स्वरा भास्कर अन् तिचा नवरा दोघेही चर्चेत राहत आलेत…

स्वरा भास्कर. स्वरा भास्कर हे नाव म्हणजे कॉन्ट्रोवर्सी क्वीन अशी एक इमेज माध्यमांमध्ये आणि माध्यमांमुळे नागरिकांमध्ये सेट झालीये. स्वरा भास्करची अशी इमेज का सेट झालीये? तर, तिचं प्रत्येक गोष्टीवर काहीतरी मत असतं आणि ती ते मत ठामपणे मांडत असते… आता तिचं मत बरोबर-चूक, योग्य-अयोग्य कसं असतं हा मुद्दा नाहीये… मुद्दा आहे तो म्हणजे ती चर्चेत असते.

हिजाब, पद्मावत सिनेमा आणि द काश्मिर फाईल्स यावरही कमेंट्स केल्या होत्या त्यातून इंडियन आर्मीवर तिनं कमेंट केली होती ज्यामुळे तिला लोकांचा मोठा विरोध पत्करावा लागला होता. याशिवाय तिने एक व्हिडीओ रीट्वीट केला होता ज्यामध्ये नमाज वाचणाऱ्या मुस्लीम नागरिकांना उद्देशून जमान ‘जय श्री राम’ असे नारे देत होता. हा व्हिडीओ रिट्वीट करताना तिने लिहीलं होतं, “एक हिंदू असल्यची लाज वाटते.”

असे बरेच मुद्दे आहेत ज्यावरून स्वरा कॉन्ट्रोव्हर्सी आणि चर्चा दोन्हीमध्ये राहत आलीये. आता ती चर्चेत आलीये ते तिच्या लग्नामुळे.

खरंतर स्वराने ६ जानेवारीलाच आपल्यापेक्षा ४ वर्षांनी लहान असलेल्या फहाद अहमद या व्यक्तीसोबत लग्न केलं आणि सोशल मीडियावर याबाबतची माहिती तिने आता दिलीये. यात विषय असा आहे की, चर्चेत राहण्याच्या बाबतीत हा फहद अहमद सुद्धा स्वराच्या मागे नाहीये. फहद सुद्धा चर्चेत राहत आलाय.

बघुया हा फहद अहमद नेमका कोण आहे?

फहद अहमदचा जन्म उत्तर प्रदेशातल्या बरेली जवळच्या बहेरी या ठिकाणचा. त्याने अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तो आला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस मध्ये इथं त्याने एस फिलची डिग्री घेतली.

इथं तो स्टुडंट्स लीडर म्हणून समोर आला. स्टूडंट्स युनियनचा जनरल सेक्रेटरी म्हणून तो निवडून आला आणि त्याच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. २०१७-१८ साली या पदावर असताना त्याने केलेलं आंदोलन आणि तो दोन्ही चर्चेत आलेले.

हे आंदोलन कसलं होतं? तर, २०१८ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेसने अनुसुचित जाती, मागासवर्गीय विद्यार्थी यांच्यासाठी सुरू असलेली आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात फहद अहमदने आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनात एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनीही पाठिंबा दिला होता.

शिक्षण घेत असताना कॉन्ट्रोव्हर्सीमध्येही होता फहद
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस मध्ये एम फिलचं शिक्षण पूर्ण झाल्यावर कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमात त्याने डिग्री स्वीकारायला नकार दिला होता. त्यामुळे मग त्याला पीएचडीच्या प्रवेशासाठी संस्थेने नकार दिला होता. हा भाग वेगळा आहे की आता तो याच संस्थेतून पीएचडी करतोय.

स्वरा आणि फहदची भेटही आंदोलनात झाली.

२०१९ मध्ये नागरिकत्व (सुधारणा) कायदा म्हणजेच सीएए आलेला. त्यावेळी त्या कायद्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. या आंदोलनांमध्ये बरीच नावं समोर आलेली. त्यातली दोन नावं याच नवविवाहीत जोडप्याची म्हणजे स्वरा भास्कर आणि फहद अहमदची होती. हे दोघंही या कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरलेले.

२०१९ मध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणावर आंदोलनं उभी राहिली होती. अशाच एका आंदोलनात स्वरा आणि फहदची भेट झालेली. तिथे मग त्यांचे विचार सारखेच असल्यामुळे ओळख वाढत गेली आणि प्रेम झालं. असं स्वरानेच सोशल मीडियावर म्हटलंय.

सीएएचा विरोध करताना फहदने वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेला. अगदी ठिकठिकाणच्या आंदोलनांपासुन ते भारत-ऑस्ट्रेलियाच्या वन डे सीरिजवेळी वानखेडे स्टेडियममध्ये काळे कपडे घालून शांततेत विरोध नोंदवणाऱ्यांमध्येही त्याचा सहभाग होता. याशिवाय डिसेंबर २०१९ मध्ये मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात सीएए विरोधात विद्यार्थांचा मोर्चा निघाला होता.

जवळपास २०,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या आंदोलनाच्या आयोजनात फहद अहमदचा मोठा वाटा होता.

२०२२ मध्ये पक्षप्रवेश केला.

समाजवादी पार्टीचे नेते असलेले अबु आझमी यांच्याशी फहदचे नजीकचे संबंध असल्याचं मानलं जातं. अबु आझमी यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच त्याने २०२२ च्या जुलै महिन्यात समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

सध्या फहद हा समाजवादी पार्टीच्या यूथ विंगचा महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रीय आहे. याशिवाय ज्या युनिव्हर्सिटीमधून त्याने विद्यार्थी नेता म्हणून काम सुरू केलं त्याच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस मधून तो पीएचडीही करतोय.

हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की, आपली मतं ठोसपणे मांडणाऱ्या आणि सतत चर्चेत, कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहणाऱ्या स्वरा आणि फहद या दोघांनीही अगदी आपल्यासारखाच जीवनसाथी निवडलाय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.