त्या मॅचनं लोकांना मोठ्या पेचात पाडलं, शेन बॉंड आणि ब्रेट ली यातला ‘डेंजर मॅन’ कोण?

क्रिकेटमध्ये सगळ्यात भारी काय असतं? क्रीझवर थांबलेला बॅट्समन लांब सिक्स मारतो, नाय. एखादा स्पिनर पायाच्या मागून बॅट्समनला बोल्ड करतो, नाय. एखादा लय भारी कॅच, हे पण नाय. क्रिकेटमध्ये सगळ्यात भारी गोष्ट असते, ती म्हणजे फास्ट बॉलिंग.

धिप्पाड उंचीचा बॉलर पळत पळत येतो, त्याचा हात अगदी लयीत फिरतो आणि गोळीच्या वेगानं सुटलेला बॉल टप्पा पडल्यावर आणखी झपकन जातो, समोरचा बॅट्समन लय बेक्कार गडबडतो, कधी त्याचं नाक फुटतं, कधी डोकं, कधी बोल्ड होतो, तर कधी एज लागून कॅच. लई गोष्टी होतात पण फास्ट बॉलिंग बघायला लय भारी वाटतं. आता आधीची पिढी आपल्याला होल्डिंग, मार्शल, गार्नर, रॉबर्ट्स, लिली असली नावं सांगायची, सध्याची नवी पिढी बुमराह, शमी, बोल्ट अशी नावं सांगते. पण मधल्या पिढीत फास्ट बॉलिंगमधले दोन एक्के होऊन गेलेत, ज्यांची नावं घेतली तरी भीती वाटायची खरी, मात्र हे दोघं आवडायचेही तितकंच.

या दोघांची नावं म्हणजे न्यूझीलंडचा शेन बॉंड आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली. दिसायला आणि भारतीय चाहत्यांना रडवायला दोघंही सारखेच होते. त्यात स्पीडही वाढीव असल्यानं ली भारी की बॉंड ही तुलना शंभर टक्के व्हायची.

एक मॅच मात्र अशी झाली, जिथं बॉंड आणि ली एकाच वेळी झुंजणार होते आणि दोघांमध्ये भारी कोण यावर शिक्कामोर्तब होणार होतं.

२००३ चा वर्ल्डकप, सुपर लीगमधली मॅच, न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया. आता २००३ ची ऑस्ट्रेलियन टीम ही काय चीज होती, हे पॉन्टिंगच्या बॅटमधल्या स्प्रिंगवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेला वेगळं सांगायला नको. पण त्या काळात न्यूझीलंडची टीमही खुंखार होती, सख्खे शेजारी असलेले हे दोन देश क्रिकेटच्या मैदानात भिडायचे तेव्हा पक्के वैरी असायचे. 

त्या वर्ल्डकप मॅचमध्ये गिलख्रिस्ट, हेडन, पॉन्टिंग, बेव्हन, मॅकलम, केर्न्स, फ्लेमिंग असे डेंजर बॅट्समन होते, पण खरी लढाई होती… बॉंड विरुद्ध ली.

पहिली बॅटिंग ऑस्ट्रेलियाची होती, बॉंडच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सात रन्स आले. पण तिसऱ्या ओव्हरमध्ये गेम फिरला, त्याच्या लेट स्विंग झालेल्या बॉलवर हेडन गेला. एका ओव्हरच्या अंतरानं बॉंडनं गिलख्रिस्टचा बाजार उठवला. बॉल इतक्या जोरात आत आला, की डायरेक्ट पॅडवर आदळला. पॉन्टिंगनं निवांतपणाची रिक्षा धरली होती, पण तो गडी सुटला की जगात कुणाला ऐकत नाय त्यामुळं भीती होतीच. पण शेन बॉंडनं आपल्या स्पेलच्या पाचव्या ओव्हरमध्ये पॉंटिंगला गंडवलं आणि ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. ऑस्ट्रेलियाचे टॉप थ्री एकट्या बॉंडनं खाल्ले होते. त्याची स्पेल संपल्यावर ऑस्ट्रेलियानं जरा सुटकेचा निश्वास सोडला.

