सिरीयल लव्हर म्हणून ओळखला जाणारा ओरिजिनल कॅसानोव्हा कोण होता ?

कॅसानोव्हा हे नाव आपण कुठना कुठंतरी ऐकलच असेल किंवा त्याच्याबद्दलच्या दंतकथा ऐकल्या असेल पण हा कॅसानोव्हा नक्की कोण होता ? असली कॅसानोव्हा कोण होता ते आपण जाणून घेऊया.

ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते कॅसानोव्हा शब्दाचा अर्थ होतो अशी एक व्यक्ती जीचा अनेक सुंदर महिलांसोबत रोमँटिक सेक्स संबंध असणे. कॅसानोव्हा हा शब्द 18 व्या शतकात इटालियन लेखक,जादूगार, चोर आणि ऍक्टर जियाकोमो जॅकोपो गिरोलामो कॅसानोव्हा ( हे सगळं एकाच भिडूचं नाव आहे बरका…) वरून बनला गेला. एक असा गडी ज्याच्या प्रेमामुळे आणि लैंगिक संबंधामुळे त्याला माणसाऐवजी एक प्रतीक मानलं गेलं. जगभरातील मुलींसोबत फ्लर्ट करणे, संबंध ठेवणे आणि पौरुषत्व दाखवणे यांचं प्रतीक. पण कॅसानोव्हा च्या आयुष्यात एक सिरीयल लव्हर असण्यापेक्षा बरच काही होतं.

आजच्या 300 वर्षांपूर्वी जन्मलेल्या कॅसानोव्हाच लहानपण अत्यंत वाईट होतं. त्याची आई एक थिएटर आर्टिस्ट होती तर वडील स्टेज डान्सर होते. पण असं सांगितलं जातं की कॅसानोव्हाचे वडील हे अत्यंत श्रीमंत होते आणि थेटरचे ते मालक होते त्यांच्या थिएटरमध्ये कॅसानोव्हाची आई काम करत असायची.

वयवर्ष 8 असताना कॅसानोव्हाच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याला बोर्डिंग मध्ये भरती करण्यात आलं. तिथं त्याला वयाच्या 11 व्या वर्षी आपले शिक्षक गोजी यांच्या लहान बहिणीसोबत पहिलं प्रेम झालं. कॅसानोव्हा आपल्या डायरीत याबद्दल लिहितो की त्या मुलीने माझ्या हृदयात जी आग पेटवली होती की मला कल्पनाच नव्हती की ती मुलगी माझी पॅशन बनेल. जस सगळ्यांसोबत होतं अगदी त्याचप्रमाणे कॅसानोव्हालासुद्धा पहिलं प्रेम मिळालं नाही. तिने दुसरीकडे लग्न केलं पण अगदी म्हातारपणात सुद्धा त्याने तिच्यासाठी सगळं केलं.

कॅसानोव्हाने पहिली नोकरी केली ती चर्चमध्ये. जिथं त्याने भरपूर अभ्यास केला व त्याने आपला टॅलेंट वापरून मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे सिक्रेट प्रेम पत्र लिहिले. पण त्याचं हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्याला बळीचा बकरा बनवून चर्चमधून काढून टाकण्यात आलं. नंतर त्याने सेनेमध्ये नोकरी केली. ऑर्केस्ट्रा मध्ये व्हायोलिन वादक म्हणून काम केलं नंतर वकील बनला, प्रोफेशनल जुगारी झाला आणि शेवटी तो युरोपच्या मोठ्या यात्रेवर निघून गेला.

कॅसानोव्हाने एक जादूची ट्रिक अवगत केली होती. श्रीमंत बायकांना आपल्या बोलण्याने त्याने मोहिनी घातली होती. त्यांच्यासोबत संबंध ठेवून त्याच्या कथा लिहिल्या. पण त्याचं हेही प्रकरण लवकरचं उघडकीस आलं आणि पॅरिसमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली. जेलमधून तो पळाला आणि व्हेनिसला जाऊन पोहचला पण यातही त्याने भरपूर कांड केले. पॅरिसमध्ये तो बेंजामिन फ्रॅंकलिन, व्होल्टेअर, मोजार्ट अशा महान लोकांसोबत राहिला.

कॅसिनोव्हाची मते महिलांविषयक खूपच विरोधाभास निर्माण करणारे होते. जेव्हा कॅसिनोव्हा 14 वर्षांचा होता तेव्हा 14 आणि 16 वर्षाच्या दोन चुलत बहिणींसोबत त्याचे संबंध होते. या घटनेबाबत कॅसानोव्हा म्हणतो की यामुळे मी कायमचा बदलला गेलो. वेळोवेळी कॅसानोव्हाची महिलांविषयी मतं बदलत राहिली.

एका बाजूला त्याने वयाच्या 40 व्या वर्षी एका 13 वर्षाच्या पोरीला पैसे देऊन सेक्स गुलाम म्हणून ठेवून घेतलं तर दुसरीकडे त्याने 31 व्या वर्षी मुलगी 13 वर्षाची होती म्हणून तिच्यासोबत सेक्स न करता तिला सोडून दिलं.

आपल्या डायरीत तो म्हणतो की,

अशी एकही इमानदार बाई नाही जिच्या मनात जागा बनवता येईल. दारू आणि ताकद कुणाला नामोहरम करण्याची साधन नाहीत. प्रेम करण्यासाठी तुमच्याकडे चांगले शब्द असायला हवे. गप राहिलं तर प्रेम नष्ट होतं.

पुढे तो म्हणतो की,

जर बाई फक्त दिसायला सुंदर असेल आणि तिला अक्कल नसेल तर पुरुषांच्या दृष्टीने ती काहीच महत्वाची नाही. बायकांचं हुशार असणं ही एक चांगली गोष्ट आहे.

कॅसानोव्हाचे एकूण 152 बायकांसोबत संबंध होते. पण या बायकांसोबत असलेले संबंध त्याने कथा लिहून पॉप्युलर केले. 1820 साली त्याच्या कुटुंबाने त्याची डायरी पुस्तकरूपाने छापली. 1960 साली त्याचं पुस्तक इंग्रजीमध्ये सुद्धा आलं आणि एक कल्ट क्लासिकचा दर्जा त्याला मिळाला. कॅसानोव्हा वर आजवर बऱ्याच डॉक्युमेंटरी, टीव्ही सिरीज बनून गेल्या. सिरीयल किलर असतात,सिरीयल किसर असतात पण कॅसानोव्हा सिरीयल लव्हर होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.