पहिल्या मॅचला निभावून गेलं, पण आजही भारताचं टेन्शन वाढवणारा नसीम शहा आहे कोण ?
गेल्या रविवारची भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानच्या टीममध्ये नव्हता म्हणून आपण थोडे निवांत होतो. केएल राहुलकडून चांगल्या स्कोअरची अपेक्षा होती. पण झालं भलतंच, मॅचच्या दुसऱ्याच बॉलला पाकिस्तानच्या राहुल बोल्ड. भारत पाकिस्तान मॅच, क्रिकेट विश्वातलं सगळ्यात मोठं स्टेज आणि केएल राहुल शून्यावर बोल्ड, तेही पहिल्याच बॉलला.
ही विकेट काढणारा बॉलर होता नसीम शाह, फक्त १९ वर्षांचा पोरगा.
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असली की आधी आपल्याला सईद अन्वर, झहीर अब्बास, इंझमाम यांचं टेन्शन असायचं तसंच, वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर यांचंही असायचं. नंतर ही टेन्शन देण्याची जबाबदारी शाहिद आफ्रिदीनं पार पाडली. लाला रिटायर झाला आणि तोवर शाहीनशाह आफ्रिदीनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली.
२०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये भारताला जो लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला, त्याचा सूत्रधार हाच शाहीनशाह आफ्रिदी होता. इंज्युरीमुळे तो एशिया कपमध्ये खेळणार नाही, हे जेव्हा समजलं तेव्हा कित्येक चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण एशिया कपमध्ये जेव्हा भारत पाकिस्तान पहिल्यांदा समोर आले, तेव्हा नसीम शाहनं दुसऱ्याच बॉलला आपल्याला टेन्शन दिलं. तरी विराट कोहलीचा कॅच सुटला म्हणून बरं, नाहीतर मॅच जिंकणं आणखीनच अवघड झालं असतं.
पण ह्यो १९ वर्षांचा गडी भारताच्या टॉप क्लास टीमला हैराण करतोय, म्हणजे त्याच्यात काहीतरी विशेष असणार हे फिक्स…
केएल राहुलच्या विकेटनंतर नसीमनं विराट कोहलीला जो पहिला बॉल टाकला, त्या बॉलचं कौतुक स्ट्राईकवर असलेल्या विराट कोहलीनंही केलं होतं. त्याच ओव्हरमध्ये नसीमला क्रॅम्प आला, पण गडी हार मानणारा नव्हता, हे हार न मानायचं स्किल तो फार आधीपासूनच शिकलाय.
नसीमच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. साहजिकच त्याच्या वडिलांचं म्हणणं होतं, त्यानं क्रिकेटवैगेरेच्या नादी न लागता, अभ्यासाकडे लक्ष द्यावं. सेफ करिअर करावं. पण नसीमच्या डोक्यात क्रिकेटचं खुळ पूर्णपणे भिनलं होतं. वयाच्या १५ व्या वर्षी त्यानं प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली.
घरचा विरोध होताच, पण एक व्यक्ती मात्र नसीमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, ती म्हणजे त्याची आई.
नसीमचं प्रॅक्टिसचं रुटीन ठरलं होतं, सायकल चालवत अकादमी गाठायची, ४ तास तिथं फक्त बॉलिंग करायची. त्यानंतर परत सायकल चालवत घरी यायचं, पुन्हा अकादमी आणि पुन्हा ४ तास बॉलिंग. पहिल्या काही दिवसातच त्याची बॉलिंग बघून पाकिस्तानमध्ये त्याचं नाव मोठ्या प्रमाणावर पसरत होतं. वसीम वकारपासून सुरू झालेली परंपरा चालवायला एक नवा आणि भारी बॉलर येतोय, हे लोकांना कळून चुकलं होतं.
ऍक्शनमध्ये बदल होत गेले, नसीमला मेंटली आणखी स्ट्रॉंग बनवण्यात आलं, पण त्याच्या करिअरमध्ये गेमचेंजर ठरलं, ते त्याचं कसोटी पदार्पण.
