राम मंदिराची घोषणा करून अमित शहा टेक्निकली चुकले काय?

अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राममंदिर उघडण्याबाबतच्या तारीखेची घोषणा केली.  १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल, लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

२०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, “मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे”, तर राहुल गांधी आता कान उघडून ऐका, १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.”

आता १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करण्याच्या अमित शहांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

खर्गे म्हणाले कि, “तुम्ही राम मंदिराचे पुजारी आहात कि राम मंदिराचे महंत आहात ? मंदिरावर महंत, साधू, संतांना बोलू द्या. मंदिराच्या उद्घाटनाबाबत बोलणारे तुम्ही कोण? तुम्ही राजकारणी आहात. देश सुरक्षित ठेवणे, कायदा राखणे आणि लोकांना अन्नधान्य सुनिश्चित करणे आणि शेतकर्‍यांना योग्य भाव देणे हे तुमचे काम आहे”.

असो हे राजकारण सोडलं तर खरंच हि घोषणा करून अमित शहा टेक्निकली चुकले का? 

कारण राम मंदिराच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर करण्याची पहिलीच वेळ होती आणि त्यात राम मंदिराची घोषणा करण्याचं काम अमित शहांचे काम नाहीये तर अयोध्या मंदिराचा कारभार पाहणाऱ्यांनी ही घोषणा करायला हवी होती. कारण टेक्निकली मंदिराबाबतची घोषणा करण्याचे काम कोणाचे असतं ? तर ज्यांच्या कडे अयोध्या मंदिराचा कारभार आहे. 

हा कारभार कोण पाहतं ? मंदिराच्या ट्रस्टवर कोण कोण आहे ? बांधकामाची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे आहे ? सदस्य कोण आहेत? हे सगळ बघूया…

सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये पाडलेल्या बाबरी मशीद प्रकरणी दिलेल्या निकालात अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. हा ट्रस्ट तीन महिन्यांत स्थापन करण्यात येणार होता. त्यानुसार केंद्र सरकारने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट (SRJBTKshetra) ची स्थापना केली. 

५ फेब्रुवारी २०२० रोजी पंतप्रधानांनी संसदेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी १५ सदस्यांची निवड केली. पुढे १९ फेब्रुवारीला ट्रस्टने या १५ सदस्यांना पदाधिकारी म्हणून नियुक्त केले.

ट्रस्टच्या १५ सदस्यांऐवजी १२ सदस्य भारत सरकारने नामांकित केले होते आणि १९ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत तिघांची निवड करण्यात आली होती.

यात कोण कोण आहेत बघूया ?

महंत नृत्य गोपाल दास : 

राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख म्हणून काम करत असलेले नृत्य गोपाल दास यांना राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. त्यांची १५० हून अधिक पुस्तके वेदांतावर प्रकाशित झाली आहेत. महंत नृत्य गोपाल दास हे १९८४ पासून राम मंदिर चळवळीत सक्रीय होते, त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंदिराच्या कार्यशाळेत राम मंदिरासाठी दगड कोरण्यात आले. त्यांच्यावर वादग्रस्त ढाचा पाडण्याच्या आरोपात सीबीआयने फौजदारी कलमांतर्गत गुन्हा ही दाखल केलेला होता.

के. परसरन :

जेष्ठ अधिवक्ता म्हणून के. परसर यांची नियुक्ती केली आहे. यांची मुख्य ओळख सांगायची म्हणजे ते भारताचे माजी ॲटर्नी जनरल होते. त्यांनी सलग ९ वर्षे राम लल्लाच्या बाजूने वकिली केली. अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात परसरन यांनी अयोध्येत एका विशिष्ट ठिकाणी राम लल्लाच्या जन्मासंदर्भातील ऐतिहासिक तथ्ये मांडली होती. तसेच,

“भगवान रामच्या जन्माविषयी लोकांचा असलेला अटळ विश्वास हाच राम लल्लाचा जन्म तिथे झाल्याचा पुरावा आहे” असा युक्तिवाद राम लल्लाच्या पक्षातर्फे मांडला होता.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज : हे बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य आहेत.

जगद्गुरु मध्वचार्य स्वामी विश्व प्रसन्नाथर्थीजी महाराज : हे कर्नाटकातील उडपी येथील पागेवार मठाचे ३३ वे पितृधिश्वर आहेत.  

विहिंपचे नेते चंपत राय : हे राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी १९८४ पासून राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राममंदिर आंदोलनाचे रणनीतीकार म्हणून त्यांना ओळखले जाते. तसेच मंदिराचे आर्थिक हिशोबही तेच पाहतात.

