नेहरूंविरोधात ‘स्वतंत्र पार्टी’ बनवणारे,देशाचे पहिले आणि शेवटचे ‘भारतीय’ गव्हर्नर जनरल !

‘राजाजी’ या नावाने सुप्रसिद्ध असलेले वकील, पत्रकार, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक सी.राजगोपालचारी हे भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही काळ त्यांनी देशाचे स्वातंत्र्यानंतरचे दुसरे आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून काम बघितलं. त्यानंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांची आज जयंती. 

१९५४ साली ज्यावेळी त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाला, त्यावेळी या पुरस्काराचे ते पहिलेच मानकरी ठरले होते. अर्थात त्याच वेळी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी.व्ही. रमण यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला होता. 

मद्रासमधील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलेल्या राजाजी यांनी १९१६ साली ‘तमिळ सायंटीफिक टर्म्स सोसायटी’ची स्थापना केली होती. या संस्थेने फिजिक्स, केमेस्ट्री यांसारख्या विषयातील वैज्ञानिक संज्ञाचं साध्या आणि सोप्या अशा तमिळ शब्दांमध्ये भाषांतर केलं.  वैज्ञानिक संकल्पनांना स्थानिक भाषेत आणण्यासंबंधीचं त्यांचं हे काम फार मोठं मानलं जातं.

टिळकांकडून प्रेरणा घेऊन भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या राजाजींनी पुढे गाधीजींचं नेतृत्व स्वीकारलं. १९३० साली जेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला, त्यावेळी दक्षिण भारतातील काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून उदय झालेल्या राजाजींनीच मद्रास प्रांतात या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. त्यावेळी त्यांनी कारावास देखीलभोगला होता.

पुढे चालून राजाजी गांधीजींचे अतिशय निकटवर्ती बनले. गांधीजींच्या ‘यंग इंडिया’चे ते संपादक बनले. राजाजी हे गांधीजींचे व्याही देखील होते. गांधीजींचे चिरंजीव देविदास यांचं लग्न राजाजींची मुलगी लक्ष्मी हिच्याबरोबर झालं होतं.  

१९३७ सालच्या निवडणुकानंतर मद्रास प्रांतात काँग्रेस विजयी झाल्यानंतर ते मद्रासचे पहिले मुख्यमंत्री बनले. याकाळात त्यांनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळून देण्यासाठी मोठा लढा दिला  आणि कायदा संमत करून घेतला. मद्रास प्रांतात अस्पृश्यता निवारणासंबंधीचं हे मोठं पाऊल होतं.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी आणि मोहोम्मद अली जिन्ना यांच्यातील चर्चेचे मध्यस्थ म्हणून राजाजींनीच महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यांनी या संदर्भात एक प्रस्ताव केला होता, ज्या प्रस्तावानुसार मुस्लीम लीग काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठींबा देईल आणि अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला मदत करेल.

या प्रस्तावाला ‘राजगोपालचारी फॉर्मुला’ असं देखील म्हंटलं जातं.  

स्वातंत्र्य भारतात शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पटेलांच्या मृत्युनंतर देशाचं गृहमंत्रीपद भूषविलेले राजाजी १९५२ ते १९५४ या काळात ते मद्रासचे मुख्यमंत्री राहिले. त्याकाळात दक्षिण भारतात हिंदीच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. मद्रास प्रांतातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यासंबंधीचा एक प्रस्ताव त्यांनी आणला होता. त्यावरून फार मोठा गजहब झाला. हा तोच काळ होता, जेव्हा मद्रासमध्ये तमिळ भाषेसंबंधीचं आंदोलन अतिशय आक्रमक झालं होतं.  

१९५७ साली काँग्रेसची धोरणं आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी झालेल्या मतभेदांवरून त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. राजाजींनी मिनू मसानी आणि मुरारी वैद्य यांच्या बरोबर मिळून ‘स्वतंत्र पार्टी’ नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली.

राजकारणापलीकडे जाऊन राजाजी एक उत्कृष्ट साहित्यिक देखील होते. त्यांनी अनेक पुस्तकांची रचना केली होती. रामायणाचं तमिळ भाषेतील भाषांतर असणाऱ्या ‘चक्रवर्ती थिरूमागण’ या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.