नुपूर शर्मा प्रकरण चर्चेत आणलेल्या मोहम्मद झुबेरवर FIR टाकण्यासाठी बक्षीस जाहीर झालेत

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी झुबेर आणि त्याच्या पोर्टलवर दाखल केलेल्या पहिल्या एफआयआरसाठी ₹1,000. जी पहिल  व्यक्ती झुबेरला अटक करवून दाखवेल तिला ₹10,000 आणि आणि जी पहिली व्यक्ती झुबेरला दोषी ठरवून दीर्घ कारावासाची शिक्षा घडवून आणेल तिला ₹50,000 इनाम.

असं पद्धतशीरपणे रेटकार्ड मोहम्मद झुबेरच्या अटकेसाठी जाहीर करण्यात आलं आहे. 

अरुण पुदुर या अब्जाधिश बिझनेसमनने हे ट्विटरवर हे रेट कार्ड जाहीर केलं आहे. मोहम्मद झुबेरने हिंदू देव देवतांचा अपमान केला आहे असा अरुण पुदुर याचा आरोप आहे.

पुदुर याच्या रेटकार्डची चांगलीच चर्चा झालीच यालाच मग जोड मिळाली सुशिल केडिया या बिझनेसमनची.

 

त्यांनी तर अरुण पुदुरने जाहीर केलेली  इनामाची रक्कम कैक पटीने वाढवली. त्यामुळं आता मोहम्मद झुबेरच्या विरोधात एफआयआर दाखल होण्यास सुरवात देखील झाली आहे.

उत्तरप्रदेशात त्याच्या विरोधात लागलीच दोन एफआयआर देखील दाखल झाले आहेत.

या आधी १३ जूनला हिंदू नेते यति नरसिंहानंद सरस्वती, बजरंग मुनी आणि आनंद स्वरूप यांना “द्वेष करणारे” म्हणून संबोधल्याबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाने  मोहम्मद झुबेरच्या विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता.

त्यामुळे हा मोहम्मद झुबेर कोण आहे आणि त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी बक्षिसं का जाहीर होत आहेत तेच एकदा बघू.

तर मोहम्मद झुबेर हा अल्ट न्युज या वेब पोर्टलचा सहसंस्थापक आहे. 

प्रतीक सिन्हा हे अल्ट न्यूजचे दुसरे फाउंडर आहेत. फॅक्टचेकिंगची कामं या न्यूज वेबसाइटकडून केली जातात. मोहम्मद झुबेर स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन खोट्या दाव्यांची पोलखोल करताना दिसतो. विशेषतः हिंदू राइट विंग अकाऊंट्स झुबेरच्या टार्गेटवर असतात. 

न्यूज चॅनेलवर होणाऱ्या अनेक धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या घटनाही मोहम्मद झुबेर प्रकाशझोतात आणत असतो. 

अनेकदा बॉयकॉटपासून ते अगदी जीवे मारण्याच्या धमक्यादेखील त्याला मिळाल्या आहेत. मात्र त्याचं हे काम करताना तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे आणि विविध कारणांसाठी त्याच्यावर एफआयआर देखील नोंदवले गेले आहेत. याआधीच त्याच्यावर ५ एफआयआर दाखल होते. 

पॉस्को कायद्यांतर्गतही एफआयआर दाखल आहे 

सप्टेंबर २०२० मध्ये दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल आणि छत्तीसगडमधील रायपूर शहरातील पोलिसांनी झुबेरवर माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा २००० आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा २०१२ च्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. एका अल्पवयीन मुलीचा तिच्या वडिलांसोबत तिचा चेहरा अस्पष्ट असलेला फोटो झुबेरने पोस्ट केला होता.

मुलीच्या वडिलांची झुबेरशी शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यांनतर मग झुबेरने त्यांचा फोटो ट्विटरवर टाकला होता.

मे २०२२ मध्ये, दिल्ली पोलिसांनी एफआयआर रद्द करण्याच्या मागणीच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की ट्विट “कोणताही दखलपात्र गुन्हा ठरत नाही”. जुबेरला यापूर्वी दिल्ली तसेच रायपूर येथील खटल्यात अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते.

असाच एक एफआयआर जून २०२१ मध्ये नोंदवण्यात आला होता. 

गाझियाबादमधील एका वृद्धाला मारहाण होण्याचं कारण काही वैयक्तिक असताना झुबेरने त्याला धार्मिक वादाचं रूप दिल्याचा आरोप झाला होता. 

मात्र त्या नंतरही त्याच्यावर वारंवार गुन्हे दाखल केले गेलेच. अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांच्या मते त्यांच्या कामात अडथळे आणण्यासाठी अशा गोष्टी मुद्दामून केल्या जात आहेत. ज्यामुळे त्यांचा बराच वेळ आणि पैसा या कामात वाया जातो. 

सध्या ज्या प्रकरणात अलाहाबाद न्यायालयाने झुबेरवरील एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन कट्टर हिंदुत्ववाद्यांना ट्विटमध्ये “द्वेषी” संबोधल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.  

यती नरसिंहानंद सरस्वती, बजरंग मुनी आणि आनंद स्वरूप या तीन जणांना ‘हेट मोन्गरर्स” म्हणजेच ”द्वेष पसरवणारे” म्हटल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्यांना त्याने  ”द्वेष पसरवणारे” म्हटले आहे त्या तिघांवर याआधीच धर्मसंसदेत मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. मात्र आमच्या साधू संतांना ”द्वेष पसरवणारे” म्हटल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा तक्रारकर्त्यांचा दावा आहे.

मात्र झुबेरवर एफआयआर दाखल करण्यासाठी इनाम देण्यात येत आहेत त्याचं कारण वेगळं आहे. झुबेर याने एका ट्विटमध्ये हिंदू देव देवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

 

महाभारतातही इंटरनेट होतं असं वक्त्यव्य एकदा भाजपचे त्रिपुराचे तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी केला होतं त्यावर झुबेरने हे ट्विट केलं होतं. आता झुबेरचे असे अनेक जुने ट्विट बाहेर काढून हिंदुत्ववाद्यांकडून झुबेरवर कारवाईची मागणी केली जात आहे.

मात्र झुबेर ट्विटरवर पुन्हा ट्रेंड करण्यास सुरवात झाली नुपूर शर्मा प्रकरणानंतर. 

 

भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविरोधात केलेलं वक्तव्य झुबेरने केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आलं होतं आणि त्यांनतर त्या प्रकरणाला हवा मिळाली होती. झुबेरने शर्माच्या टिप्पण्यांचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नुपूर शर्मा हिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यांनतर या धमक्यांना झुबेर जबाबदार असल्याचा आरोप तिने केला. 

मात्र यावर झुबेरने मी माझे पत्रकार म्हणून जे कर्तव्य आहे तेच केल्याचं म्हटलं होतं. 

त्यानंतर भारताला जगभरात सहन कराव्या लागलेल्या बॅकक्लॅशचे खापरसुद्धा झुबेरवर फोडण्यात येत होतं. आणि तेव्हापसूनच तो राइट विंगच्या रडारवर होता. त्यामुळं आता जसं जिग्नेश मेवानीला आसाम पोलिसांनी उचललं होतं तशीच गत उत्तरप्रदेश पोलीस झुबेरची करणार का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. याचं उत्तर आता येणाऱ्या काळातच कळेल. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.