किंग चार्ल्स राजगादी सोडणार; भविष्यवाणी करणारा हा नास्त्रेदमास होता तरी कोण?

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा किंग चार्ल्स हा ब्रिटनचा राजा झालाय. सगळं काही व्यवस्थित होत असतांना सोशल मीडियावर मात्र किंग चार्ल्स लवकरच राजगादीवरून दूर होतील अशी चर्चा केली जात आहे. 

ही चर्चा प्रसिद्ध फ्रेंच भविष्यकार नास्त्रेदमास यांनी केलेल्या भविष्यवाणीवरून केली जात आहे. नास्त्रेदमस यांच्या अनेक भविष्यवाण्या आजवर खऱ्या ठरल्या असा दावा केला जातो. त्यामुळे या भविष्यवाणीबद्दल सुद्धा लोकांमध्ये क्रेझ निर्माण झालीय.

या भविष्यवाणीत नक्की काय सांगितलं?

तर १६ व्या शतकात नास्त्रेदमास यांनी लिहिलेल्या कवितांवर मारियो रिडींग या लेखकाने २००५ साली एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात नास्त्रेदमसच्या ‘बेटांचा राजा’ या कवितेच्या आधारावर मारियो रिडींग यांनी असा दावा केला होता की, 

“ब्रिटनच्या महाराणीची आई जितके वर्ष जगेल त्याच्या ५ वर्षाआधी महाराणीचा मृत्यू होईल. तिच्या मृत्युनंतर तिचा मुलगा राजा बनेल. तो अनेक बेटांचा राजा असेल मात्र लवकरच सगळी बेटं त्याच्या साम्राज्यातून स्वतंत्र होत जातील. त्यामुळे तो राजगादी सोडून स्वतःची नवीन राज्याची स्थापना करेल. राजाचा कार्यकाळ लहान परंतु गोड असेल आणि त्याच्यानंतर एक अनपेक्षित व्यक्ती राजा होईल.”    

या दाव्यामुळे किंग चार्ल्सची राजवट लवकरच संपून अनपेक्षितरित्या प्रिन्स हॅरी राजा होईल का? याबद्दल सगळीकडे चर्चा केली जातेय. 

परंतु भिडूंनो आज या भविष्यवाणीची चर्चा सुरु असली तरी यापूर्वी अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत असा दावा करण्यात आलाय.

१. लंडन शहरात लागलेली आग.

लंडन शहरात २ सप्टेंबर १६६६ रोजी छोटीशी आग लागली होती. परंतु या आगीने अवघ्या ३ दिवसात शहरातील मध्यभाग जाळून खाक झाला होता. त्यात १३ हजार २०० घरं, ८७ चर्च आणि प्रमुख सरकारी इमारती जाळून खाक झाल्या आणि ८० हजार लोकं बेघर झाले होते.

२. फ्रेंच राज्यक्रांती

१७८९-९९ दरम्यान फ्रांसमध्ये राजकीय क्रांती घडून आली होती. राजेशाहीवर नाराज असलेल्या लोकांनी संपूर्ण पॅरिस शहर आपल्या ताब्यात घेतलं आणि शहरातील श्रीमंत लोकांना आणि राज्यकर्त्यांना त्यांच्या गढ्यांमध्ये बंद करून त्यांची हत्या केली होती.  

३. नेपोलियन बद्दलची भविष्यवाणी 

नास्त्रेदमसने नेपोलियनच्या उदयाची भविष्यवाणी केली होती. त्याने पऊ नाय लोरोन नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. या नावाला उलटफेर केल्यास नेपोलियन असा नाव तयार होतो. नास्त्रेदमसने तिसऱ्या ओळीत पोप्स पीउस सहावा आणि पोप्स पीउस सातवा या दोघांचा उल्लेख केला होता. या दोघांना नेपोलियनने बंदी बनवलं होतं. त्यामुळे ही भविष्यवाणी खरी ठरली असा दावा केला जातो. 

४. दुसरं महायुद्ध 

नास्त्रेदमसच्या प्रलय येईल अशी भविष्यवाणी केली होती. याचा संबंध दुसऱ्या महायुद्धाशी जोडला जातो. १९३९-४५ या काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धात जवळपास ३० देशांच्या तब्बल १० कोटी सैनिकांनी सहभाग घेतला होता. ज्यात अंदाजे ५ ते ७ कोटी लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळे अनेक लोकांनी या युद्धाची तुलना प्रलयाशी केली होती.

