OBC आरक्षणाचं श्रेय कोणाला द्यायचं? १९९४ पासूनचा घटनाक्रम बघा आणि मग ठरवा

राज्यात ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका प्रलंबित होत्या. या निवडणुका ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर व्हाव्यात, अशी भूमिका तत्कालीन राज्य सरकारने घेतली होती.  यावर आता सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र त्याचवेळी ओबीसी आरक्षचं श्रेय नक्की कोणाचं यावरून राजकारण सुरु झालं.

एकनाथ शिंदे म्हणतात आमचा पायगुण चांगला आहे तर ४ महिन्यात ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा शब्द पाळल्याचा दावा देवेंद्र फडणवीस करतायत. तर महविकास आघाडीच्या नेत्यांच्या म्हणायनुसार बांठिया आयोग सस्थापन करून डेटा पूर्ण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या काळातच झालं होतं त्यामुळं ओबेसी आरक्षण आमच्यामुळेच बहाल झालेलं आहे.

राज्यात ओबीसी मतांचं महत्व बघता प्रत्येक पक्षाला आंम्ही कसे ओबीसींचे कैवारी आहोत हे सांगणं भाग आहे.त्यामुळं ओबीसी आरक्षणाचा महाराष्ट्रातील नक्की प्रवास कसा  याचाच आढावा घेऊ.

देशात 1992 साली देशात मंडल आयोग लागू झाला आणि ओबेसी आरक्षणाला सुरवात झाली.

त्याचवेळी राज्यात आरक्षण लागू  करण्याची जबाबदारी राज्यसरकारांवर सोपवण्यात आली. त्यानुसार  1994 साली राज्यात  ‘महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961’ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 12 (2) (सी) समाविष्ट करून इतर मागासवर्गीयांना 27 टक्के राजकीय आरक्षणाची तरतूद करण्यात आली.

म्हणजेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के उमेदवार हे ओबेसी असणं बंधनकारक करण्यात आलं. 

१९९४ यामध्ये हे आरक्षण देताना राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि शरद पवार मुख्यमंत्री होते.

पुन्हा आरक्षणाच्या मुद्यावर येऊ .ओबीसी आरक्षण लागू झाल्यामुळे जिथं SC/ST प्रवर्गाची लोकसंख्या जास्त आहे तिथं एक पेच निर्माण झाला. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण असल्याने तिथं SC/ST प्रवर्गाचं आरक्षण आणि मग नव्याने आलेलं ओबीसी आरक्षण यामुळं एकूण आरक्षणाची टक्केवारो ५०% च्या वर जाऊ लागली.

इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा अशी अट घालून ठेवली आहे.

यावर आक्षेप घेत विकास कृष्णराव गवळी यांनी  कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आरक्षण कोट्याची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २७ टक्के आरक्षण रद्द करून पोटनिवडणुकांचे आदेश दिले होते.

यावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं तिथंही  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात राज्य सरकारला ५० टक्के आरक्षणाच्या कोट्याची इम्पेरिकल डेटा सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक पुनर्विचार याचिका दाखल केली, तीही फेटाळण्यात आली.

तसेच इथं एक गोष्ट  लक्षात  घेण्यासारखी आहे. SC/ST प्रवर्गाचं आरक्षण हे ‘घटनात्मक’ आहे, तर ओबीसींचं राजकीय आरक्षण हे राज्याच्या विधिमंडळानं दिलेलं ‘वैधानिक’ आरक्षण आहे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. वैधानिक म्हणजे राज्याच्या विधिमंडळाने कायद्याद्वारे दिलेलं आरक्षण. त्यामुळं कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्टे दिला.

त्याचबरोबर ओबीसी आरक्षण राज्यात लागू होण्यासाठी ट्रिपल टेस्ट पास करणे गरजेचे झाले.

या ट्रिपल टेस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तीन सूचनांचा समावेश होता.

१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागासलेपणाच्या प्रकाराबाबत आणि परिणामांबद्द्ल सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणे.

२) आयोगाच्या शिफारशींनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षणाचे प्रमाण निर्दिष्ट करणे

३)कुठल्याही परी स्थितीत एससी/एसटी आणि ओबीसींचं एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होता कामा नये.

या तीन अटींची पूर्तता करणं क्रमप्राप्त होतं.त्यामुळं राज्यातील ओबेसी यांचं राजकीय आरक्षण जाणार अशी भीती निर्माण झाली. हे आरक्षण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील  महाविकासाआघाडी सरकारवर मोठा दबाव निर्माण होत होता. सरकारवर कोर्टात नीट मांडत नाहीये यामुळे आरक्षण धोक्यात आहे असा सरकारवर आरोप होत होता.

दरम्यान  २०२१ च्या मे-जून महिन्यात या घडामोडी घडत असताना विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आलं. महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला.

