुळं भाजपपुढं मोठं आव्हान होतं. तेव्हा आशिष कुलकर्णींनी विजयाची योजना आखली, ज्यामुळं धनंजय महाडिकांना मिळणाऱ्या मतांचं मूल्य वाढणार होतं. ही योजना फक्त फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाच माहीत होती. कुलकर्णींची ही योजना यशस्वी ठरली आणि भाजपनं राज्यसभेची सीट निवडून आणली. 

त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही आशिष कुलकर्णी यांनी विजयाचा प्लॅन बनवला आणि यावेळी महाविकास आघाडीला मोठा हादरा देत भाजपनं पुन्हा एकदा बाजी मारली.

या दोन निवडणुकांनंतरही आशिष कुलकर्णींचं काम संपलं नव्हतं. 

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह सुरतला पोहोचले, तिथून गुवाहाटी गाठली. कायदेशीर बाजू भक्कम करेपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्रात आले नाहीत किंवा भाजपनंही उघडपणे कोणतंच विधान केलं नाही. 

असं सांगण्यात येतं की, बंडखोर आमदारांसोबत थांबून सगळ्या प्रकरणाची कायदेशीर बाजू सावरण्याची, आवश्यक ती कागदपत्र आणि वकिलांची फौज उभी करण्याची जबाबदारी फडणवीसांनी आशिष कुलकर्णी यांच्याकडेच दिली होती. तिथंही त्यांनी आपलं काम चोखपणे पार पाडलं.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झालं, तेव्हा शिंदे गटाचे आमदार आणि भाजप आमदार यांच्यात मतभेद होण्याची आणि जे महाविकास आघाडीत झालं त्याचीच पुनरावृत्ती होण्याची पूर्ण शक्यता वर्तवण्यात येत होती. 

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष कुलकर्णींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती केली. 

त्यामुळं कुलकर्णी यांच्याकडे शिंदे गटाचे आमदार आणि भाजप यांच्यात सुसूत्रता राखणं, आमदार आणि मंत्र्यांमध्ये समन्वय साधणं या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात. पण आपल्या खास विश्वासातला माणूस थेट सीएम ऑफिसमध्येच बसवत फडणवीसांनी रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवला असल्याचंही बोललं जातंय.

बाळासाहेबांना आपल्याच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठीच्या पत्राचा मसुदा तयार करुन देणं, कमी वयात थेट काँग्रेस हायकमांडच्या जवळचं स्थान मिळवणं, राज्यसभा-विधानपरिषद निवडणुकांमध्ये तीन विरोधकांचा पराभव करणं आणि शिवसेनेतल्या सगळ्यात मोठ्या बंडावेळी कायदेशीर बाजू सांभाळणं या सगळ्या गोष्टी आशिष कुलकर्णींनी आतापर्यंत केल्यात. 

भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीमागचं मास्टरमाईंडही राज ठाकरेंचे जुने सहकारी म्हणून आशिष कुलकर्णींचंच नाव चर्चेत आहे. 

त्यामुळेच अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची आशिष कुलकर्णींच्या घरी गणपती दर्शनासाठी झालेली भेट खरंच योगायोग आहे का? असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतोय. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.