कोण होते साईबाबा ?

सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याचा दावा काही लोकांनी केला. यातच भरीस भर म्हणून साईबाबांच्या जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल, असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.

चला तर आज जाणून घेऊया साईबाबा नेमके कुठले? या बद्दलच्या नेमक्या संकल्पना काय आहेत.

शिर्डीच्या साईबाबांनी कधीच आपले नाव, जात, धर्म कधीही उघड केले नाही. हिंदू त्यांना ‘संत’ तर मुस्लिम त्यांना ‘फकीर’, ‘पीर’ समजत. शिर्डीतील खंडोबा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनीच दिलेले नावच साईबाबांनी स्वीकारले.

असे म्हणतात की, महाराष्ट्रातील धुळे कोर्टातील एका खटल्यात साक्ष देताना साईबाबांनी आपला पंथ किंवा धर्म ‘कबीर’ आणि जात ‘परवरदिगार’ असल्याचे सांगितले होते.

साईबाबा पाथरीला जन्मल्याचा व बाबासाहेब ऊर्फ गोपाळराव साईबाबांचे गुरू असल्याचा उल्लेख संत दासगणु लिखित सेलूच्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरित्रात आहे. हाच धागा पकडून १९७५ च्या सुमारास विश्वास खेरांनी साईबाबांचे नाव हरीभाऊ भुसारी असून ब्राह्मण कुटुंबात जन्मल्याचा तर्क लावला होता. मात्र मधील दोन पिढ्यांची माहिती मिळाली नसल्याने तेही साशंक होते.

साईबाबा नेमके कोण होते, याबद्दल अनेकांचे दावे आहेत.

ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचे संदर्भ दिले जातात.

१९७५ मध्ये विश्वास खेर यांनी तसा दावा केला. काहींनी बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् येथे झाला, त्यांच्या आईचे नाव वैष्णवी तर वडिलांचे नाव अब्दुल सत्तार असल्याचे सांगितले.

एका तामीळ चरित्रात त्यांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख आहे. तर दुसरीकडे गुजराथी ‘साईसुधाम’ध्ये बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. मंगळवेढय़ात एक वेडसर बुवा होते. तेच साईबाबा असल्याची चर्चा होती.

काहींना १८५७ च्या बंडानंतर परागंदा झालेले नानासाहेब पेशवे हे साईबाबा असल्याचा संशय होता. तसे लेखही छापून आले. मात्र हे सर्व दावे तर्कावर आधारीत आहेत.

मंगळवेढ्यात एक दिगंबर नावाचे बुवा होते. तेच साईबाबा असल्याचीही चर्चा त्यावेळी होती. साई शरणानंद लिखित चरित्रात बाबांचा जन्म पाथरीला  गंगाभाव व देवगिरी अम्मा यांच्या पोटी झाला आहे, असे आहे.

शिर्डीत आलेल्या पाथरीच्या माणसाकडे बाबांनी तिकडची माहिती विचारली याचा अर्थ त्यांना पाथरीची माहिती होती; मात्र ते पाथरीचेच, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यांचे कुणी नातेवाईकही फिरकले नाहीत. एकूणच जन्मस्थानाचे व आई-वडिलांबाबतचे दावे तर्कावर आधारित आहेत.

पाथरीला निधी देण्यास विरोध नाही. मात्र साई जन्मभूमी ही नसलेली ओळख चिकटवू नये, साई जन्मभूमी व त्यांच्या आईवडिलांच्या संदर्भात अनेक दावे आहेत. साईबाबा नेमके कुठले हे तर स्पष्ट नाही पण गीतेत सांगितल्याप्रमाणे,

‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।’

म्हणजे मी मनुष्य रूपात अवतरित होतो, तेव्हा मूढ लोक मला जाणत नाहीत, माझं खरं स्वरूप जाणत नाहीत! मग साईबाबा कोण होते, हे आपण कसं जाणणार?

साईबाबांना जे आवडतं ते आपल्या जगण्यात जितकं उतरेल तितके साईबाबा खरे कोण होते, याची जाणीव मनुष्याला आणि आपणाला होईल. हेच खरे.

हे ही वाच भिडू. 

3 Comments
  1. जीवन says

    साई बाबा कोण होते हे गुपितच राहणार परंतु ते देव नव्हते त्यामुळे ते कुठे जन्मले आणि त्यांचे मंदिर अमुक अमुक ठिकाणी हवे ह्यावर वाद घालण्यापेक्ष, त्यांना देव ठरवून जो बाजार मांडला आहे तो कसा बंद करता येईल ह्यावर लक्ष दिले पाहिजे

  2. pritam says

    ते देव होते की नव्हते हे त्यांचे भक्त ठरवतील.
    पण त्यांच्या कृपे मुळे माझ्या सारख्या करोडो लोकांचा आयुष्य सुखी आहे हे 100% खर..मी बँकेत उच्चपदावर अधिकारी आहे आणि वर्षातून चार वेळा शिर्डी ला दर्शनासाठी जातो. माला तिथे कुठलाही बाज़ार मांडलेला दिसला नहि किवा लुबाडणुक नाही…उलट संस्थान च्या माध्यमातून लाखो लोकोपयोगी कामे होतात…त्यामुळे बोलताना विचार करून बोला.

  3. Pankaj says

    खुप छान प्रीतम साहेब… तर्क वितर्क आणि श्रद्धा हे सर्व वेवेगळ्या पातळीवरचे विषय आहेत.. एकदा समाधी वर डोकं टेकवून या मग स्वतः अनुभवावे

Leave A Reply

Your email address will not be published.