याच गदारोळात ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.

विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मात्र यावर आक्षेप घेतला. इंपिरिकल डेटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि ठराव म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका भाजपकडून होऊ लागली.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 17 सप्टेंबरला आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढून राज्यपालांकडे पाठवून देण्यात आला. पण त्यात काही त्रुटी आढळून आल्याने राज्यपालांनी अध्यादेश पुन्हा पाठवण्याची सूचना केली. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी यासंदर्भातला अध्यादेश पुन्हा राज्यपालांना पाठवण्यात आला. अध्यादेशानुसार 50 टक्क्यांच्या अधीन राहून इतर मागासवर्गीयांना 27 टक्क्यांपर्यंत राजकीय आरक्षण देण्यात येईल असा कायदा झाला.

याचवेळी केंद्राने 23 सप्टेंबर 2021 रोजी सुप्रीम कोर्टात यासंदर्भात एक अॅफिडेव्हिट दाखल केलं.यामध्ये इंपिरिकल डेटा देणं शक्य नाही आणि यंदा जातीनिहाय जनगणना करणंही शक्य नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं.

मात्र ७ डिसेंबर २०२१ ला सुप्रीम कोर्टाने राज्यसरकारच्या या अध्यादेशाला स्थगिती दिली.

सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट पास झाली तरच ओबीसी आरक्षण लागू होईल असं खडसावून सांगितलं. जोपर्यंत योग्य डेटा आयोगाकडून अथवा समितीकडून मिळत नाही, तोवर हे आरक्षण लागू करत येणार नाही असा कोर्टाचा निकाल होता. त्यात ९ महिने उलटूनही इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी कोणतीच हालचाल केली नसल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठत होती. तर राज्य सरकार केंद्रातील भाजप सरकारने डेटा दिला तर प्रश्न लगेच सुटेल असं म्हणत होतं.

अखेर ११ मार्च २०२२ रोजी ठाकरे सरकारने ट्रिपल टेस्ट पास करून ओबेसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी बांठिया आयोगाची स्थापन केली.

जयंतकुमार बांठिया हे या आयोगाचे अध्यक्ष होते. तर या समितीमध्ये महेश झगडे, नरेश गीते यांच्याबरोबरच इतर ७ सदस्यांचा समावेश होता. 

इंपिरिकल डेटा गोळा करण्याचे काम या आयोगाकडे सोपवण्यात आले होते .सुरवातीला या आयोगाला पुरेसा निधी देण्यात येत नाहीये. इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ, साधनसामग्री पुरवण्यात आले नाही. असा आरोप विरोधकांकडून होत होता.

त्यामुळे प्रत्यक्षात इंपिरिकल डेटा गोळा करण्याचे संथगतीने सुरू राहीलं.

आयोगाला एकदा ३ महिने आणि एकदा १ महिना अशी चार महिने मुदतवाढ देण्यात आली. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे ओबेसी नेते यावेळी आयोगाचा अहवाल लवकरात लवकर तयार व्हावा यासाठी आग्रही होते.

आयोगाचं काम जवळपास झालंच होतं की त्याचवेळी राज्यात सत्ताबदल झाला.

 महाविकासघडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आलं. ३० जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्यानंतर १० जुलै २०२२ ला बांठिया आयोगाने आपला अहवाल राज्यसरकारला सादर केला.

बांठीया आयोगाने आपल्या शिफारशी मध्ये ओबीसी हे नागरीकांचा मागासवर्ग या सदरात मोडत असून ते राजकीय मागास असल्याचे शिफारशीत सांगीतले आहे. तसेच राज्यात इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या ३७%  असल्याचे या अहवालात सांगण्यात आलंय.

राज्यामध्ये ओबीसींची एकूण जनसंख्या ही जरी ३७% दाखविण्यात आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही वेगवेगळी दर्शविण्यात आली आहे.

ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एस. सी/एस. टी ची लोकसंख्या ५०% असेल त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण असणार नाही. या नियमानुसार गडचिरोली (एक तालुका वगळता )  नंदुरबार आणि पालघर जिल्हा परीषद मध्ये ओबीसींना शुन्य टक्के आरक्षण असणार आहे.

नाशिक जिल्ह्यातही आदिवासी तालुक्यांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. तर बाकीच्या ठिकाणी २७% आरक्षण राहील पण त्याचवेळी ५०% आरक्षणाचं लिमिट पण पाळलं जाईल.म्हणजे सगळीकडे आरक्षणाची आकडेवारी वेगवेगळी असेल.

हा अहवाल सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. आणि या अहवालानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक घेण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

आता हा सगळं घटनाक्रम तुमच्यापुढं आहे आणि ठरवा ओबेसी आरक्षणाचं श्रेय नेमकं कोणाचं.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.