सचिन आणि लारा मध्ये कोण भारी होता ?

साल होत २००५. ऑस्ट्रेलिया मधल्या मेलबर्न क्रिकेट क्लबवर त्सुनामीच्या निम्मितानं एक चॅरीटी सामना सुरु होता. वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध आशियाई इलेव्हन. रिकी पाँटिंग कॅप्टन असलेल्या वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये ख्रिस गेल, लारा, गिलख्रिस्ट असे खेळाडू होते तर गांगुलीच्या आशियाई इलेव्हन मध्ये जयसूर्या, सेहवाग, द्रविड, मोहम्मद युसुफ हे खेळाडू होते.

पहिली बॅटिंग वर्ल्ड इलेव्हन टीमची होती. दोन विकेट पडल्यावर ब्रायन लाराची बुटकी मूर्ती मैदानात उतरली. तो क्रीज कडे निघाला आणि पूर्ण स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. विकेटकिपर होता संगकारा. त्याच्या शेजारी स्लीप मध्ये भारताचा एक अनुभवी खेळाडू उभा होता. ते दोघेही लाराच्या त्या एंट्री कडे डोळेभरून पाहात होते. यावेळी तो भारतीय खेळाडू संगकाराला म्हणाला,

“This is the man. He is my favourite batsman.”

संगकाराला खूप आश्चर्य वाटलं. एका भारतीयाला लारा कसा आवडू शकतो? संगकारान त्याला थेट विचारलं तुला सचिन आवडत नाही?? तेव्हा दबक्या आवाजात तो खेळाडू उत्तरला ,”नाही!!”

हा किस्सा खुद्द संगकाराने आपल्या एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. याच इंटरव्हूमध्ये त्याला त्या भारतीय खेळाडूचे नाव विचारले तेव्हा सुरवातीला तर संगकारा आढेवेढे घेत होता पण अखेर त्याने सांगितले तो भारतीय खेळाडू म्हणजे राहुल द्रविड होता.

आता हा किस्सा किती खरा किती खोटा हे फक्त संगकारा आणि द्रविडलाचं माहित. यावर अनेक वाद देखील झाले. खुद्द द्रविडने आपल्या अनेक मुलाखतीमध्ये सचिन आपला आवडता खेळाडू असल्याचं सांगून या विषयावर पडदा टाकला आहे.

पण सांगायचा मुद्दा हा की त्याकाळी जग सचिन भक्त विरुद्ध लारा फॉलोवर्स असे दोन भागात विभागल गेलेलं होतं. सामान्य क्रिकेटफॅन पासून क्रिकेट पंडीत, जुने नवे खेळाडू असे अनेक जणांचं याबद्दल स्वतःचं असं खास ओपिनियन होत.

लारा आणि सचिन यांच्यात अनेक साम्य होतं तसेच त्यांच्यात अनेक डिफरन्स देखील होते. 

टेक्निकली बघायला गेलं तर डावखुरा असणाऱ्या लाराला बॉलर्स विरुद्ध कायम जास्त एज असायचा असं म्हणता येईल. क्रिकेट बुक बघितलं तर सचिनच्या भात्यात लारा पेक्षा जास्त शस्त्रं होती. सचिनने जमान्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल देखील खूप केले. काही जण म्हणतात सचिनला भारतातल्या फलंदाजाना पाटा पीच असण्याचा फायदा जास्त झाला. तर काही जण म्हणतात वनडे सामन्यात सचिनने जी जबरदस्त कामगिरी केली ती लाराला जमली नाही. पण लाराने टीमला मॅच जिंकून देण्याचे प्रमाण देखील सचिन पेक्षा जास्त आहे.

लारा आणि सचिन हे दोघेही मॉडर्न क्रिकेट मधले सर्वात बेस्ट बॅट्समन होते हे नक्की. त्यांनी अनेक रेकॉर्ड मोडले आणि अनेक बनवले. त्यांच्या जवळपास देखील जाणे कोणाला शक्य झाले नाही. त्यांचे फॅन्स भांडत होते तेव्हा सचिन आणि लारा मात्र एकमेकांकडे बोट दाखवून हाच माझ्या पेक्षा चांगला फलंदाज आहे असं सांगत राहिले.

आता एवढ सगळ झालं तर आपण कोण जगाला सांगणारे सचिन भारी की लारा भारी. तरी लाराची एक इनिंग आता पर्यंतची जगातली सर्वात बेस्ट मानली जाते. तुम्ही म्हणालं आम्हाला माहित आहे त्याने एकदा एका इनिंग मध्ये ४०० धावा काढल्या होत्या हा रेकॉर्ड कोणी मोडला नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही ती इनिंग नव्हे.

ती इनिंग आहे १९९९ सालची.

ऑस्ट्रेलियन टीम वेस्ट इंडीज दौऱ्यावर आली होती. स्टीव्ह वॉ कप्तान असलेली ही टीम तेव्हा एक नंबरला होती. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळ्याच क्षेत्रात ते परफेक्ट होते. त्यामानाने वेस्ट इंडियन टीम अजून कच्ची होती. नुकताच आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर तरुण लाराच्या हातात टीमची कमान देण्यात आलेली होती.

