सावित्रीमाईंच्या बरोबरीनं काम केलेल्या फातिमा शेख यांना आज गूगल पण सलाम करतंय

१८४८ च्या आरंभीची गोष्ट. ज्योतिरावांनी पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली  शाळा सुरु केली. मात्र धर्माच्या विरोधात जाऊन मुलींना शिक्षण दिलं,स्त्रीशिक्षणासारख्या कामामुळं धर्म बुडेल असं कायतरी थोतांड पुढं करून धर्मांधांनी ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र कामाला विरोध करू लागले. या विरोध करणाऱ्यांनी ज्योतिरावांच्या साध्याभोळ्या वडिलांचे गोविंदरावांचे डोके भंडावून सोडले.

तुमचा पोरगा आणि सून तुमच्या कुळास बट्टा लावतायत असं पटवून सांगण्यात ते यशस्वी झाले. त्यातूनच मग ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.

असा सांगितलं जातं की जेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढलं गेलं  तेव्हा त्यांना आसरा देण्यास पुढे आले फातिमा शेख आणि उस्मान शेख.

या भावंडांनी त्यांना आपल्या घरात आसरा दिला. एवढंच नाही तर फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंच्या खांद्यला खांदा लावून स्त्रीशिक्षणाच्या कार्यात हातभार लावण्यास सुरवात केली.

जोतिबा आणि सावित्रीबाईंना जो विरोध झाला, तो फातिमासाठी आणखीनच वाढला. त्यांना उच्चवर्णीय हिंदू आणि सनातनी मुस्लिम या दोघांच्याही विरोधात सहन करावा लागत होता. तोपर्यंत केवळ उच्च जातीच्या पुरुषांचा विशेषाधिकार होता. पण सर्व नियम झुगारून, फातिमा आणि सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली.

पुढे व्यावसायिक शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण संस्थेतही सावित्रीबाई आणि फातिमा शेख दोघी एकत्रच गेल्या.

मुलींसाठी शाळा सुरू झाल्याबद्दल उच्चवर्णीय लोकांनी तीव्र आणि हिंसक प्रतिक्रिया दिल्या. ते जात असताना त्यांनी फातिमा आणि सावित्रीबाई यांच्यावर दगडफेक आणि शेणही फेकले. मात्र दोघी  बिनधास्त राहिल्या. फातिमा यांनी १८५६ पर्यंत शाळेत शिकवले.

आज त्यांना भारतातील पहिली मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.

दुर्दैवानं सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्याबद्दल अभ्यासपूर्वक लिहिणाऱ्या लोकांकडेही फातिमा शेख यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये. 

संघर्षात एकेमकांच्या साथीदार राहिलेल्या सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांची यांच्यातील मैत्री आदर,  आणि समरसतेची होती. सावित्री त्यांच्या सोबतच्या काळात ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख प्रेमाने आणि काळजीने करत असत. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या अशाच एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो.

सावित्रीबाईंची तब्येत खराब असताना त्यांनी १०ऑक्टोबर १८५६ साली ज्योतिबांना एक पत्र लिहिलं होतं. तोवर वंचितांसाठी, महिलांसाठी पुण्यात अनेक शाळा फुले दांपत्यांनं उभारल्या होत्या. ज्योतिबांना आश्वस्त करण्यासाठी त्या पत्रात लिहितात, “माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन.फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही.” याचाच अर्थ सावित्रीबाईंच्या अनुपस्थिती शाळेची जबाबदारी फातिमा पार पाडत असत.

फातिमा शेख यांच्याबद्दल आज जास्त माहिती नसली तरी आज त्यांचं काम बोलतंय त्यामुळंच  Google पण फातिमा शेख यांचा १९१ वा वाढदिवस एका विशेष डूडल काढून साजरा करतंय.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.