बागेश्वर महाराजांना चॅलेंज देणारी सुहानी शाह कोण आहे?
बागेश्वर महाराज या बाबांचं नाव सध्या देशभरातल्या सगळ्या माध्यमांमध्ये दिसतंय. हे बाबा भक्तांच्या मनातलं सगळं ओळखतात म्हणे! म्हणजे, यांच्या दरबारात आलेल्या भक्तांना त्यांची समस्या सांगायची गरजसुद्धा पडत नाही, ते स्वत:च त्या भक्ताच्या परिवारापासून ते त्याला काय समस्या आहे इथपर्यंत सगळी माहिती सांगतात.
हे बाबा ढोंग करतात… त्यांनी त्यांचे चमत्कार सिद्ध करून दाखवावे असं आव्हान अंनिसने दिलं होतं. त्यानंतर मग नागपुरात दरबार भरवण्यासाठी आलेल्या या बाबांनी ठरलेल्या दिवसाच्या आधीच नागपूर सोडलं.
इथून चर्चा सुरू झाल्या… मग या बागेश्वर बाबांनी अंनिसला उलट चॅलेन्ज दिलं. त्यानंतर माध्यमांनी हा विषय उचलून धरला. आता या सगळ्या प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे सुहानी शाह.
आता ही सुहानी शाह कोण आहे? तर, ती मेंटलिस्ट आहे…
सुहानीला न्यूज चॅनलवर बोलवण्यात आलं, तिने लोकांच्या मनातलं ओळखून दाखवलं आणि मग बागेश्वर बाबा सुद्धा मेंटलिस्ट आहेत, म्हणून त्यांना हे करता येतं का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला त्यावर ती म्हणाली,
“बागेश्वर बााब मेंटलिस्ट असू शकतात किंवा नसूही शकतात. त्यांनी खरंच मनातलं ओळखलं की भक्तांमध्ये त्यांनीच पेरलेले लोक बसवून आधीच ठरलेली सगळी माहिती दिली हे सांगणं कठीण आहे.”
आता मेंटलिस्ट म्हणजे काय?
तर समोरच्याच्या मनातलं ओळखतात त्या लोकांना मेंटलिस्ट म्हणतात. युट्यूबवर तुम्ही ते व्हिडीओ बघितले असतीलच ज्या व्हिडीओमध्ये एक माणूस स्टेजवर उभा असतो… तो प्रेक्षकांमधल्या एकाला स्टेजवर बोलवतो त्याला तुझ्या पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव काय? तु बालवाडीला जायचा त्या शाळेचं नाव काय? असे काहीतरी प्रश्न विचारतो पण उत्तर सांगू नको असंही म्हणतो..
मग तो एका कागदावर ते उत्तर लिहीतो. ते उत्तर प्रेक्षकांना दाखवतो आणि मग त्याला उत्तर सांगायला सांगतो. त्याने लिहीलेलं उत्तर आणि प्रेक्षकांमधल्या त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर हे सारखंच असतं. हे लोकांच्या मनातलं ओळखणाऱ्यांना मेंटलिस्ट म्हणता येतं.
ही सुहानी कोण आहे आणि तिला मनातलं कसं ओळखता येतं? हा प्रश्न साहजिकच मनात आला असेल.
सुहानी राजस्थान मधल्या उदयपूरची आहे. लहानपणापासूनच तिला अभ्यासात फार रस नव्हता आणि हे तिच्या घरच्यांना लवकरच लक्षात आलं. त्यामुळे, दुसरीत असतानाच तिचं शिक्षण थांबवण्यात आलं. त्यानंतर मग तिचं शिक्षण घरातूनच झालं.
तिला खरंतर जादुगर व्हायचं होतं. त्या दृष्टीने तिचं शिक्षण सुरू झालं. वयाच्या सातव्या वर्षी तिने पहिला स्टेज शो केलेला. त्यानंतर मग ती जादू करायला लागली आणि लोकांना असं वाटायला लागलं की, तिला सिद्धी प्राप्त झालीये.
हे जादूगार बनण्याचं ट्रेनिंग घेत असतानाच तिने मेंटलिझमचाही अभ्यास सुरू केला. सुहानीचं असं म्हणणं आहे की, मेंटलिझम हा जादूगारीचाच एक भाग आहे. हळू हळू तिला मेंटलिझम जमू लागलं. तिने लोकांच्या मनातलं ओळखतानाचे व्हिडीओज युट्यूबवर टाकायला सुरूवात केली. ती प्रसिद्ध सुद्धा झाली.
सुहानी हिप्नो-थेरपिस्ट सुद्धा आहे. तिने सुहानी माइंडकेअर नावाची संस्था सुद्धा सुरू केली होती. तिथे ती लोकांना मानसिक थेरपीज देते. याशिवाय, तिने या विषयावर आतापर्यंत ५ पुस्तकंही लिहीली आहेत.
बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सच्या मनातलं तिने ओळखलेलं आहे आणि तसे व्हिडीओजसुद्धा युट्यूबवर आहेत.
याशिवाय ती काय करते म्हणाल तर, ती युट्यूबवर तिचा स्वत:चा एक शो चालवते ज्याचं नाव आहे, ‘दॅट्स माय जॉब!’
हा एक प्रकारचा टॉक शो आहे. अगदी निवांत आणि कॅज्युअल गप्पा असतात शिवाय जे गेस्ट्स असतील त्यांना काही गोष्टी ओळखायच्या असतात. त्यासाठी सुहानी त्यांना हिंट्स देते. आतापर्यंत या शो मध्ये रॅपर क्रिष्णा, झाकिर खान, मुनावर फारुकी, तन्मय भट, समय रैना असे फेमस युट्यूबर्स येऊन गेलेत.
युट्यूब पर्यंत मर्यादित असलेली ही सुहानी शाह आता टीव्हीवर दिसतेय ते तिला लोकांच्या मनातलं ओळखता येतं म्हणून. आता तिने टीव्हीवर बोलताना बागेश्वर महाराज जे करतायत ती एक ट्रीक आहे, एक अभ्यास आहे असं म्हटलंय. त्यामुळे, तिने बागेश्वर महाराजांना थेट चॅलेंज दिलंय असं म्हटलं जातंय.
हे ही वाच भिडू:
- पोलिसात तक्रार, अंनिसचं आव्हान आणि दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या बागेश्वर महाराजांनी पळ काढला…
- नेमक्या महत्वाच्या निवडणुका लागल्याच की बाबा राम रहीम जेलच्या बाहेर येतो
- जीएन साईबाबा : १ व्यक्ती, २ आरोप, ८ वर्षांची कैद आणि निर्दोष मुक्तता, असं आहे संपूर्ण प्रकरण