कोण आहेत फिडेल आणि राउल कॅस्ट्रो यांचे उत्तराधिकारी..?

 

      ‘क्यूबा म्हंटलं की कॅस्ट्रो आणि कॅस्ट्रो म्हंटलं की क्यूबा’ असं एक समीकरणच गेल्या कित्येक वर्षात झालंय. पण क्यूबाच्या इतिहासात कालचा दिवस मात्र ऐतिहासिक ठरला. ६० वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच क्यूबाने कॅस्ट्रो घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड राष्ट्राध्यक्षपदी केली. त्यामुळे क्यूबातील कॅस्ट्रो युगाचा अंत होऊन ‘मीग्युएल डायझ कॅनल’ हे क्यूबाच्या अध्यक्षपदी आरूढ झाले. १९५९ साली झालेल्या क्यूबन क्रांतीनंतर फिडेल कॅस्ट्रो यांनी क्यूबाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. २००६ पर्यंत फिडेल हेच क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर २००६ साली त्यांनी आपले बंधू आणि क्यूबन क्रांतीतील साथीदार राऊल कॅस्ट्रो यांची अध्यक्षपदी निवड केली. हाच  वारसा आता कॅनल पुढे चालवतील.

कोण आहेत मीग्युएल डायझ कॅनल..?

      मीग्युएल डायझ कॅनल हे क्यूबन कम्युनिस्ट पक्षाचे आणि कॅस्ट्रो घराण्याचे निष्ठावंत राहिलेले आहेत. राऊल कॅस्ट्रो यांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी आणि त्यांचा उजवा हात म्हणून कॅनल यांच्याकडे बघितलं जातं. क्यूबाने काल एकमताने त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड केली. कॅनल जरी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले असले तरी सत्तेची सूत्र अप्रत्येक्षपणे राऊल कॅस्ट्रो यांच्याकडेच राहतील कारण कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव आणि सैन्यदलाचे प्रमुख या पदावर राऊल कॅस्ट्रो हेच कायम राहणार आहेत. त्यामुळे राऊल कॅस्ट्रो यांच्या छत्रछायेखालीच मीग्युएल डायझ कॅनल यांना काम करावं लागणार आहे.

२०१३ साली क्यूबाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच ते प्रकाशझोतात आले. स्वभावाने अतिशय शांत असणारे कॅनल प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या सहकाऱ्याच्याच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या देखील कार्यशैलीबद्दल लोकांचं काही गाऱ्हाणं असेल तर लोकं थेट जाऊन त्यांना सांगू शकतात. १९८९ साली जेव्हा क्यूबा दीर्घकालीन आर्थिक मंदीला तोंड देत होता आणि देशात इंधनाचा मोठा तुटवडा होता त्यावेळी कॅनल सरकारी गाडी किंवा ड्रायव्हर न घेता स्वतःच्या सायकलवरूनच ऑफिसला जात असतं, असं त्यांच्याविषयी सांगितलं जातं.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील क्यूबाच्या भूमिकेत काय बदल संभवतात..?

राऊल कॅस्ट्रो यांच्या जागी मीग्युएल डायझ कॅनल यांची नियुक्ती ही क्यूबन कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत झालेली आहे. त्यामुळे क्यूबाच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर त्याचा फार काही परिणाम होण्याची शक्यात नाही. “आमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील भूमिकांमध्ये बदल करण्याचा आमचा कुठलाही इरादा नाही. महान समाजवादी विचारसरणी हीच क्यूबासाठी कल्याणकारी आहे, यावर आमचा ठाम विश्वास असून त्याच मार्गाने आम्ही भविष्यात वाटचाल करु. कम्युनिस्ट पक्ष हाच क्युबासाठी सर्वोच्च मार्गदर्शक आणि अग्रदल असेल. देशात परत भांडवलशाही आणू इच्छिणाऱ्यांना आपल्या नेतृत्वाखालील क्यूबामध्ये कसलीही जागा असणार नाही” हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात कॅनल यांनी स्पष्ट केलं.

अमेरिकेसोबत क्यूबाच्या बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर कॅनल यांची क्यूबाच्या अध्यक्षपदी निवड झालेली असल्याने या आघाडीवर त्यांच्यावर फार मोठी जबादारी असणार आहे. बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान असताना अमेरिका आणि क्यूबा यांच्यातील संबंधात बरीच सुधारणा आली होती परंतु डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून पुन्हा अमेरिका आणि क्यूबा यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती कॅनल कशी हाताळतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.