भाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या माणसाचा होता…

२०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील सगळ्याच विधानसभा मतदार संघातील निकाल हा जवळपास निश्चित झालाय. खरंतर, या निवडणुकीत सत्ताधारी भाजपशिवाय काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दोन पक्षही मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आणतील आणि त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आप अशी तिहेरी लढत पाहायला मिळेल, अशी चर्चा होती.

पण तसं न होता भाजपनं एकहाती विजय मिळवलाय. हा विजय भाजपसाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तर महत्त्वाचा होताच, पण गुजरात निवडणुकीत दीडशेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानं भाजपनं काँग्रेसचा आजवर न तुटलेला रेकॉर्डही मोडलाय.

काँग्रेसचा हा रेकॉर्ड नेमका काय होता?
१९८५ सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एकूण १८२ मतदारसंघांपैकी काँग्रेसचे १४९ उमेदवार निवडून आले होते. म्हणजे एकूण आडेवारी पैकी ८१.४२ टक्के विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं बाजी मारली होती. हा रेकॉर्ड २०२२ च्या निवडणुकांचा निकाल येईपर्यंत कोणत्याही पक्षाला मोडता आला नाही.

मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं हे करून दाखवलं. तब्बल १५५ पेक्षा अधिक जागा भाजपनं जिंकल्या.

काँग्रेसनं कुणाच्या नेतृत्त्वाखाली केला होता रेकॉर्ड?
माधव सिंह सोलंकी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. सोलंकी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसनं गुजरातमध्ये हा रेकॉर्ड केला होता. माधव सिंह यांनी राजकीय कारकिर्दीत गुजरातचं नेतृत्त्व तर केलंच त्याशिवाय त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणुनही काम केलं. माधव सिंह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा जबाबदारी पार पाडली आहे.

कशी होती माधव सिंह सोलंकी यांची राजकीय कारकीर्द?
३० जुलै १९२७ रोजी जन्मलेल्या माधव सिंह सोलंकी यांचे मोठे भाऊ भरतसिंह सोलंकी हे सुद्धा काँग्रेस पक्षामध्येच सक्रीय होते. त्यामुळे माधव यांनीही आपली इनिंग काँग्रेस पक्षाकडूनच खेळली. सुरूवातीच्या काळात आपल्या मतदार संघापुरतं काम केल्यानंतर १९७४ मध्ये काँग्रेस पक्षानं त्यांना गुजरात काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं.

पक्षाला १९७७ सालची निवडणूक जिंकवून देत ते सर्वप्रथम गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर १९८० साली पुन्हा मुख्यमंत्री झाले. मग १९८५ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला १४९ जागांवर विजयी केलं आणि इतिहास रचला.

राज्यातील राजकारणानंतर ते राष्ट्रीय राजकारणात उतरले.

१९९१ मध्ये ज्यावेळी पी. व्ही. नरसिम्हा राव यांचं सरकार होतं तेव्हा माधव सिंह यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं होतं, पण १९९२ साली दावोस येथे स्वित्झर्लंडच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर त्यांच्यावर आरोप झाले आणि वादाच्या पार्श्वभुमीवर त्यांनी मार्च १९९२ मध्ये राजीनामा दिला.

१९८५ च्या विजयाची पार्श्वभुमी
१९८० मध्ये माधव सिंह सोलंकी हे मुख्यमंत्री झाले पण १९८५ मध्ये सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याचं कारण म्हणजे, माधव यांनी बक्षी आयोगाच्या शिफारशींवर आधारित सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केलं. त्याचा परिणाम म्हणून राज्यभरात आरक्षणविरोधी आंदोलनं झाली.

या आंदोलनांचं रुपांतर दंगलीत झालं. या दंगलीत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानं माधव सिंह सोलंकी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. पण, पुन्हा झालेल्या निवडणुकीत त्यांनी १४९ जागांवर विजय मिळवत इतिहास रचला.

ऐतिहासिक विजयाचं कारण काय होतं ?
१९८५ साली काँग्रेसनं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचं मुख्य कारण म्हणजे माधव सिंह यांचा खाम (KHAM) हा फॉर्म्युला… आता हा फॉर्म्युला नेमका काय तर क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लीम (KHAM- Kshatriyas, Harijans, Adivasis and Muslims).

हा फॉर्म्युला खरंतर माधव सिंह यांचा प्रायोगिक फॉर्म्युला होता. तरीही, या फॉर्म्युल्यानं काँग्रेसला प्रचंड मोठी वोट बँक मिळवून दिली. यामुळेच माधव यांनी आणि पर्यायानं काँग्रेस पक्षानं १९८५ साली गुजरातमध्ये इतिहास रचला होता.

सहजासहजी तुटणार नाही असं वाटणारा हा रेकॉर्ड आता तुटलाय. भाजपनं काँग्रेसचा हा रेकॉर्ड मोडला. ते ही फक्त काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होती असं नाही तर, २०२२ च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीही गुजरात निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या तयारीनिशी उतरली होती. या सगळ्या परिस्थितीत भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या सारख्या बड्या नेत्यांच्या सभा आणि रोड शोच्या बळावर तब्बल १५६ जागा जिंकत  गुजरातमध्ये एकहाती सत्ता आणली आहे.

तर १४९ जागा जिंकण्याचा रेकॉर्ड नावावर असलेल्या काँग्रेसच्या फक्त १७ जागा आल्या आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.