५. जपानमध्ये महाप्रलय येणार

जपानमध्ये प्रलय येईल अशी भविष्यवाणी नास्त्रेदमसने केली होती. या प्रलयाचा संदर्भ १९४५ हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बशी लावला जातो. त्यात १.५ ते २.५ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण या भविष्यवाणीचा संदर्भ २०११ सालात आलेल्या त्सुनामीशी जोडतात ज्यात मोठी हानी झाली होती. या आधारावर ही भविष्यवाणी खरी ठरली असा दावा केला जातो.

६. अमेरिकेतील ९/११ चा दहशतवादी हल्ला

नास्त्रेदमसने अरेस्थुस नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. याचा संबंध २००१ मध्ये झालेल्या ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड लादेनशी जोडण्यात येतो. या घटनेत हायजॅकर्सने दोन विमानाचे अपहरण केलं होतंआणि अमेरिकेच्या ट्विन टॉवरला धडक दिली होती. यात विमानातील सगळे जण मेले होते तर टॉवर सुद्धा जमीनदोस्त झाले होते.

७. भारतात ईश्वराचा अवतार जन्म घेईल.

नास्त्रेदमसने त्याच्या ‘सेन्चुरी’ या ग्रंथातील ७५ व्या छंदात महासागराच्या नावाच्या देशात ईश्वराचा अवतार जन्माला येईल आणि त्याची गुरूप्रमाणे पूजा केली जाईल. तसेच हिंदू धर्मातील लोकं इतर धर्मीयांना घाबरतील मात्र शेवटी विजय हिंदूंचाच होईल असं भाकीत त्याने वर्तवलं होतं.

या भविष्यवाणीचा संदर्भ भारतातील अनेक लोकांशी जोडला जातो. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सतलोक आश्रमाचे संत रामपाल यांचं नाव घेतलं जातं.

नास्त्रेदमस त्याच्या प्रसिद्ध भविष्यवाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो पण तो नेमका आहे कोण?

मायकल दी नास्त्रेदमस असं नाव पूर्ण नाव असलेल्या नास्त्रेदमसचा जन्म १४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसच्या सेंट रेमी या गावात झाला होता. त्याची अध्यात्मात फार आवड होती. त्याने लॅटिन, रोमन, हिब्रू या भाषांसोबत गणित, शरीर विज्ञान आणि ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला होता. 

त्याने किशोरावयातच भविष्यवाण्या करायला सुरुवात केली होती. मात्र कट्टर धार्मिक ख्रिश्चन असलेल्या त्याच्या वडिलांना ही गोष्ट आवडत नव्हती. त्यांनी त्याला सर्जरी आणि उपचाराचे शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात पाठवलं. त्यामुळे त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षकाची नोकरी करायला लागला. परंतु नोकरीत त्याचं मन रमत नव्हतं. म्हणून त्याने भविष्यवाणी करण्याचा व्यवसाय सुरु केला. 

त्याने केलेल्या भविष्यवाण्यांबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.

एकदा तो इटलीच्या रस्त्यावरून फिरत होता. तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ आला आणि त्याने नास्त्रेदमला नमस्कार केला. तेव्हा त्याने मुलाबद्दल भविष्यवाणी केली की हा मुलगा भविष्यात पोप बनेल. समोर जाऊन भविष्यवाणी खरी ठरली आणि मुलगा पोप झाला. 

त्याच्या भविष्यवाण्यांच्या कथा ऐकून फ्रांसची महारानी कॅथरीनने तिच्या मुलांचं भविष्य जाणून घेण्यासाठी त्याला राजदरबारात बोलावलं. त्याने दोन्ही राजकुमाराचे भविष्य पहिले तेव्हा त्याला कळलं की ते दोघेही अल्पायुषी आहेत. ही गोष्ट जर राणीला सांगितली तर तिला दुःख होईल याची त्याला कल्पना होती. त्यामुळे त्याने पुढे सर्व भविष्यवाण्या कोडवर्ड भाषेत लिहिण्यास सुरुवात केली. 

नास्त्रेदमस ने १५५५ मध्येभविष्यवाण्या केलेला पहला ग्रंथ सेंचुरीची पहिली आवृत्ती लिहिली. पुढील काळात त्याच्या समोरच्या आवृत्त्या आल्या आणि त्या हातोहात विकल्या. मात्र आयुष्याच्या शेवटी त्याचं जीवन मात्र हलाखीच्या अवस्थेतच गेलं.

असं असतांना त्याला त्याच्या मृत्यूची जाणीव झाली. त्याने चर्चच्या फादरला बोलावून आपला वारसनामा बनवला आणि अंत्यसंस्काराची सर्व माहिती दिली. शेवटी २ जुलै १५६६ रोजी त्याचं निधन झालं. तो गेला मात्र त्याने लिहिलेल्या गूढ कवितांमुळे आजही त्याच्या भविष्यवाण्यांचा संदर्भ वेगवेगळ्या घटनांमध्ये दिला जातो.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.