संजय राऊत ईडीच्या कोठडीत, आता शिवसेनेचा ‘आव्वाज’ मांडणार कोण..?

अरे आव्वाज कुणाचा… शिवसेनेचा! शिवसेनेच्या कुठल्याही सभेला, पत्रकार परिषदेला किंवा आंदोलनाला गेल्यावर ही घोषणा हमखास कानावर पडते.

सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या सभेनंतर दाक्षिणात्य लोकांच्या हॉटेल्सवर निघणारा आवाज, पुढं जाऊन सामनातून आणि रस्त्यावरच्या राड्यांमधून ऐकू येऊ लागला. टप्प्याटप्प्यानं राजकारण बदलत गेलं, शिवसेना काहीशी शांत झाली आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा हाच आव्वाज बनले, संजय राऊत.

२०१९ च्या निवडणुकीनंतर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजप युतीचं बिनसलं. महाविकास आघाडीच्या बांधणीबाबत हालचाली अजून सुरूही झाल्या नव्हत्या, मात्र रोज सकाळी संजय राऊत माध्यमांना एक गोष्ट ठामपणे सांगायचे, ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार.’ पुढं महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही त्यांची मोलाची भूमिका राहिली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.

संजय राऊतांचा शब्द खरा ठरला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही जेव्हा शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर अडचणी आल्या, तेव्हाही संजय राऊतांनीच खिंड लढवली. थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अंगावर घेणं असेल किंवा चौकशी सुरू असलेल्या मित्रपक्षातल्या नेत्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं असेल, राऊत मागे हटले नाहीत.

शिवसेनेत बंड झालं, ४० आमदार फुटले आणि या आमदारांनी बंडासाठी प्रामुख्यानं संजय राऊत यांनाच जबाबदार धरलं. तरीही या आमदारांविरोधात बोलत, पक्षाची भूमिका मांडत राऊतांनी शिवसेनेचा आवाज कायम ठेवला.

हे एवढं सांगण्याचं कारण म्हणजे, राऊतांचं बोलणं, भूमिका मांडणं अडचणीत असलेल्या शिवसेनेसाठी गरजेचं आहे. मात्र आता राऊत ईडीच्या अटकेत आहेत, ४ ऑगस्टपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक ज्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये आणि अनिल देशमुख ज्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये ईडीकडून अटक झाली, त्यांचं उदाहरण पाहिलं, तर राऊत लवकर सुटतील असा अंदाज बांधणं काहीसं कठीण आहे.

त्यामुळं आता शिवसेनेचा आवाज कोण असणार, याची जोरदार चर्चा रंगलीये.

संजय राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, शिवसेनेकडून मे २०२१ मध्ये प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती, तेव्हा त्यात राऊतांसोबत आणखीही काही नावं होती. मुख्य प्रवक्ते म्हणून संजय राऊतांसोबतच अरविंद सावंत आणि प्रियांका चतुर्वेदी यांची नियुक्ती झाली. तर अनिल परब, सचिन अहीर, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, अंबादास दानवे, भास्कर जाधव, किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे, शुभा राऊळ, शीतल म्हात्रे, संजना घाडी, आनंद दुबे यांचीही नावं या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये होती.

मुख्य प्रवक्ते ईडीच्या ताब्यात असल्यानं साहजिकच इतरांवरची जबाबदारी वाढणार आहे. टप्प्याटप्प्यानं पाहायचं झालं, तर लोकसभा खासदार अरविंद सावंत हे सातत्यानं पक्षाची भूमिका मांडत आहेत, मात्र राऊतांप्रमाणे फायरब्रॅन्ड नेते म्हणून सावंत यांची ओळख नाही. त्यामुळं ज्याप्रकारे राऊत सेना विरोधकांना अंगावर घेत होते, त्याप्रकारे परखड भूमिका घेण्याचं आव्हान सावंत यांच्यासमोर असेल.

इतर प्रवक्त्यांची यादी पाहिली प्रियांका चतुर्वेदी यांना येऊ शकणारा भाषेचा अडथळा, अनिल परब यांची सुरू असलेली ईडी चौकशी, काही प्रवक्त्यांची काही मतदारसंघांपुरती मर्यादा असे अनेक मुद्दे आहेत. त्यात प्रताप सरनाईक आणि शीतल म्हात्रे तर शिंदे गटात गेलेले आहेत, त्यामुळं ज्या पद्धतीनं राऊत शिवसेना विरोधकांना भिडत होते, ती रिकामी जागा कोण भरून काढणार, हा प्रश्न उपस्थित होतोय.