२०१९ ची गोष्ट, नसीम शहाची पाकिस्तान ए टीममध्ये निवड झाली होती. पाकिस्तानची ए टीम तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. नसीमचा या सिरीजमधला खेळ पाहून त्याची पाकिस्तानच्या मेन टीममध्ये निवड होईल हे फिक्सच होतं. मॅचला आठवडा राहिला होता, नसीम शहा पाकिस्तानकडून वयाच्या फक्त १६ व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणार होता.
तेवढ्यात बातमी आली की, नसीमच्या आईचं निधन झालंय. त्याच्याकडे दोन ऑप्शन होते, पाकिस्तानला घरी परत जायचं किंवा टीमसोबत थांबायचं. १६ वर्षांच्या पोरासाठी असा निर्णय घेणं अवघड असतं, पण तो टीमसोबत थांबला. पुढच्याच आठवड्यात त्यानं पाकिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
तिथून जो प्रवास सुरू झाला, तो आता पाकिस्तानचा हुकमी बॉलर होण्यापर्यंत पोहोचला आहे.
२०२० मध्ये नसीमनं बांगलादेश विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली. टेस्ट हॅटट्रिक नावावर असणारा तो वयानं सगळ्यात लहान बॉलर आहे. हे यश इथवरच थांबलं नाही, पाकिस्तानच्या होम आणि अवे सिरीजमध्ये तो सातत्यानं दिसू लागला. त्याचं नाव इतकं गाजलं की इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘द हंड्रेड’ सिरीजमध्ये खेळण्यासाठीही त्याची निवड झाली.
झटपट यश मिळत असलं, तरी दुखापतींनी शब्दश: त्याची पाठ सोडली नाही. १९ व्या वर्षापर्यंत त्याच्या पाठीच्या अनेक सर्जरीज झाल्या आहेत. जेवढा वेळ त्यानं सरावाला दिला असेल, तेवढाच वेळ त्याला हॉस्पिटलमध्येही काढावा लागलाय.
अनेकदा आपण बघतो की एखादी मोठी दुखापत झाली की फास्ट बॉलरला आपल्या ऍक्शनमध्ये, रनअपमध्ये बरेच बदल करावे लागतात. ज्याचा परिणाम त्याच्या स्विंगवर आणि मेन म्हणजे वेगावर होतो. सुरुवातीला नसीमची ऍक्शन हीच त्याच्या पाठीच्या दुखापतींचं मुख्य कारण होती. त्यानं कोचच्या मदतीनं ऍक्शन सुधारली, पण वेगावर परिणाम होऊ दिला नाही. उलट जास्त ताकद लाऊन त्याची बॉलिंग सुरूच राहिली.
अगदी रिदममध्ये असलेला रनअप, साधी सोपी ऍक्शन, हार्ड लेन्थ पकडून बॉल आपटण्याचं स्कील आणि संकटं, दुखापती आल्या तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद या गोष्टींमुळेच नसीम भेदक बनतो. वयाच्या १९ व्या वर्षी केएल राहुल, सूर्यकुमारच्या विकेट, खुद्द कोहलीकडून झालेलं कौतुक या गोष्टी दाखवून देतात नसीम शाह लंबी रेस का घोडा आहे…
त्यामुळं त्याला क्रॅम्प्स आले, दुखापत झाली तरी जोवर त्याचा स्पेल संपत नाही, तोवर भारतीयांचं टेन्शन कायम आहे…
हे ही वाच भिडू:
- एका पायावर खेळत पुण्याच्या केदार जाधवनं भारताला आशिया कप जिंकून दिला होता…
- मैदानावरचा इतिहास सांगतो, नागिन डान्स केल्यावर बांगलादेशची टीम फिक्स तोंडावर पडते…
- दीड वर्षाआधी टीमकडे साधे शूज नव्हते, आज झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा पराक्रम केलाय…