हिंदुस्थानी भाऊचं ऐकून दहावी, बारावीची पोरं राडा घालायल्यात का?
कोरोना जगभरात पसरला तसं सगळ्यांचं जीवनमान हाललं आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला तो विद्यार्थ्यांवर. शिक्षण क्षेत्राला याचा मोठा फटका बसला कारण दोन वर्ष झाली ऑनलाईन शिक्षण सध्या चालू आहेत. इतकंच नाही तर परीक्षाही या काळात ऑनलाईन झाल्या. मात्र आता कोरोनाची तिसरी लाट निवळताना दिसत असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेतल्या जातील असं शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयावरून मात्र राज्यात मोठा राडा सुरु झाला आहे.
दहावी आणि बारावीची पोरं या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहेत. त्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, अशी त्यांची मागणी आहे. परिणामी आज ३१ जानेवारीला मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं आहे. शिवाय या आंदोलनाला तोडफोडीचं गालबोट लागल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे.
राज्यात केवळ धारावीतच नाही, तर पुणे, नागपूर, सातारा, कराड, अकोला आणि इतर काही ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे नियोजन करुन हे आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
विद्यार्थ्यांची मागणी नेमकी काय?
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेणं योग्य नाही, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे.
पण यादरम्यानचा मोठा प्रश्न म्हणजे….
धारावीत या हजारो विद्यार्थ्यांचा जमाव झाला कसा? त्यांना नेमकं कुणी बोलावलं होतं?
जेव्हा याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आली तेव्हा एका अशा व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं आहे ज्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ते म्हणजे ‘हिंदुस्थानी भाऊ’.
इतकंच नाही तर ‘हिंदुस्थानी भाऊ’ धारावीत आंदोलनातसुद्धा सहभागी झाला होता आणि याचा व्हिडिओ त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तानी भाऊ म्हणून सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या विकास फाटक याने २६ जानेवारीला एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला होता.
त्यात हिंदुस्थानी भाऊंचे काय म्हणणे आहे? हे एकदा बघूया…
कोरोनामुळे अनेकांचा जीव गेला आहे आणि या अप्रिय दुर्घटना अजूनही अनेक परिवार विसरू शकले नाहीत. आता तर ओमिक्रोन आल्याचे सांगण्यात येत आहे. स्वतः सरकार लोकांना घरी रहा असं सांगत आहे. मग एवढं सार होत असताना विद्यार्थ्यांचा बळी का चढविण्यात येतोय?
इतके दिवस विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं झालं आहे, तर आता ऑफलाईन परीक्षा का घेण्यात येतायेत? मागच्या वर्षी सुद्धा मी याविरोधात होतो. आणि एकटा रस्त्यावर उतारलो होतो. त्यावेळी माझं ऐकून पालकांनी आपल्या मुलांना परीक्षेसाठी पाठवलं नाही. यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्या जीवाशी, करियरशी खेळू नका.
मागच्यावेळी मी एकटा उतरलो होतो, मात्र आता यावेळी लाखो लोक माझ्यासोबत उतरतील, लाखो मुलांना घेऊन रस्त्यावर मी उतरणार आहे. तेव्हा हा निर्णय बदला नाहीतर नवीन हंगामा होईल. जेवढ्या केसेस टाकायच्या ते टाका मला पर्वा नाही.
पोलीस आता हिंदुस्थानी भाऊचा जोरदार तपास करत आहेत.
या घटनेमागे ‘हिंदुस्थानी भाऊ’ असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील ‘हिंदुस्थानी भाऊ’चा शोध घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या सांगण्यावरून ही गर्दी इथे जमली. तसंच हे ठरवून करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना भडकावण्यात आलं आहे. शिवाय हिंदुस्थानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
हे ही वाच भिडू :
- विद्यार्थी आंदोलनामुळे आणीबाणीचं रामायण घडलं आणि देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली
- बीड मधलं एक झाड जे फक्त आंदोलनासाठीच फेमस झालं
- विद्यार्थी आंदोलनाला हलक्यात घेऊ नका, खुद्द मुख्यमंत्री निवडणूक हरलेले