भारती पवारांच्या सासऱ्यांनी पवारांच्या विरोधात जाऊन भाजपचं मंत्रिपद पटकावून दाखवलं होतं..

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मंत्रिमंडळ विस्तार केला. पहिल्यांदाच त्यांनी तब्बल नव्या ४३ मंत्र्यांना संधी दिली आहे. त्यांच्या कार्यकाळातले आजवरचा सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार आहे. भावी निवडणुकांना विचारात घेऊन प्रत्येक राज्यातील समीकरणे जुळवून घेणारी नावे या मंत्रिमंडळात दिसत आहेत. कित्येक हिशोब सेटल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

या सगळ्या राड्यात एक नाव मात्र विशेष करून चमकताना दिसतंय. ते नाव आहे महाराष्ट्रातल्या डॉ.भारती पवार यांचं.

भारती पवार यांच नाव विशेष यासाठी आहे कारण भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना देखील त्यांचं नाव ठाऊक नाही. अनेक दिग्गज नेते इच्छूक होते मात्र त्यांना डावलून मोदींनी भारती पवार यांना संधी दिली. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपमध्ये येऊन त्यांना २ वर्षांचा काळ देखील उलटलेला नाही. नाशिक इथल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत राजकारणात प्रवेश करणाऱ्या भारती पवार यांना त्यांच्या सासऱ्यांचा राजकीय वारसा लाभला आहे.

भारती पवार यांचे सासरे म्हणजे स्व. अर्जुन तुकाराम उर्फ ए.टी.पवार.

ए.टी.पवार म्हणजे कोणी साधी सुधी असामी नव्हे. ते नाशिक जिल्ह्यातल्या कळवण येथून तब्बल ८ वेळा आमदारकी जिंकलेले ४ वेळा मंत्रिपद भूषवलेले नेते आहेत.

ए.टी. पवार यांचा जन्म एका अशिक्षित कुटूंबात झाला. मात्र स्वतः जिद्दीने एलएलबी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. गोविंदराव चौधरी यांच्या आग्रहामुळे गावच्या सरपंचपदापासून राजकारणास सुरवात केली. १९६२ मध्ये कनाशी (ता. कळवण) गटात निवडून येऊन ते जिल्हा परिषद सदस्य व लगोलग बांधकाम समितीचे सभापती झाले. जिल्हापरिषदेचे अध्यक्ष असताना या आदिवासी भागातला तरुण तडफदार खमक्या नेता म्हणून ए.टी.पवार यांनी प्रसिद्धी मिळवली.

१९७२ साली त्यांना पहिल्यांदा शेकापकडून आमदारकीचं तिकीट मिळालं. समोर काँग्रेसचा मोठा उमेदवार असतानाही अवघ्या ३४ वर्षांचे ए.टी.पवार निवडून देखील आले. त्याकाळच्या विधानसभेत तरुण आमदारांमध्ये शरद पवारांशी त्यांची ओळख झाली. असं म्हणतात की शरद पवारांनीच त्यांना आग्रह करून काँग्रेसच्या प्रवाहात आणलं.

पुढची निवडणूक ए.टी.पवार यांनी काँग्रेस कडून लढवली. तिथून पुढे अनेक वर्षे दिंडोली केळवण म्हटलं की अर्जुन तुकाराम पवार हे नाव कायम फिक्स राहिलं.

मतदारसंघात कालव्यांचे जाळे, प्रत्येक शेताला पाणी, उत्तम रस्ते त्यांनी निर्माण केले. वीस वर्षे पाठपुरावा करुन गिरणा नदीवर धरण उभे केले. त्याचे नामकरण अर्जुन सागर असे करण्यात आले. तापी विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पाणी व रस्ते या दोन प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिल्याने तालुक्यातील विविध सिंचन योजना मार्गी लागल्या. त्यामुळेच तालुक्यात पाणीदार नेता व ‘पाणदेव’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

तालुक्‍यात सतरा आश्रमशाळा सुरु करुन प्रत्येक आदिवासी मुलगा शाळेत जाईल याची व्यवस्था त्यांनी केली. संबंध राज्यभरात गाजलेल्या या योजनेला “एटी पॅटर्न” असे संबोधले गेले.

मात्र ज्या शरद पवारांसोबत त्यांची मैत्री प्रसिद्ध होती मात्र १९९५ साली ए.टी.पवार यांनी काँग्रेस सोडून भाजप कडून उमेदवारी मिळवली. काही जण म्हणतात काँग्रेस भाकरी पलटायची म्हणून त्यांचं तिकीट कापणार होती आणि याचा अंदाज आल्यावर एटी यांनी पक्ष सोडला. काही जण म्हणतात राज्यातलं बदलत वारं बघून एटी पवार भाजपमध्ये गेले.

शहरी तोंडावळ्याच्या भाजपला बहुजन आदिवासी समाजात प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नामुळे पवार भाजपमध्ये गेले. खरंच १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीच सरकार आलं.

ए.टी.पवार यांना वनराज्य मंत्रिपद सोपवण्यात आलं. या काळात देखील त्यांनी मोठं काम केलं. भाजपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं गेलं. पण दुर्दैवाने १९९९ साली युतीची सत्ता गेली आणि पुन्हा काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं. 

या काळात आणखी एक घटना घडली होती. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना. शरद पवारांनी काँग्रेस बरोबर बंडखोरी करून नवीन पक्ष काढला होता. राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना भाजपचं सत्तेचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

२००१ साली ए.टी.पवार स्वगृही परत आले. स्वगृही म्हणजे ते काँग्रेसमध्ये गेले नाहीत तर ते सरळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले. तिथून अखेर पर्यंत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाशी निष्ठा वाहिली. 

पवारांचे जवळचे मित्र व निकटवर्तीय नेते म्हणून ए.टी.पवार यांना ओळखलं गेलं. बारामतीच्या खालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून कळवण दिंडोरी मतदारसंघ गाजला. ए.टी.पवार यांनी या काळात आदिवासी विकास, समाजकल्याण, बांधकाम, वन व पशुसंवर्धन, रोजगार व स्वयंरोजगार  अशा विविध खात्यांची मंत्रिपदे देखील सांभाळली. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राजकारणापासून संन्यासच घेतला. त्यांचा राजकीय वारसा त्याचे सुपुत्र नितीन पवार आणि सून डॉ.भारती पवार यांनी पुढे चालवला. जिल्हापरिषदे पासून सक्रिय राजकारणात प्रवेश करणाऱ्या भारती पवारांनी २०१४ साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. विशेष म्हणजे मोदी लाटेतही त्यांनी लाखोंनी मते मिळवून ए.टी.पवार घराण्याचा आजही दबदबा असल्याचं दाखवून दिलं होतं.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकी आधी राष्ट्रवादी आपलं तिकीट कापणार याची कुणकुण लागल्यावर भारती पवार यांनी भाजपची वाट पकडली. स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. आश्चर्य म्हणजे त्यावर्षीची लोकसभा भारती पवार यांनी जिंकली. लोकसभेत देखील नजरेत भरण्यासारखी कामगिरी त्यांनी करून दाखवली. 

याचाच परिणाम म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांचा आज मंत्रिमंडळात समावेश केला. फक्त दोनच वर्षात राष्ट्रवादीच्या जिल्हापरिषद सदस्यापासून ते भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत झेप घेणाऱ्या डॉ.भारती पवार यांच्या नावाची चर्चा आज दिवसभर सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.