पहिली कसोटी तर ऑस्ट्रेलियाने सहज जिंकली. दुसऱ्या सामन्यात लाराने द्विशतक झळकवून वेस्ट इंडीजला जिंकवून दिले. फक्त आणि फक्त लाराच्या बॅटींग वर त्यांच्या टीमची मदार होती. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी वेळी मात्र पहिल्या इनिंगला लारा स्वस्तात आउट झाला.  

स्टीव्ह वॉने १९९ धावांची जबरदस्त खेळी मुळे पहिल्या इनिंग पासून ऑस्ट्रेलिया ड्रायव्हिंग सिटवर होती. पण दुसऱ्या इनिंग वेळी पिचने आपले खरे रंग दाखवायला सुरवात केली. वॉल्श आणि अॅम्ब्रोजच्या तुफानी जोडीने ऑस्ट्रेलियाला १४६ धावात गुंडाळले. तरीही वेस्ट इंडीजला पहिल्या इनिन्ग्म्धल्या खराब कामगिरीमुळ जिंकण्यासाठी ३०८ धावांचा डोंगर ओलांडायचा होता.

मॅकग्रा गिलेस्पी वॉर्न हे ऑस्ट्रेलियन गोलंदाज तेव्हा फॉर्म मध्ये होते. वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या पीच वर मॅकग्रा तर जास्तच तावात आला. त्याने वेस्ट इंडियन टीमला खिंडार पाडले. सोबत गिलेस्पीसुद्धा तिखट मारा करत होता. लारा आला तोपर्यंत वेस्ट इंडीजची स्थिती अतिशय गंभीर बनली होती.

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा वेस्ट इंडीजच्या १०५ धावा झाल्या होत्या आणि अर्धी टीम पव्हेलीयनमध्ये परत गेली होती. इथून पुढे सामना जिंकणे अशक्य होते. जास्तीतजास्त दिवसभर खेळून काढून मॅच अनिर्णयीत करता येत होती पण तेही इम्पोसिबल दिसत होते. लारा मात्र आज मॅचचा निकाल लावायचा हे मनाशी ठरवूनचं आला होता.

एरव्ही मॅकग्राशी खेळताना थोडासा डगमगणारा लारा त्यादिवशी मात्र नांगर टाकून त्याच्या समोर उभा राहिला. एका साईडला त्याच्या समोर एकापाठोपाठ एक वेस्ट इंडियन खेळाडू शस्त्र टाकून परत जात होते पण लारा गिलेस्पी मॅक्गील वगैरेना फ्रंट फुटला येऊन निवांत धुत होता. लंच नंतर बघता बघता लाराने पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. एवढच नाही तर शेन वॉर्नला पुढे येऊन जोरात बाउन्ड्री मारत झोकात सेन्चुरी पूर्ण केली.

209895

ऑस्ट्रेलियाच्या खिशात असलेला सामना आता काहीही होऊ शकते या टप्प्यावर येऊन पोहचला. लाराला साथ देणाऱ्या जेसी अॅडम्सला मॅकग्राने बोल्ड काढले. जेकब्ज, पेरी वगैरे हजेरी लावून गेले. यानंतर आला अॅम्ब्रोज. साडेसहा फुट अॅम्ब्रोजने मात्र लाराच्या आशा जिवंत ठेवल्या. त्याने काढलेल्या एकएक रन पण वेस्ट इंडीजसाठी त्या शतकापेक्षा जास्त महत्वाच्या होत्या.

अखेर जिंकण्यासाठी ६ धावा शिल्लक असताना अॅम्ब्रोज आउट झाला. आता फक्त वॉल्श उरला होता. ऑस्ट्रेलियाला परत विजय जवळ दिसू लागला. मॅकग्रा नव्या दमाने बॉलिंग टाकू लागला. कॅरीबियन फॅन्सच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मॅकग्राने एक डेडली यॉर्कर मारला. वॉल्शने वेळीच बॅट खाली घेऊन तो अडवला. अख्ख्या वेस्ट इंडियन बेटांचा हृदयाचा ठोका चुकला. वॉल्शच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन नेहमी प्रमाणे काडीमात्रही चेंज झाले नाही.

कशीबशी ती ओव्हर गेली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. गिलेस्पीची ओव्हर आली. लाराने एक सुंदर कव्हर ड्राईव्ह मारला आणि वेस्ट इंडीजने एक अशक्यप्राय विजय मिळवला. लाराच्या तेव्हा १५३ धावा झाल्या होत्या. त्याच्या खालोखाल दोन नंबरच्या धावा जेसी अॅडम्सच्या होत्या त्याही ३८.

ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट बॉलर्सनी जंग जंग पछाडूनही लारा त्यांना आउट झाला नाही. टेक्निक आणि अॅग्रेश्नचा सुंदर संगम त्याने जगाला दाखवून दिला. त्या दिवशी कॅरीबियन बेटावर वर्ल्ड कप जिंकल्यापेक्षा जास्त मोठ सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. स्टीव्ह वॉ म्हणाला

“माझ्या आयुष्यातली ही सर्वात संस्मरणीय मॅच होती.”

क्रिकेट विश्वातले सगळ्या तज्ञांनी एकमुखी जाहीर केलं की लाराची ही इनिंग अभूतपूर्व होती. २००० साली विस्डेनने गेल्या शतकभरात क्रिकेट मध्ये काय काय घडलं यासाठी एक विशेष आवृत्ती काढली त्यात डॉन ब्रॅडमन यांच्या २७० धावानंतरची जगातली सर्वोत्कृष्ट इनिंग घोषित केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.