शिंदे गटाला लोकप्रियता देण्यात पुढे असलेले शहाजीबापू मंत्रिपदाच्या रेसमध्ये मागं पडले

“सिनियर लोक जे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि ते शिंदे साहेबांसोबत आले आहेत, त्यांना पहिले मंत्रिमंडळात घेण्यात आलं आहे. बाकी कुणीच नाराज नाहीये.” 

हे बोल आहेत शहाजीबापू पाटलांचे. 

राज्याला आज मंत्रिमंडळ मिळालं आहे. नवीन भाजप-शिंदे गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशी १८ मंत्री पदांची विभागणी करण्यात आली आहे. अनेक असे लोक ज्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा होती, त्यांना डावलण्यात आल्याचं दिसलं. 

यातीलच एक शहाजीबापू पाटील. शिंदे गटाच्या बंडानंतर एक चेहरा तुफान फेमस झाला तो म्हणजे  शहाजीबापू. त्यांची प्रसिद्धी आणि सोबतच त्यांचे समोर आलेले वक्तृत्व गुण बघून यंदाच्या मंत्रिमंडळात शहाजी बापूंनी त्यांची जागा फिक्स केल्याचं बोललं जात होतं. मात्र मंत्रिमंडळाची यादी समोर आली आणि सगळ्यांना धक्काच बसला. 

शहाजीबापूंना सपशेल डावलण्यात आलं. 

शहाजीबापू राजकारणात कसे आले? फेमस कसे झाले? आणि राज्याच्या राजकारणात स्वतःचं महत्व त्यांनी कसं निर्माण केलं ते त्यांना मंत्रिमंडळात स्थान कसं डावलण्यात आलं? बघूया… 

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शिंदे गट अशा जवळपास सगळ्याच राजकीय पक्षासोबत नाव जोडण्यात येणारे शहाजी बापू मुळचे कॉंग्रेसचे. ९० च्या दशकात त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे विद्यार्थी संघटनेतून त्यांनी राजकारणाच्या दिशेने पाहिलं पाऊल टाकलं.

१९९० साली पहिल्यांदा कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. पुढे १९९५ साली देखील ते कॉंग्रेसचेच उमेदवार म्हणून रणांगणात उतरले. यावेळी त्यांनी अशी एंट्री केली की गणपतराव देशमुख यांचा विजयी रथ त्यांनी १९२ मतांच्या विजयाने रोखला.  

पुढे १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. १९९९ ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली, यात त्यांचा पराभव झाला. परत काँग्रेसकडे गेले, २००४ साली कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली आणि पुन्हा पराभव झाला. २००९ साली पुन्हा कॉंग्रेसकडून लढले आणि पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं. 

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये नाणं खनकेनासं झालं तेव्हा त्यांनी शिवसेनेकडे जाण्याचा पर्याय निवडला. पण शिवसेनेकडे जाण्याचा त्यांचा निर्णय एका प्रसंगातून आला होता, असं स्वतः शहाजी बापूंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं.   

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. शहाजीबापू हे बातम्यांत पाहत होते. त्यांची अंत्ययात्रा निघाली.. तुफान गर्दी होती. त्यावेळी त्यांच्या बाळासाहेबांच्या प्रेताला अग्नी देताना उद्धव ठाकरे यांना पाहिलं अन् शहाजीबापूंच्या डोळ्यात अश्रू आले.

त्या दिवशी शहाजीबापू रडले आणि बायकोला म्हणाले…

” मी शिवसेनाचा आमदार होणार…”

त्यानंतर २०१३ त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढली. पण यावेळी देखील इतिहासाची पुनरावृत्ती झाली, त्यांना ७६ मतं मिळाळी आणि त्यांचा पराभव झाला. 

१९९९ ते २०१९ अशा दहा वर्षांच्या काळात १९९९, २००४, २००९, २०१४ असे सलग चार पराभव त्यांनी पाहिले. 

निवडणूक हरल्यावर गाव जवळ आल्यावर त्यांना भिती वाटायची. कारण, घरी गेल्यावर बायकोचं रडणं, ओरडणं त्यांच्या मनात यायचं. ‘याला उभं राहायला कुणी सांगितलं. सारखं उभा राहतेय, सारखं पडतेय.. आमचा आपमान करतेय… असं बायको म्हणायची..’  मग तिची कशीतरी समजूत काढायची आणि वेळ मारुन न्यायचो, असं शाहजीबापू सांगतात.

तरी शहाजी पाटील मातब्बर उमेदवार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात लढत राहिले. डाव्या विचारसरणीचे गणपतरावजी देशमुख यांनी ११ वेळा आमदाराकीची निवडणूक जिंकली म्हणून ते प्रसिद्ध झाले होते. त्यांच्याविरोधात निवडणूक लढणं सोपं नव्हतं. 

२०१९ साली त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि त्यांचा अवघ्या ६७४ मतांनी विजय झाला. यावेळी त्यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता. 

शहाजीबापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार झाले. 

सलग चार वेळा पराभव स्वीकारून तितक्याच ताकदीनं लढत राहणारे आमदार म्हणजे शहाजी पाटील.

