महाराणा प्रताप यांच्यासाठी लढलेल्या हकीम खानच्या कबरीची तोडफोड केली जातीय..

हकीम खान सूर, शेरशहा सुरीचे शेवटचे वंशज…आणि  हल्दीघाटीच्या युद्धातले महाराणा प्रतापच्या सैन्याचे सेनापती..

२६ जुलैच्या रात्री काही समाजकंटकांनी त्यांच्या कबरीची तोडफोड केल्याचं वृत्त आहे. त्यांची ही कबर राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील खमनोर भागात आहे. पण त्यांच्या या कबरीची तोडफोड आत्ताच नाही झाली तर ती वारंवार होत असते.

यावेळी मात्र ती कबर पोलिसांनी दुरुस्त केलीय. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार तोडफोडीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत तोडफोड करणार्‍यांनी पळ काढला होता. रात्रभर पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. पण काहीच हाती आले नाही. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी पोलिस दल तैनात करून दुरुस्ती केली.

कोण होते हे हकीम खान सूर…

राजस्थानच्या भूमीला कायमच वीर आणि महापुरुषांची भूमी म्हणून ओळखल जातं. त्याच वीरांपैकी एक वीर म्हणजे महाराणा प्रताप. १५७६ मध्ये हल्दीघाटीत महाराणा प्रताप आणि अकबरामध्ये युद्ध झाले होते. असं म्हणतात की, महाभारताच्या युद्धानंतरच ते सर्वात मोठं विनाशकारी युद्ध होत.

महाराणा प्रताप यांनी या हल्दीघाटीच्या युद्धात सर्वात शक्तीशाली अशा मुघल बादशाह अकबराच्या ८५००० सैनिकांच्या विशाल सैन्या समोर आपल्या केवळ २०००० सैनिक आणि तोकड्या शस्त्रास्त्रांच्या आधारे युद्ध खेळलं होत.

पण सलग ३० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही अकबराला महाराणा प्रताप यांना बंदी बनवता आले नाही.

या अकबराविरुद्धच्या लढाईत महाराणा प्रतापा यांच्या बाजूने हकीम खाँ सूर यांनी युद्ध लढल होत. महाराणा उदय सिंह यांच्या शासनकाळात कर्बला योद्ध्यांच्या वंशजांपैकी एक हकीम खां सूर मेवाडच्या राज्यात आले होते.

हकीम खाँ सूर म्हणजे शेरशहा सूरचे शेवटचे वंशज, आणि ज्याच्याशिवाय हल्दी घाटीची लढाईची गोष्ट अर्धवट आहे. हकीम या युद्धात महाराणा प्रतापांसोबत उभा राहिले. एवढंच नाही तर त्यांनी महाराणा प्रताप यांच्या सेनेला युद्धातले मुघली डावपेच ही शिकवले.

हकीम खाँ शेरशाह सूर राजवटीचे वारसदार होते. मात्र मुघलांनी हकीम खाँ चे साम्राज्य बळकावले. त्यानंतर ते महाराणा प्रतापाच्या सेनेत आपले १५०० सैनिकांना घेऊन सामील झाले. सुरुवातीला त्यांनी महाराणा प्रताप यांच्या दरबारात कोषाध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांची इमानदारी पाहून महाराणा प्रताप यांनी हकीम खाँ यांना आपल्या सैन्याचे सेनापती म्हणून नियुक्त केले.

हल्दीघाटीचे युद्ध हिंदू-मुस्लिमांमधील संघर्ष असल्याचे मानले जाते.

मात्र वस्तुस्थिती तशी नव्हती. हल्दीघाटीची लढाई ही साम्राज्यवादी आणि विस्तारवादी धोरणाविरुद्ध लढली गेली होती. ही लढाई धार्मिक किंवा सांप्रदायिक नव्हती. मेवाडच्या सैन्यात सेनापती झाल्यावर हकीम खाँ सूर यांनी लाहोरी युद्धकलांच शिक्षण मेवाडच्या सैनिकांना दिलं. डोक्यावरच्या घावांपासून वाचण्यासाठी त्यांनी सैनिकांना सर्वप्रथम शिरस्त्राण घालून लढायला शिकवले.

हल्दी घाटीच्या युद्धात अकबराचे सेनापती जयपूरचे राजा मानसिंह होते. तर अकबराच्या सेनेविरुद्ध महाराणा प्रतापाच्या सैन्याचे सेनापती हकीम खाँ सूर  म्हणून उभे राहिले. दोन्हीकडच्या सैन्यात हिंदू मुस्लिम असे दोन्ही सैनिक होते.

त्या युद्धात मेवाडच्या सेनापतीचे म्हणजेच हकीम खाँ सूर यांचे शीर धडापासून वेगळे झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

युद्धात जिथ त्याचं धड पडलं तिथे त्यांची समाधी बनविण्यात आली. असं म्हणतात की, शीर धडावेगळे होऊनसुद्धा ते काही काळ त्यांच्या घोड्यावरच योद्ध्यासारखेच बसले होते. जिथे त्यांचे धड पडले ती जागा रक्त तलाई, खमनौर गावात आहे. त्यानंतर महाराणा प्रताप यांनी त्यांच्या हातातून तलवार सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मुठीतून तलवार काही सुटली नाही. म्हणून त्यांना त्यांच्या तलवारीसोबत दफन करण्यात आले.

त्यानंतर रक्त तलाईपासून तीन किलोमीटर अंतरावर जिथे त्यांचे शीर घोड्यावरून खाली पडले तिथे देखील त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. त्यांना मुस्लिम संताचा दर्जा देण्यात आला. इथे हिंदू-मुस्लिम लोक आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मागणं मागायला येतात.

सुरुवातीला डोंगरावर होती हकीम यांची समाधी 

हल्दी घाटीमध्ये कैक वर्षांपूर्वी ही समाधी डोंगरावर होती. तेव्हा रस्ता दोन डोंगरांमधून जात असे. ह्या समाधीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा दिला गेला आणि त्या रस्त्याच्या डावीकडील डोंगर खोदून रस्ता बनविण्यात आला. नवीन वळणदार रस्त्यावर त्यांची समाधी त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच जमिनीलगत आहे.

इथे दरवर्षी हल्दीघाटीच्या युद्ध प्रसंगाची आठवण म्हणून समारंभाचे आयोजन केले जाते. हकीम खाँ सूर यांच्या सन्मानार्थ महाराणा मेवाड़ चैरिटेबल फाउंडेशन, उदयपुर द्वारा प्रतिवर्षी एक पुरस्कार राष्ट्रीय एकतेसाठी दिला जातो. त्यांचे बलिदान धार्मिक आणि सांप्रदायिक विचारांपालिकडे जाऊन चांगल्या विचारांशी एकनिष्ठ असण्याचे आणि मानवी धर्माशी कटिबद्ध असण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

मेवाडचे स्वातंत्र्य आणि सन्मान कायम राखण्यासाठी चालू असलेल्या लढाईत त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.