गणपती बाप्पाचा जयजयकार करताना मोरया का म्हणतात ?

महाराष्ट्रातला गणेशोत्सव म्हणजे विचारूच नका. ढोल ताशे, गुलाल,फुलमाळा, गणपतीची जबरदस्त गाणी. हे सगळं आपण अनुभवत असतो , जगत असतो. गणपती बाप्पा मोरया ही ओळ आपण आजवर कितीवेळा म्हणली असेल हे आपल्यालासुद्धा सांगता येणार नाही. पण गणपतीचा जयजयकार करताना मोरया का म्हटलं जातं हा प्रश्न पण आपल्याला पडल्यावाचून राहत नाही.

या मोरयाचं उत्तर आहे पिंपरी चिंचवड मध्ये. औद्योगिक केंद्र असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये मोरया गोसावीचं मंदिर आहे. १३ व्या शतकात मोरया गोसावी हे हिंदू धर्म वा गाणपत्य पंथातील एक मोठे संत होते. तिथं जाणारे श्रद्धाळू गणपतीच्या घोषणा करताना किंवा देवाला अभिवादन करताना गणपती बाप्पा मोरया म्हणत असत. पुढे पुढे हीच घोषणा रूढ झाली.

महाराष्ट्रात गणेश देवता सगळ्यात प्रसिद्ध आहे तेच होते मोरया गोसावी. त्यांनी या भागात गणपतीची भक्ती मोठ्या प्रमाणात रूढ केली. मोरया गोसावी कोणत्या काळात होऊन गेले याबद्दल अनेक मतभेद आहेत. इंडोलॉजिस्ट युवराज कृष्णन यांच्या मते मोरया गोसावी हे १३-१४ व्या शतकात होऊन गेले. तर आर.सी.ढेरे यांच्यामते ते १६ व्या शतकात होऊन गेले.

संत मोरया गोसावी कोणत्या काळात होऊन गेले ही गोष्ट सोडली तर भारतात इतर संतांबद्दल वाटणार प्रेम लोकांमध्ये होतं तसंच प्रेम लोकांना मोरया गोसावी बद्दल सुद्धा होतं. मोरया गोसावी बद्दल लोकांमध्ये अनेक कथा आणि चमत्कार चर्चिले जातात. मोरया गोसावी यांचा जन्म पुण्यापासून ५० किमी अंतरावरच्या मोरगाव मध्ये झाला होता. वडील वामनभट्ट आणि आई पार्वती.

मोरया गोसावी यांचे आईवडील मूळचे कर्नाटकचे होते पण ते तीर्थ यात्रेसाठी मोरगावला यायचे आणि पुढे ते इथेच स्थायिक झाले. मोरगाव हे महाराष्ट्रातील मयुरेश्वर/ मोरेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. तीर्थ यात्रेहून आल्यावर या दाम्पत्याला एक मुलगा झाला त्याच नाव मोरेश्वर वरून मोरया ठेवलं.

मोरया गोसावी हे लहानपणापासूच देवभक्ती करण्याकडे कल असलेले होते. वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी ४२ दिवस थेऊर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी याना थेट गणपतीचं दर्शन झालं. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले. चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये अंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेशमूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला.

मोरया गोसावी यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात की नेत्रहीन मुलीला त्यांनी दृष्टी दिली. चिंचवडवरून जेव्हा ते मोरगावला जात असत तेव्हा मंदिरांचे कुलुप आपोआप उघडले जात असे. अन्नदान करून त्यांनी अनेक गरजू लोकांची भूक भागवली. मोरया गोसावी यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर होता आणि भरपूर लोकं त्यांना भेटायला येत असे.

मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांच्या मुलाने १७ व्या शतकात समाधीवर गणेशमंदिर उभारलं. असंही म्हटलं जातं की संत तुकाराम हे मोरया गोसावी याना देव म्हणून हाक मारत असे. त्यामुळे पुढे त्यांच्या परिवाराने देव हे नाव धारण केल. नंतर मोरया गोसावी यांच्यानंतर चिंतामणी देव आणि नंतर नारायण देव उत्तराधिकारी झाले. चिंचवडच्या गणेश मंदिरात मोरया गोसावी यांच्या सहा वंशजांचे मंदिर आहेत.

पुणे जिल्ह्याच्या राजपत्रात एक गोष्ट आहे की औरंगजेबाने एकदा नारायण देव यांना भेटीत मांस पाठवल होतं आणि नारायण देव यांनी त्याच चमेलीच्या फुलात रूपांतर केलं होतं. यावर प्रभावित होत औरंगजेबाने आठ गाव ( बाणेर, चिखली,चिंचवड, मान,चरोली बुद्रुक,चिंचोली आणि भोसरी) त्यांना भेट म्हणून दिली होती. ही गावं आज पुण्याची उपनगरं आहेत.

मोरया गोसावी यांची गणपती बाप्पावर अफाट श्रद्धा होती म्हणून त्यांच्या भक्तीसाठी गणपती बाप्पा मोरया हे अभिवादनपर वाक्य/घोषणा रूढ झाली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.