सुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश ?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला वृद्धापकाळाने निधन झाले. अटलजींच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अस्थिकलशांची यात्रा काढळी आहे. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना हे अस्थिकलश सोपवण्यात आले असून देशभरातील १०० नद्यांमध्ये त्या विसर्जीत करण्यात येणार आहेत.
अटलजींच्या अस्थीं देशभरातील नद्यांमध्ये विसर्जीत करण्याबाबत मतभेद असण्याच कारण देखील नाही मात्र यादरम्यान कुठे अटलजींच्या अस्थी घेवून ट्रॉफी सारखे उंचावण्याचे प्रकार तर कुठे अस्थींसोबत सेल्फी काढण्याचे प्रकार समोर येत आहेत. छत्तीसगडचे मंत्री तर शोकसभेदरम्यान हास्यकल्लोळात बुडल्यांचे संपुर्ण देशाने पाहीले.
अटलजींच्या मृत्यूंच राजकारण केलं जात आहे असा आरोप तर खुद्द त्यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी केला. सध्याची स्थिती पाहता हा आरोप फेटाळणं देखील अशक्य वाटतं पण मोठ्या व्यक्ती गेल्यानंतर आपण त्यांचे किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याची हि काही पहिली वेळ नव्हती.
आजपर्यन्त अशी अनेक उदाहरणं आपणाला दिसली आहे. एखाद्या मोठ्या नेत्यांच्या पश्चात आपणच किती जवळचे आहोत हे सांगण्याच्या प्रयत्नात आजवर अनेकांनी राजकारण केलं.

असाच एक किस्सा इंदिरा गांधींच्या अस्थिकलशाचा.

या घटनेचं वर्णन जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या ” राजधानीतून” या पुस्तकात केलं आहे.

इंदिराजींच्या हत्येनंतर सारा देश शोकसागरात बुडालेला होता. राजीव गांधी यांनी त्यांना अग्नी दिली. अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी तीनमूर्ती भवन येथे ठेवण्यात आल्या. त्यांचे अंतीम दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री अथवा राज्यपालांना इंदिराजींच्या अस्थीचा एक कलश देण्यात येत होता. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील उपस्थित नव्हते. ते अंत्यसंस्कारानंतर लगेच मुंबईला परतले होते. मुंबई सारख्या संवेदनशील शहरात दंगली होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ते कलश घ्यायला थांबले नाहीत पण त्यांनी ही जबाबदारी सोपवली आपल्या मंत्रिमंडळातील तरूण सहकारी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे. खास विमानाने सुशीलकुमार शिंदे तो अस्थिकलश मुंबईला घेऊन येणार होते.
हे ही वाचा –
तीनमूर्ती भवनमध्ये अस्थी कलशाचे वाटप सुरु होते. सर्व राज्याचे मुख्यमंत्री ओळीने जाऊन अस्थीकलशांचे दर्शन घेत होते व आपापल्या राज्यासाठीचा कलश घेऊन जात होते. अचानक त्या ओळीत “वसंत साठे” घुसले आणि त्यांनी महाराष्ट्रसाठीचा कलश उचलला. वसंत साठे हे त्याकाळी केंद्रात माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री होते. खमक्या राजकारणी आणि वृत्तीने बिनधास्त अशी त्यांची दिल्ली वर्तुळात ओळख होती. इंदिराजींच्या खास शिलेदारापैकी एक असल्यामुळे त्यांना कोणी कलश घेण्यापासून अडवले नाही. साठे तीनमूर्ती भवन पासून सरळ विमानतळाकडे निघाले. सुशीलकुमार शिंदेंची पंचाईत झाली. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी तर त्यांच्यावर सोपविली होती. ते ही वसंत साठेंच्या पाठोपाठ निघाले. त्यांनी साठेनां विमानतळावर गाठलं. मात्र वसंत साठे हे अधिकाराने व वयाने सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा जेष्ठ होते. त्यांच्याशी वाद कसा घालणार. शिवाय सुशीलकुमारांना त्यांचा हट्टी स्वभाव माहित होता म्हणून शिंदे म्हणले “अहो मी तो कलश घेऊन येतोय अस सर्वाना सांगितलय. निदान मुंबईत उरल्यावर मला कलशाला हात तरी लावू द्या म्हणजे माझा पण यात सहभाग आहे हे लोकांना पटेल.” वसंत साठेनी उदार मनाने परवानगी दिली.

अशोक जैन यांनी ही सर्व कथा वृत्तपत्रात छापली. वसंत साठेंवर चहुबाजूंनी टिका झाली.

अशोक जैन आणि वसंत साठेंचे संबध चांगले असल्याने त्यांनी अशोक जैन यांना थेट जाब विचारला. वसंत साठेंच म्हणणं होते की, त्यांनी कलश उचलण्यापूर्वी पी.व्ही नरसिंह राव यांची परवानगी घेतली होती. अशोक जैन आपल्या पुस्तकात म्हणतात की “जेव्हा इंदिराजींची चिता धडधडत होती तेव्हा पीव्ही.नरसिंह राव शोकमग्न अवस्थेत एका झाडाखाली उभे होते. ज्वालांचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. अशा वेळी साठेनी राव यानं ‘ महाराष्ट्राच्या वाटचा कलश घेऊन जाऊ का ‘असे विचारले व त्यांनी मानेनेच होकार दिला. खरंतर अशी परवानगी देण्याचा राव यांचा हक्कच नव्हता. खुद्द राजीव गांधी तिथे हजर असताना वसंत साठेंनी नरसिंहरावांकडून परवानगी घेणंच चुकिचं होतं.”
खरंखोटं काहीही असो मात्र महान नेत्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीकलशाचं राजकारण करण्याची परंपरा जुनी आहे हेच खर ! फक्त राजकारणीच नव्हे तर आपल्या आजूबाजूला देखील असे प्रसंग असतातच.
हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.