प्रवीण चव्हाण यांनी लढवलेली घरकुल, डीएसके अशी सगळीच प्रकरणं गाजलेली आहेत

आपण कालपासून विधिमंडळाच्या अधिवेशनात चालू असलेल्या गदारोळ पाहतोय.  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला असून त्या द्वारे मोठे आरोप केले आहेत. आघाडी सरकार षड्ययंत्र रचत असून त्याचे हे पुरवले म्हणत त्यांनी तो पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. असा सगळा प्रकार आपण काल लाईव्ह पहिलाच…

फडणवीस आरोप करतांना म्हणाले की, “अलीकडील काही काळात पोलीस दलाचा राज्य सरकार गैरवापर करत आहे. गिरीश महाजन यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा कट सरकारी वकिलांनी रचला. सध्या राज्यात काय चाललंय ते सर्व या पेन ड्राइव्ह मध्ये आहे. सध्या कशी कट कारस्थाने सरकार शिजवतंय त्याचेही व्हिडीओ या पेन ड्राइव्ह मध्ये आहे. सव्वाशे तासाचे फुटेज माझ्या कडे आहे. हा पेन ड्राइव्ह मी अध्यक्षांकडे सुपूर्द करत आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेन ड्राइव्ह सोपवला. 

सादर केलेल्या क्लिप्समध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण कुणासोबत संभाषण करत होते, कुणाच्या सांगण्यावरून सर्व ‘कट’ रचला जात होता, याचे पुरावे असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. केवळ आरोपच नाही तर खोटा गुन्हा आणि खोटे जाबाबही नोंदवण्यात आले. आणि हे सर्व घडवून आणलं ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण, एसीपी सुषमा चव्हाण, डीसीपी याशिवाय सरकार पक्षातील अनेक नेत्यांची नावे आहेत, असं देखील फडणवीस म्हणालेत. 

फडणवीस यांनी सादर केलेल्या त्या २९ पेनड्राइव्हमध्ये तब्बल १२५ तासाच्या व्हिडीओ, ऑडिओच्या क्लिप्स आहेत. या फुटेज मध्ये नेमकं काय काय आहे आणि खरंच काहीतरी मोठा कट रचला जातोय का ? सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमधील मिलीभगत नेमकी काय आहे अशा चर्चा चौकस सुरु झाल्यात.

हे तर साहजिकच आहे की, फडणवीसांच्या या सगळ्या आरोपांनंतर राज्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघालं.

या प्रकरणाची सीबीआ चौकशी व्हावी, आमचा राज्य सरकारच्या पोलिसांवर विश्वास नाही अशी मागणी विरोधक करतायेत.

पण या सगळ्या आरोपांमध्ये चर्चेत आलेले हे सरकारी वकील प्रवीण चव्हाण कोण आहेत ? आणि संपूर्ण प्रकरण काय आहे ?

फडणवीसांच्या आरोपांनंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना हे आरोप खोडून काढले आहेत. फुटेजमधला आवाज आपला नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं आणि पुढील चौकशी साठी मी तयार अशी तयारी देखील दर्शवली आहे.

प्रवीण पंडित चव्हाण हे विशेष सरकारी वकील आहेत. प्रवीण चव्हाण काय आत्ताच प्रकाशझोतात आले नाही तर याआधी देखील त्यांच्या नावावरून बरंच राजकारण रंगलं.  त्यासाठी चव्हाण यांनी लढविलेले महत्वाचे खटले बघणे महत्वाचे आहे.  सुरेश दादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर पतसंस्था, रवींद्र बराटे या सगळ्या गाजलेल्या खटल्यात ते सरकारी वकील होते. तसेच आत्ता त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचं निमित्त हे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रकरणातही ते विशेष सरकारी वकील आहेत.

घरकुल घोटाळा –

ॲड. प्रवीण चव्हाणांच्या नावे अनेक यशस्वी केसेस आहेत. त्यातलीच एक म्हणजे जळगावची प्रचंड गाजलेली केस म्हणजे घरकुल घोटाळा. 

फक्त जळगाव जिल्ह्यातच नाही तर राज्यभर हा घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात महत्वाची भूमिका बजावणारे म्हणून प्रवीण चव्हाणांचं नाव आहे. धुळे ट्रायल कोर्टात घरकुल प्रकरणात प्रवीण चव्हाण यांना सरकारी वकील म्हणून नेमलं होतं. या प्रकरणात तत्कालीन तब्बल ४८ माजी मंत्री, आमदार, आजी-माजी नगरसेवक आणि तत्कालीन नगराध्यक्षांना शिक्षा सुनावली होती. महाराष्ट्रातील हा एकमेव खटला आहे की ज्यात १८३ कोटींचा दंड संशियातांना ठोठावण्यात आला होता.  

घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगात पाठविण्यात आलं होतं. या प्रकरणात सामाजिक नेते अण्णा हजारे यांनी चव्हाण यांना सपोर्ट केला होता.  

या केस नंतर सुरेश जैन, गुलाबराव देवकर या नेत्यांचं पॉलिटिकल करियर संपल्यात जमा झालं होतं. 

त्यानंतर हे दोन्ही मंत्री वरच्या कोर्टात गेल्यावर चव्हाण यांच्या जागी अमोल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला अण्णा हजारेंनी विरोध केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीसांना त्यांनी पात्र लिहून चव्हाण यांची पुन्हा नियुक्ती व्हावी अशी मागणी केली होती.  या सर्व केसमुळे ॲड. प्रवीण चव्हाण एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध झाले.

बीएचआर घोटाळा –

जळगावचा घरकुल घोटाळा गाजल्यानंतर बीएचआर घोटाळ्याच्या खटल्यात विशेष सरकारी म्हणून ॲड प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. बीएचआर संस्थेच्या राज्यात टोटल ९ शाखा आहेत. २८ हजार सभासद, २५ हजार भागधारक, १ लाख ५० हजार नाममात्र भागधारक आहेत. या संस्थेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी संचालकांना अटक केली गेली, त्यानंतर त्या जागी जितेंद्र कंडारे नावाचा दुसरा माणूस नेमला गेला आणि त्याने देखील ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे परत करतांना गैरव्यवहार केल्याची तक्रार ठेवीदार संघटनेने केली. 

या प्रकरणी चव्हाण यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली गेली. या केसमध्ये  विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची २०२० मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. या खटल्यात चव्हाण यांनी अनेक संशियितांना अटक करण्यात आली आहे. तर काही आरोपींचा शोध घेण्यात आले येत आहे. या गैरव्यवहारात मोठे राजकीय नेते अडकले असल्याचं सांगण्यात येत होतं.

माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटे प्रकरण –

एकेकाळी राज्यातील मोठ-मोठ्या नेत्यांच्या जमिनींचे घोटाळे बाहेर काढणारा बराटे स्वतःच फसवणूक आणि खंडणीच्या आरोपात अडकला होता. 

त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते, त्यामुळे तो कित्येक महिने फरार होता.  बराटे बेकायदा सावकारी करायचा, फसणूक, खंडणी घेणे असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. माहिती अधिकाराच्या नावाखाली त्याने अनेक राजकारणी आणि बड्या उद्योजकांना अडकवले होते.  तपासादरम्यान जेंव्हा त्याच्या घराची झडती घेतली तेंव्हा तो साडे तीन हजार कोटींचा मालक असल्याचे समोर आलेलं.  बराटेंसह त्यांच्या १३ साथीदारांविरोधात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून ११ जणांना अटकही केली होती. या प्रकरणात ॲड प्रवीण चव्हाण यांनी सरकारी वकील म्हणून काम केले होते. 

याशिवाय आणखी एक गाजलेला घोटाळा म्हणजे, डीएसके घोटाळा – 

आत्तापर्यंतच्या गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये एक म्हणजे डीएसके डेव्हलपरचा आर्थिक गैरव्यवहाराचा खटला. 

गुंतवणूकदारांची सुमारे दोन हजार कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी डी. एस. कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांना पुणे शहर पोलिसांनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक केली होती. हेमंती कुलकर्णी यांना  जामीन मिळाला आहे. तर डीएसके येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

पण या डीएसके प्रकरणात पुण्यातल्या वकिलांना डावलून प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावरून पुण्यातील सरकारी वकिलांमध्ये नाराजी होती. तसेच डिएसके यांना कर्ज दिल्या प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना अटक झाली होती. त्यावेळी सुद्धा प्रवीण चव्हाण हे चर्चेत आले. पण पुढे कोर्टात बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात हि केस टिकली नाही.

हे सोडले तर त्यांनी लढवलेले खटले म्हणजे, समृद्धी जीवनचा ३ हजार कोटी रूपयांचा खटला, नागपूर येथील गुंड संतोष आंबेकर याच्या मोक्कासंदर्भातील खटला अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी लढला आहे.

आता गिरीश महाजनांच्या केसमुळे वकील प्रवीण चव्हाण अडचणीत आले असले तरी ज्या प्रकारे वकील प्रवीण चव्हाण दावा करत आहेत त्या प्रमाणे ते खरंच यात दोषी आहेत कि नाही हे चौकशी झाल्यानंतर समोर येईलच. जसं की सुरुवातीला आपण बोललो ते स्वतः चौकशी ला तयार आहेत. पण जरी चौकशी झाली तरी त्यातून आणखी काय खुलासे व्हायचे बाकी आहेत ते येत्या काळात कळेलच.  

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.