शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी नेमकी कुणी आणि का घातली होती..?

सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी उठविली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हंटलंय की, “महिलांना मंदिर प्रवेश नाकारणं हे घटनाबाह्य असून स्त्री-पुरुष समानतेला बाधक आहे. लिंग-भेदावरून कुठल्याही महिलेला मंदिरातील प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. खुद्द भगवान अयाप्पांना देखील आपल्या भक्तांना असमान वागणूक देण्याचा अधिकार नाही.”

दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठातील एकमेव महिला न्यायाधीश न्या.इंदू मल्होत्रा यांनी मात्र बाकी ४ न्यायाधीशांपेक्षा वेगळं मत नोंदवत मंदिर प्रशासनाच्या बाजूने आपला निर्णय दिला आहे.

“न्यायालयाने धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये. एखाद्याच्या जर धार्मिक प्रथा आणि परंपरा यांवर विश्वास असेल तर त्याचा निश्चितपणे सन्मान व्हायला हवा. समानतेच्या अधिकाराबाबत विचार करताना धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराला धक्का लागणार नाही, याचा देखील विचार होणं आवश्यक आहे. धार्मिक प्रथा आणि परंपरा मोडीत काढणं, हे काही न्यायालयाचं काम नव्हे” असं मत न्या. इंदू मल्होत्रा यांनी नोंदवलं आहे.

शबरीमाला मंदिर

केरळमधील ऐतिहासिक शबरीमाला मंदिरात भगवान अयप्पा यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी  वयोवर्ष १० ते ५० या वयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशावर बंदी होती. फक्त १० वर्षांखालील मुली आणि ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनाच या मंदिरात प्रवेश होता. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवून मंदिर सर्वच वयोगटातील महिला भक्तांसाठी खुलं केलं आहे.

बंदी कुणी आणि का घातली होती…?

फर्स्टपोस्टसाठी लिहिलेल्या एका लेखात एम.ए.देवैय्या म्हणतात की, “मी गेली २५ वर्षे या मंदिरात जातोय. ज्यावेळी लोक मला विचारतात की मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर बंदी नेमकी कुणी घातली त्यावर माझं उत्तर असतं की खुद्द भगवान अयप्पा यांनी.

पुराणकथांनुसार भगवान अयप्पा अविवाहित आणि ब्रम्हचारी होते. शिवाय त्यांनी तोपर्यंत अविवाहित राहण्याची शपथ घेतली होती, जोपर्यंत मंदिरात ‘कन्नी स्वामी’ (असे भक्त जे पहिल्यांदाच मंदिरात येतात) येणं बंद होणार नाही”

मंदिर प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयात असं सांगण्यात आलं होतं की, “भगवान अयप्पा ब्रम्हचारी आहेत. त्यामुळे मंदिरात प्रवेशासाठी ४१ दिवस ब्रह्मचर्य पालन करणं आवश्यक असतं, परंतु महिला सलग ४१ दिवस ब्रम्हचर्याचं पालन करू शकत नाहीत. मासिक पाळीमुळे महिलांना ते शक्य नाही”

एम.ए. देवय्या मात्र मंदिर प्रशासनाचा हा दावा खोडून काढतात. त्यांच्या मते महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्याचा संबंध त्यांच्या मासिक पाळीशी जोडण्यात काहीही अर्थ नाही. अयप्पा विष्णू आणि शिव यांचे पुत्र आहेत. हे या गोष्टीचं प्रतिक आहे की या दोहोंमधील अंतर्यामी शक्तींचं ते मिलन आहे, ना की त्यांचं शारीरिक मिलन.

 हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.