कोणाला तुर्रम खान म्हणून हिणवत असाल तर थांबा, तो १८५७ च्या लढ्यातला मोठा हिरो होता…

अरे भले भले तुर्रम खान आले न गेले….स्वतःला काय लय मोठा तुर्रम खान समजतो काय ….तू काय लगेच तुर्रम खान बनू नको…असे अनेक डायलॉग आपण लोकांच्या तोंडून ऐकत आलेलो आहे. या डायलॉगचा अर्थसुद्धा अपल्यापा चांगलाच ठाऊक आहे.

जेव्हा एखादा फुल्ल हिरो बनायच्या मूडमध्ये आलेला असतो तेव्हा आपण त्याला तुर्रम खान असं बोलून जातो. पण कधी थंड डोक्याने विचार केलाय का की ह्यो तुर्रम खान नक्की हाय कोण ? की ज्याचं नाव एवढं गाजलेलं आहे.

तुर्रम खान हा काय साधासुधा व्यक्ती नव्हता तर 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पहिला वहिला हिरो होता.

तुर्रम खानचं ओरिजिनल नाव होतं तुर्रेबाज खान. मंगल पांडेंनी बैरकपूर मध्ये ज्या स्वातंत्र्याची तयारी केली होती हैदराबाद मध्ये त्याचं नेतृत्व तुर्रम खानने केलं होतं. तुर्रम खान हैदराबादच्या बेगम बाजारामध्ये जन्मला होता. त्यांच्या सुरवातीच्या आयुष्याबद्दल जास्त माहीतीच उपलब्ध नाहीए.

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात तुर्रम खानचं नाव कायम चर्चेत राहिलं. तुर्रम खान कायमस्वरूपी लोकांच्या मनात कासव ठसले गेले तर जेव्हा त्याने जमादार चिदा खानला सोडवण्यासाठी ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला करण्याची योजना आखली होती. जमादार चिदा खानला विद्रोही सैनिकांच्या विरुद्ध दिल्लीला कूच करण्यास सांगितलं होतं पण त्यांनी यास नकार दिला होता.

सगळ्यांनाच अपेक्षा होती की निजाम या लढाईत ब्रिटिशांना साथ देतील पण त्याने धोका दिला. जेव्हा जमादार चिदा खान आपल्या 15 सैनिकांसह निजामाजवळ समर्थनार्थ गेला तेव्हा निजामाने त्यांना पकडून ब्रिटिश रेसिडेन्सीमध्ये कैद करून टाकलं. यावर तुर्रम खानने आपल्या 5 हजार फौजेनिशी ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला केला. तुर्रम खानने आपला सोबती मौलवी अल्लाउद्दीनच्या सोबत 5 हजार सैनिकांची तटबंदी उभारली. यात बरेच अरब, विद्यार्थी आणि विद्रोही लोकं सामील होते.

योजना अशी होती की सगळ्यांनी एकदम ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला करायचा. तुर्रम खानला पूर्ण विश्वास होता की अचानक केलेल्या हल्ल्याने ब्रिटिश गडबडून जातील. यामध्ये मदत करताना बब्बर खान आणि जयगोपाल दास यांनी रेसिडेन्सीच्या समोरचे दोन घरं मोकळेदेखील केले होते.पण तुर्रम खानच्या या योजनेचा वास ब्रिटिशांना लागला होता. खरंतर निजामाचा वकील सालारगंजने गद्दारी करत इंग्रजांना सावध केलेलं होतं.

इंग्रज बंदूक, हत्यारं घेऊन तुर्रम खानच्या सैनिकांची वाट पाहत बसले होते. 17 जुलै 1857 रोजी रात्री तलवारी आणि काठ्यांच्या साथीने तुर्रम खानने आपल्या सैन्यासह हल्ला चढवला. रात्री भरपूर फायरिंग झाली आणि पहाटे 5 वाजता ब्रिटिशांनी तुर्रम खानच्या सैनिकांना पळवून लावलं. ब्रिटिश रेसिडेन्सी हल्ल्यात अनेक सैनिक शहीद झाले. पण इंग्रज तुर्रम खानला पकडू शकलं नाही.

पण निजामाच्या सैनिकांनी गद्दारी केली आणि अशुर खानाच्या जवळच्या जंगलात तुर्रम खान पकडला गेला. हैद्राबाद कोर्टात तुर्रम खानवर खटला भरला. तुर्रम खानला त्याच्या इतर साथीदारांची विचारणा झाली मात्र त्याने नकार दिला. तुर्रम खानला काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि आयुष्यभर सडण्यासाठी त्याला अंदमान निकोबारला पाठवण्याची तयारी झाली. पण इंग्रजांच्या हातून तो निसटून पळून गेला.

इंग्रजांनी तुर्रम खानवर 5 हजारांचं बक्षीस ठेवलेलं होतं. पण तुर्रम खान हाती लागला नाही.

काही काळाने एक तालुकदार मिर्झा कुर्बान अली बेग याने तुपरणच्या जंगलात तुर्रम खानला मारून टाकलं. इतिहासकारांच्या मते ब्रिटिश रेसिडेन्सीला तुर्रम खानचं नागडं शरीर टांगण्यात आलं होतं. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ हैदराबादच्या एका कॉलेज रोडला तुर्रम खानचं नाव देण्यात आलं.

तुर्रम खान असा माणूस होता ज्याने इंग्रजांसमोर गुढगे टेकले नाही पण गद्दार लोकांनी त्याचा घात केला. इथून पुढे जर कोणी तुम्हाला तुर्रम खान म्हणलं तर चिडायच नाही तर उलट अभिमान बाळगायचा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.