२५ वी ओव्हर बॉंडनं पुन्हा एकदा गाजवली, त्यानं सेट झालेल्या डॅमियन मार्टिनची पहिल्या आणि पुढच्याच बॉलवर ब्रॅड हॉजची विकेट घेतली. एका ओव्हरच्या अंतरानं इयान हार्व्हे पण बॉंडच्याच बॉलिंगवर खांदे पाडून गेला. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर झाला होता ७ आऊट ८४ आणि यातल्या ६ विकेट्स शेन बॉंडच्या नावावर जमा झाल्या होत्या. भाऊनं कहर केला होता. 

पुढं मायकेल बेव्हन आणि अँडी बिचेलनं फटकेबाजी करुन मॅच फिरवली. पण शेन बॉंडच्या वेगानं, टप्प्यानं आणि अचूकतेनं आपल्याला ‘ब्लू लाईटनिंग’ का म्हणतात हे दाखवून दिलं होतं. त्याच्या बॉलिंगच्या विजेनं ऑस्ट्रेलियाची टॉप आणि मिडल ऑर्डर खिशात घातली होती. 

एक शो संपला आणि दुसरा शो सुरू झाला…

बिंगा उर्फ ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाची तोफ. ब्रेट लीला मॅकग्रा आणि बिचेलचा आधार असल्यानं कांगारूंचा  मारा जरा जास्तच तिखट होता. बिचेल, मॅकग्रा आणि हार्व्हेनं विकेट्स मिळवल्या खऱ्या, पण ब्रेट लीची पाटी कोरी राहिली. तिकडं बॉंड सहा विकेट्स घेऊन बसलेला आणि इकडं सहा ओव्हर टाकूनही ब्रेट ली बॅकफूटवरच होता.

पण ब्रेट लीचं कमबॅक न्यूझीलंडची झोप उडवणारं ठरलं. २५ वी ओव्हर. पाचव्या बॉलवर फ्लेमिंग आऊट, ब्रेट लीला पहिली विकेट. पिक्चर आत्ता कुठं सुरू झालेला. २७ व्या ओव्हरमध्ये स्फोटक वाटणारा मॅकलम एलबीडब्ल्यू झाला आणि पुढच्याच बॉलवर जेकब ओरम बोल्ड. शिल्पकार होता ब्रेट ली. ओव्हर क्रमांक २९, दुसराच बॉल, ब्रेट लीचा यॉर्कर समजेपर्यंत आंद्रे ऍडम्सचा स्टम्प उखडलेला होता, टीव्हीवर अगदी बाजूला दिसलं बॉलचा स्पीड दीडशेपेक्षा जास्त होता. मग क्रीझवर आला शेन बॉंड.

आता खरी टशन होती…

बॉंडनं चारही बॉल खेळून काढले. मध्ये एक ओव्हर गेली आणि हे दोघं परत समोरासमोर आले. बॉंड हुक मारायला गेला… हुकला… आणि बॉल हवेत उडाला… ब्रेट लीनं डाईव्ह मारुन कॅच घेण्यात कोणतीही चूक केली नाही. ब्रेट लीच्या पाच विकेट्स पूर्ण झाल्या, न्यूझीलंडचा डाव ११२ रन्सवर खलास झाला आणि ऑस्ट्रेलिया जिंकली.

बॉंडनं टॉप ऑर्डर खोलली होती तर ब्रेट लीनं मिडल ऑर्डर. पिच फास्ट बॉलिंगला फार मदत करणारं नव्हतं, तरीही १९ पैकी ११ विकेट्स या दोघांच्या नावापुढं होत्या. टॉप ४ आऊट करणारा बॉंड भारी की १५ बॉलमध्ये ५ विकेट्स घेणारा ली भारी? उत्तर चाहत्यांना ठरवायचं होतं. पण चाहत्यांना प्रॉपर क्रिकेट मॅच आणि सुंदर फास्ट बॉलिंग बघण्याचं सुख मिळालं होतं, हे मात्र शंभर टक्के खरं. 

कोण भारी हे ठरवायला आकडेवारीचा गुंताही आहे आणि विश्लेषणाच्या पोथ्याही.. पण कसंय ना भिडू दोघांचीही बॉलिंग ॲक्शन कॉपी करणाऱ्या आपल्या पिढीसाठी ज्याची ॲक्शन सोपी तो जास्त फेव्हरेट होता हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.