२००२ च्या दंगलीवेळी मोदींची बाजू मांडणाऱ्या वकिलानेच अखेर शाहरुखच्या पोराला सोडवलं

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आर्यन खानसाठी देशातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची मदत घेण्याचा शाहरुखचा निर्णय योग्य ठरला. कनिष्ठ न्यायालयाने दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनला गुरुवारी संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.

आता ज्यांच्या युक्तिवादामुळे आर्यनची सुटका होऊ शकली ते मुकुल रोहतगी काय साधेसुधे वकील नाहीत. तर २००२ च्या दंगलीवेळी ज्यांनी मोदींची बाजू मांडली होती त्याच वकिलांनी शाहरुखच्या पोराला सोडवलंय.

ज्यांना प्रश्न पडलाय मुकुल रोहतगी कोण आहेत ? त्यांच्यासाठी 

मूळचे दिल्लीचे असणाऱ्या मुकुल रोहतगी यांचे वडील अवध बिहारी रोहतगी दिल्ली हायकोर्टात जज होते. आता वडिलांकडून आलेली विरासत पुढं सुरू ठेवली पाहिजे म्हणून रोहतगी यांनी मुंबईच्या गवर्मेंट लॉ कॉलेजला कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कॉलेज संपल्या संपल्या वेळ न दवडता वकिलीची प्रॅक्टिस पण सुरु केली.

आता प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांनी योगेश कुमार सभरवाल या जेष्ठ वकिलांची निवड केली. म्हणजे कायद्यातल्या खाचाखोचा कळतील. हे योगेश कुमार दिल्ली हायकोर्टचे ३६ वे चीफ जस्टीस पण राहिलेत. त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच रोहतगी यांनी स्वतंत्र केसेस घ्यायला सुरुवात केली. यातून नाव मिळायला लागलं. मग काय…१९९३ मध्ये रोहतगी यांना दिल्ली हायकोर्टाचे वरिष्ठ वकील म्हणून दर्जा मिळाला. या वरिष्ठ वकिलीच्या काळात त्यांनी मोठमोठ्या हायप्रोफाईल केसेस सॉल्व केल्या.

याच काळात त्यांची मैत्री अरुण जेटलींशी झाली. जेटलींसोबतची मैत्री आणि वकील म्हणून दिल्लीतल्या लोधी गार्डनला भेट देण्याच्या आठवणींचा रोहतगी वारंवार उल्लेख करतात. दिल्ली हायकोर्टात तर त्यांची केबिन बाजूबाजूला होती. इतकंच नाही तर कोर्टात एकमेकांपुढ्यात उभं राहून लढणारे हे दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंडच होते. पुढं अरुण जेटली भाजपचे मोठे नेते झाले. आणि त्यामुळेच कि काय रोहतगी यांची सुद्धा भाजप बरोबर सलगी वाढली.

यातूनच १९९९ उजाडतंय तोवर तर रोहतगींना वाजपेयी सरकारने भारताचा ऍडिशनल सॉलिसिटर जनरल बनवलं.

पण २००२ ची ती गुजरात दंग्यांची केस कोणीच विसरू शकत नाही. किमान किमान नरेंद्र मोदी तर अजिबात नाही. मोदींवर या रोहतगींचे मोठ्ठे उपकार आहेत. जेव्हा गुजरात दंग्यांची केस सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा मोदींची म्हणजेच गुजरात सरकारची बाजू मांडण्यासाठी अरुण जेटलींनी रोहतगींनी केस लढवण्याची गळ घातली. रोहतगींनी आपल्या मैत्री खातर ही केस घेतली. आणि एकदम स्ट्रॉन्गली मांडली. याचा परिणाम मोदी सहीसलामत सुटले. आणि रोहतगींच नाव मोठं झालं.

पण पुढं पंतप्रधान झाल्यावर मोदींनी पण या उपकारांची परफेड केली बरं का ? अटॉर्नी जनरल बनवून.

गुजरात दंग्यांचीच केस नाही तर रोहतगी यांनी बेस्‍ट बेकरी केस, जाहिरा शेख प्रकरण, योगेश गौडा हत्या प्रकरण अशा केसेस रोहतगींनी हॅन्डल केल्यात. 

जेव्हा आर्यन खानची केस रोहतगींनी आपल्या हातात घेतली तेव्हा सगळीकडे त्यांच्या फीची चर्चा सुरु झाली.

याआधी पण त्यांच्या फीच्या चर्चा झाल्यात पण इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही. पहिली चर्चा १.२० कोटींच्या फीची झाली होती. सीबीआयचे न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची केस महाराष्ट्र सरकारने मुकुल रोहतगी यांच्याकडे दिली होती. स्पेशल प्रॉसिक्यूटर म्हणून त्यांची फी पण काय थोडी थोडकी नव्हती. तर १. २० कोटी इतकी भारीभक्कम फी रोहतगी यांनी घेतली होती. आता चर्चा आहे की, आर्यन खानच्या प्रकरणात दिवसाची फी १० ते २० लाख लावली आहे.

शेवटी मोदी असो वा आर्यन खान…आपण सुटलो म्हणून हे लोक रोहतगी यांना कायम ध्यानात ठेवतील. 

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.