आता त्यांच्या फेमस होण्याच्या टप्प्याकडे येऊया… 

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मतं फुटल्याचा जेव्हा शिवसेनेच्या समोर आलं तेव्हा त्यांनी नेत्यांना भेटीसाठी बोलावलं. मात्र या बैठकीला अनेक नेते उपस्थित झाले नाही. ते रात्रीत नॉट रिचेबल झाले. दुसऱ्या दिवशी बातमी आली…

‘एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे काही आमदार सुरतला गेले आहेत.’

राज्याच्या राजकारणात भूकंपाचे दणके सुरू झाले. पुढे दुसरी बातमी आली… ‘जवळपास ४० आमदारांसहित शिंदे गुवाहाटीला पोहोचले.’ इथेच शहाजीबापूंचा तो फोन कॉल व्हायरल झाला.

शहाजीबापूंनी याबद्दल माध्यमाला माहिती दिली होती..

सुरुवातीला गुवाहाटीला गेल्यानंतर फोन बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र लॉबीतून जात असताना काही आमदार घरी बोलत असलेले दिसले. दुपारची वेळ होती, शहाजीबापूंनी विचार केला की, आपणही आपल्या घरी बोलून घ्यावं. हॉटेलात काचेच्या पुढे ते उभे होते. बाहेर बघत बोलत होते आणि हेच बोलणं नंतर व्हायरल झालं. बोल होते..

काय झाडी..काय डोंगार..काय हाटील…एकदम ओक्के

हा डायलॉग व्हायरल झाला तेव्हा गुवाहाटीला गेलेल्या एका आमदाराचा हा फोन कॉल असल्याचं समोर आलं आणि कुणाचा तपास घेतला तेव्हा शहाजीबापूंचं नाव समोर आलं. माणदेशी भाषा ‘आहेदु’मध्ये हा डायलॉग होता. ही त्यांची सहजासहजी, दररोजची भाषा आहे. तीच लोकांना भावली होती आणि बोलण्याची स्टाईल आवडली होती.

शहाजीबापूंच्या या एका डायलॉगने बघता बघता सगळा सोशल मीडिया दणाणून काढला. फेसबुक, इन्स्टा, युट्युब सगळीकडे तेच ऐकू येऊ लागलं. लोकांच्या बोलण्यात हाच डायलॉग येऊ लागला. सगळं मीडिया त्यांच्याकडे पोहोचला आणि त्यांना डायलॉग म्हणायला लावू लागला. शहाजीबापूंचा चेहरा डोक्यात फिट झाला.

त्यांचा एक डायलॉग आला आणि ताणतणावात राजकीय वातावरणात देखील थोडी गमतीची लहर आली. पुढे राजकीय भाषणात टीका करताना ते आश्वासन देताना शहाजी बापूंच्या बोलांचा समावेश झाला. त्यावर गाणं सुद्धा आलं. अनेकांची कॉलर ट्यून हा डायलॉग झाला. डायलॉग ऐकलं की शहाजीबापू डोळ्यांसमोर आलेच समजा.

डायलॉगमुळे ते फेमस झाले आणि त्यांच्या मुलाखतीच्या रांगा लागल्या. तेव्हा त्यांचा राजकीय प्रवास समोर आला. शाहजी बापूंचं वक्तृत्व कैशल्य समोर आलं, त्यांची हुशारी लोकांच्या लक्षात आली. जेवढे शहाजीबापू माध्यमांसमोर खुलले तितके ते लोकांना भावतंच गेले. खूप कमी नेत्यांच्या पदरी हे यश येतं त्यात शहाजीबापू समाविष्ट झाले.

लोकांमध्ये त्यांची असलेली साफ प्रतिमा आणि त्यांच्याबद्दल निर्माण झालेला सॉफ्ट कॉर्नर बघता मंत्रिमंडळात त्यांचा समावेश फिक्स समजला जात होता. त्यांचं ज्ञान बघून आणि त्यांचं पर्यावरणाशी प्रेम बघून शहाजीबापूंना पर्यावरण मंत्री केलं जाईल, असे तर्क देखील लावण्यात येत होते.

मात्र एका मुलाखतीत शाहजीबापूंनी सांगितलं होतं की त्यांना ‘शालेय शिक्षण मंत्री’ व्हायला आवडेल.

गेल्या अडीच वर्षाच्या काळात जिल्हा नियोजन समितीतून ८५ लाख रुपये सांगोला तालुक्यातल्या विद्युत वितरणाच्या कामासाठी मिळाले. शहाजी पाटील यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदा सांगोला तालुक्याला टेंभूचं उन्हाळी आवर्तन मिळालं. तसंच पाणीदार आमदार म्हणत, त्यांनी नीरा उजव्या प्रकल्पाच्या ६० कोटींच्या कामांचा शुभारंभही केला होता.  शहाजी पाटील यांच्या फेसबुकवरतीच त्यांच्या कामांची पोचपावती आहे.

अशा शहाजीबापूंचं आज मंत्रिमंडळात दूरवर नाव दिसलं नाही. सगळे तर्क विफल झालेले दिसले. याबद्दल त्यांना विचारल्यावर त्याच निरसतेने शहाजीबापू म्हणताना दिसतात.. “मी नाराज नाही”

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.