सोलापूरातून लढणारे डॉ. स्वामी जयसिद्धेश्वर कोण आहेत ?

भाजपने आपली तिसरी यादी जाहीर करताच, महाराष्ट्रातील एका लोकसभा जागेवरुन चर्चा सुरू झाल्या. कारण देखील तसच होतं. या यादीत एका धर्मगुरूंना तिकीट देण्यात आलं होतं. जागा देखील साधीसुधी नव्हती. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. स्वामी जयसिद्धेश्वर यांना तिकीट देण्यात आलं.

कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री असणारे सुशिलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असे तगडे उमेदवार असताना उभा करण्यात आलेले हे डॉ. स्वामी जयसिद्धेश्वर बाहेरील लोकांसाठी तरी आश्चर्यच होतं. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करत ही उमेदवारी देण्यात आल्यानं साहजिक विचारलं जावू लागलं की,

कोण हे, डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी ? 

या स्वामींची माहिती घेण्यापुर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघाबद्दल माहिती घेवू. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत, पद्मशाली, आणि मुस्लीम समाज बहुसंख्य आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन लिंगायत समाजाचे धर्मगुरू अशी ख्याती असणाऱ्या डॉ. स्वामी जयसिद्धेश्वर यांना भाजपने उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानचे संस्थापक आहेत. त्यांना शिवाचार्यरत्न असे देखील म्हणतात. १ जून १९५५ रोजी त्यांचा जन्म झालं असून त्यांनी १९७८-७९ साली त्यांनी बनारस हिंदू विश्व विद्यालयातून बी. ए. १९८१-८२ मध्ये याच विद्यालयातून एम. ए. आणि याच विद्यालयातून १९८८-८९ साली  एम.ए.पी.एचडी पदवी संपादन केली आहे. वीरशैव एवंम काश्मीर शैवदर्शनमे मोक्षका चिंतन या विषयावर त्यांनी पी. एच.डी. केली आहे.

स्वामींनी १२ जून १९८९ साली श्री. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना केली. १९९१ मध्ये त्यांनी गौडगाव येथे श्री. जगद्गुरूपंचाचार्य प्रशाला सुरु केली. अक्कलकोट शहरात बी. बी. ए व बी. सी. ए महाविद्यालय व यतेश्वर पब्लिक स्कुल आणि नूतन प्राथमिक मराठी शाळा देखील त्यांनीच सुरु केली.

गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह देखील त्यांनी चालू केले आहे. याशिवाय माशाळ व गौडगाव येथे संस्कृती केंद्राची स्थापना केली आहे. शेळगी सोलापूर येथे शिवयोगीधाम या अध्यात्मिक केंद्राची देखील त्यांनी स्थापना केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या ठिकाणी स्वामींनी मराठी, कन्नड व हिंदी भाषेतून विविध विषयांवर प्रवचने देतात. अध्यात्मिक गुरु म्हणून ते सर्वांना परिचित आहेत.

संस्थान हिरेमठ व शिवयोगी धाम सेवा समितीच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन ते सोलापूर जिल्ह्यात करत आले आहेत. दरवर्षी ते सिद्धश्रीरत्न पुरस्कार देखील देतात. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक व आंध्र प्रदेशात देखील या स्वामींचे असंख्य भक्त आहेत.

लिंगायत समाज स्वामींच्या पाठीमागे उभा राहील का ?

सोलापूरात लिंगायत समाज बहुसंख्य आहे यात शंका नाही. स्वत: डॉ. स्वामी जयसिद्धेश्वर हे लिंगायत समजाचे धर्मगुरू आहेत आणि या मतदारसंघातीलच नव्हे तर आजूबाजूच्या भागात त्यांचे अध्यात्मिक ताकद चांगली आहेत आणि लोकांची त्यांच्यावर श्रद्धा देखील आहे.

पण नुकत्याच झालेल्या सोलापुरातील लिंगायत धर्म विचारमंथन परिषदेत त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता. लिंगायत समाजातील कुठले ही धर्मगुरु समाजाचा उपयोग राजकारणासाठी करणार असतील तर त्याला विरोध करणार असल्याचा ठरावच या परिषदेत करण्यात आला. त्यामुळे याचा थेट परिणाम मतांवर होणार की, श्रद्धेतून स्वामी जयसिद्धेश्वर यांना मतदान होणार हे निवडणुकीचे मतदान आणि निकालच ठरवेल.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.