महंत गोविंद गिरी : हे महंत कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतात. स्वामी गोविंद देव गिरी महाराज (ब्राह्मण) यांचा जन्म १९५० मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथे झाला. ते देश-विदेशात रामायण, भगवद्गीता, महाभारत आणि इतर पौराणिक ग्रंथांचा प्रचार करतात. स्वामी गोविंद देव हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू पांडुरंग शास्त्री आठवले यांचे शिष्य आहेत.

विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा : हे अयोध्या राजघराण्याचे वंशज आहेत. रामायण मेळावा संरक्षक समितीचे सदस्य आहेत तसेच त्यांनी २००९ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

श्री कामेश्वर चौपाल : जे या समितीमधील एकमेव दलित सदस्य आहेत. ते अयोध्या चळवळीशी संबंधित आहेत. कारसेवक म्हणून त्यांनी १९८९ मध्ये राम मंदिरात पायाभरणीची पहिली वीट ठेवली होती. दलित असूनही त्यांची राम मंदिर चळवळीत सक्रिय भूमिका होती त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे.

महंत दिनेंद्र दास : हे अयोध्येतील निर्मोही आखाड्याचे प्रमुख आहेत.

इतर सदस्यांमध्ये युगपुरुष परमानंद गिरी यांचाही समावेश आहे.

डॉ. अनिल मिश्रा : हे मूळचे आंबेडकरनगरचे रहिवासी असलेले अनिल अयोध्येचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आहेत. ते होमिओपॅथी मेडिसिन बोर्डाचे रजिस्ट्रार आहेत. तसेच १९९२ मधील राममंदिर आंदोलनात ते सक्रीय होते म्हणून त्यांना हि संधी देण्यात आली होती.  सध्या ते संघाच्या अवध प्रांताचे प्रांत कार्यकारी आहेत.

IAS नृपेंद्र मिश्रा:

पदसिद्ध सदस्यांमध्ये पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आहेत. ते कंस्ट्रक्शन कमिटीचे अध्यक्ष आय ए एस नृपेंद्र मिश्रा जे कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतात, आय ए एस शत्रुघन सिन्हा, आय ए एस दिवाकर त्रिपाठी, तसेच प्रोफेसर रमण सुरी जे दिल्लीतील आर्किटेक्चर युनिवर्सिटीचे माजी कुलगुरू होते.

याशिवाय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अवनीश के अवस्थी, अयोध्येचे जिल्हा दंडाधिकारी IAS ज्ञानेश कुमार यांचाही यात समावेश आहे. 

ट्रस्टच्या वेबसाइटनुसार, मंदिराच्या बांधकाम समितीमध्ये ७ सदस्य आहेत आणि मिश्रा अध्यक्ष आहेत. इतर सहा म्हणजे शत्रुघ्न सिंग, उत्तराखंड सरकारचे माजी मुख्य सचिव दिवाकर त्रिपाठी, निवृत्त आयएएस अधिकारी आणि व्यवस्थापकीय प्रमुख प्रा. रमण सुरी, आर्किटेक्चर स्कूलचे सेवानिवृत्त डीन केके शर्मा, बीएसएफचे माजी डीजी अनूप मित्तल, माजी सीएमडी, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन आणि सचिव, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आशुतोष शर्मा यांचा यात समावेश आहे. 

ट्रस्टने ११ नोव्हेंबर २०२० रोजी मंदिराच्या बांधकाम समितीला मान्यता दिली.

मंदिराच्या उद्घाटनाबाबत ट्रस्टने अशी माहिती दिलेली कि, राम मंदिराचा तळमजला डिसेंबर २०२३ पर्यंत तयार होईल आणि जानेवारी २०२४ पर्यंत ‘प्राणप्रतिष्ठा’ झाल्यानंतर भक्त दर्शनासाठी येऊ शकतात. 

मिश्रा यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते की, “मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृह डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, तर मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला डिसेंबर २०२४ पर्यंत तयार होईल, आणि मंदिराचे संपूर्ण कोरीव काम २०२५ च्या शेवटपर्यंत पूर्ण होईल”.

अशी होती संपूर्ण माहिती मंदिराच्या ट्रस्ट मधील सदस्यांबद्दल, मात्र अमित शहांनी जी घाईघाईने घोषणा केली त्याची कुठे तरी लिंक लागते ती राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला. त्याच झालं असं कि, गेल्या आठवड्यात राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला “आशीर्वाद” दिला होता. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी चंपत राय आणि स्वामी गोविंद देव गिरी या दोघांनी भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ विधान केलेलं. 

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या यात्रेला पाठिंबा दिल्याचा परिणाम म्हणजे, काँग्रेसवर निशाणा साधत अयोध्या मंदिर पूर्ण होण्याची तारीख जाहीर केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.