या चर्चेत पहिलं नाव येतं ते म्हणजे आमदार भास्कर जाधव.

भास्कर जाधव १९८४ पासून शिवसेनेत कार्यरत आहेत, मात्र २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले, पण २०१९ मध्ये ते पुन्हा शिवसेनेत आले. गुहागरमधून विधानसभेवर निवडूनही गेले. बंड झालं तेव्हा भास्कर जाधव उद्धव ठाकरेंसोबत ठाम उभे राहिले. 

विशेष म्हणजे राज्यात नव्या सरकारची बहुमत चाचणी होती, तेव्हा सभागृहात बोलताना भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदारांना चांगलंच धारेवर धरलं.

त्या भाषणात त्यांनी, ‘भाजपनं राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं ? भाजपचा २५ वर्षाचा इतिहास बघितला, तर शिवसेना संपवणं हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे.’ अशी थेट टीका केली होती.

जाधव यांच्यावर शिवसेनेची भूमिका मांडण्याची जबाबदारी येऊ शकते, याची मुख्य कारणं म्हणजे शिवसेनेतला संपर्क, आक्रमक भाषणशैली आणि प्रवक्तेपदाचा अनुभव. राष्ट्रवादीमध्ये असतानाही जाधव यांनी पक्षाचं प्रवक्तेपद सांभाळलं होतं. त्यामुळं पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी भास्कर जाधवांचा पर्याय शिवसेनेकडे आहे.

दुसऱ्या पर्यायाची चर्चा आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे.

राज्यात शिंदे गट-भाजपचं सरकार स्थापन झालं त्याच दरम्यान आदित्य यांनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रामुख्यानं बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाण्यावर भर दिला. अगदी सोमवारच्या सावंतवाडीच्या भाषणातही त्यांनी बंडखोर आमदारांना राजीनामे देऊन पुन्हा निवडून येण्याचं चॅलेंज दिलं. बंडखोर आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत, भाजपला फैलावर घेत आणि लोकांमध्ये मिसळत आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडत आहेत, त्यामुळं संजय राऊतांऐवजी शिवसेनेचा आवाज बनण्याची संधी आदित्य यांच्याकडे आहे.

यासोबतच एक नाव चर्चेत आहे ते खासदार विनायक राऊत यांचं

विनायक राऊत सेनेतल्या बंडानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या शेलक्या भाषेत संजय राऊत विरोधकांवर टीका करायचे तशाच प्रकारची टीका विनायक राऊतांनी शिंदे गटावर केली आहे. त्यांची काही वक्तव्य बघुयात…

एकनाथ शिंदेंना स्वतःच्या हातानं ट्विट करता येतं का ?
शिवसेनेचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही
राहुल शेवाळेंना आत्ता अक्कलदाढ यायला लागली आहे.

लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांना शिवसेना गटनेते म्हणून मान्यता दिल्यानंतर लोकसभेत शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठीही विनायक राऊत महत्त्वाचे आहेत.

सोबतच संजय राऊत यांच्याजागी पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडण्याचं काम उद्धव ठाकरेही करु शकतात. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेही आक्रमक झाले, त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप, शिंदे गट यांच्यावर सातत्यानं हल्ले केले.

संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर सोमवारी त्यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेतली. पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, संजय राऊत यांचा अभिमान असल्याचं सांगितलं. पक्षाला पुन्हा उभारी देण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे, अशावेळी स्वतःच पुढाकार घेऊन खिंड लढवण्याचा आणि शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा पर्याय उद्धव ठाकरे स्विकारू शकतात असं बोललं जातंय.

संजय राऊत यांनी बॅकफूटवर असलेल्या शिवसेनेला सत्तेत आणणं, सरकारमध्ये असताना विरोधकांना तोंड देणं आणि बंड झाल्यावरही कार्यकर्त्यांना ताकद देणं या सगळ्या गोष्टी राऊतांनी नेटानं केल्या. त्यामुळं आता राऊत ईडीच्या कोठडीत असताना शिवसेनेचा ‘आव्वाज’ कोण ठरणार ? आणि हा आवाज कुठवर घुमणार ? हे शिवसेनेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.