तुमचं ठरलं…!!! पण राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेता कोण होईल यावर खेळ कळणार आहे..

राज्यातल्या सत्तानाट्याला गुरुवारी दोन जबरदस्त वळणं मिळाली, एक म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या दोघांचा शपथविधी पार पडला असला, तरी मंत्रीमंडळ विस्तार आणखी बाकी आहे, त्यामुळं सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता अजूनही कायम आहे.

एकनाथ शिंदेंसोबत असलेलं शिवसेना आमदारांचं संख्याबळ पाहता राज्यात सर्वाधिक संख्याबळ असलेला विरोधी पक्ष अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस असेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्ष आणि विशेषतः विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना किती पछाडू शकतो, याचा अनुभव सगळ्या राज्यानं घेतला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांनी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच लक्ष्य केलं, मग ते नवाब मलिक असतील किंवा अनिल देशमुख. त्यामुळं हा सगळा बॅकलॉग भरुन काढण्यासोबतच बलाढ्य संख्याबळ असणाऱ्या भाजप आणि शिंदेगटाचा प्रबळ विरोध करण्यासाठी, आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कुणाला देणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीसमोर कोणते पर्याय आहेत, हे पाहुयात…

१) जयंत पाटील –

सध्या राष्ट्रवादीचे गटनेते असणाऱ्या जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीत जलसंपदा मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता जास्त असण्याचं कारण म्हणजे, समोरच्या बाजूला सत्तेत उपमुख्यमंत्री असणारे फडणवीस. फडणवीस हे अभ्यासू, आकडेवारीच्या साहाय्यानं मुद्दे मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. तसंच जयंत पाटीलही अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात.

अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायच्या आधी पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला मिळालेल्या निधीचे आकडेच वाचून दाखवत त्यांचे आरोप खोडून काढले होते.

शरद पवारांशी असलेली निष्ठा, पक्षातल्या सर्वांशी चांगले संबंध, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यासू फडणवीसांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देण्याची ताकद असल्यानं जयंत पाटील यांची निवड विरोधी पक्षनेतेपदासाठी होऊ शकते.

२) अजित पवार –

महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामाचा धडाका लावला होता. गेल्या अडीच वर्षात अजित पवार अनेकदा जागेवर निर्णय जाहीर करण्याच्या पद्धतीमुळं चर्चेत राहिले. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली, तर विरोधी पक्षनेते म्हणून जे निर्णय घ्यावे लागतात, तिथं असाच धडाका कायम ठेवण्याची अपेक्षा राष्ट्रवादीला त्यांच्याकडून असेल.

सभागृहात महत्त्वाचं ठरणारं भाषण कौशल्य अजित पवारांकडे आहे. त्यामुळं सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचं काम ते सहज करू शकतात. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असलेली पकड विरोधी पक्षनेते म्हणून फायद्याची ठरली होती. अजित पवारही उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात, त्यामुळं तेही प्रशासनावर असलेल्या पकडीचा फायदा करुन घेऊ शकतील.

आक्रमक नेतृत्व, हाताशी असलेला अनुभव, लोकांमध्ये असलेली कार्यक्षम प्रतिमा आणि प्रशासनावर असलेल्या पकडीमुळं अजित पवारांना राष्ट्रवादीकडून संधी मिळू शकते.

३) छगन भुजबळ –

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणाऱ्या भुजबळांनी अनेकदा सभागृह दणाणून सोडलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना सोडल्यापासून ते शरद पवारांचे निकटवर्तिय बनले. पवारांनी राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडल्यानंतर ते पवारांसोबत आले. यानंतर जेव्हा भुजबळांकडे विरोधी पक्षनेतेपद आलं, तेव्हा त्यांनी रमेश किणी प्रकरणावर जोर देत राज ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेला बॅकफूटवर ढकललं. भुजबळांकडे मंत्रीपदाचाही प्रदीर्घ अनुभव आहे.

गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याची हिंमत भुजबळांनी दाखवली होती. त्यामुळं त्यांच्या धाडसीपणाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. सोबतच भाजप आणि शिंदेगटाकडून प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली जाईल, त्याचा सामना करण्यासाठी ओबीसी नेते आणि महात्मा फुलेंच्या विचारांचा पुरस्कार करणारे छगन भुजबळ राष्ट्रवादीला सभागृहात अप्पर हँड मिळवून देऊ शकतात. त्यामुळेच पक्षाचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या भुजबळांना संधी दिली जाऊ शकते, असं बोललं जातंय.

४) दिलीप वळसे पाटील –

या चर्चेत असणारं आणखी एक ज्येष्ठ नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील. शरद पवारांचे पीए म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे वळसे पाटील पवारांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर, गृहमंत्रीपदासाठी अजित पवार, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे अशी नावं चर्चेत होती; मात्र शरद पवारांनी सूचकपणे वळसे पाटलांची निवड केली. १९९० पासून सभागृहातल्या कामकाजाचा अनुभव, ज्येष्ठता आणि संयमी स्वभावामुळं वळसे पाटलांना ही जबाबदारी मिळण्याची शक्यता वाढते.

५) जितेंद्र आव्हाड –

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या पिढीतले नेते म्हणून आव्हाड यांचं नाव कायम अग्रक्रमावर असतं. महाविकास आघाडीला धोबीपछाड देऊन सरकार स्थापन केल्यानंतर फडणवीस आणि भाजप आक्रमक असतील यात शंका नाहीये, त्यामुळं त्यांना त्यांच्याच आक्रमक शैलीत उत्तर देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना पसंती दिली जाऊ शकते. पुरोगामी नेतृत्व म्हणून आव्हाड भाजपच्या हिंदुत्वाला चांगल्याप्रकारे सामोरे जाऊ शकतात. त्यामुळं आव्हाडांना ताकद देणं हे राष्ट्र्वादीसाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही फायद्याचं ठरू शकतं.

६) राजेश टोपे –

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ज्या मंत्र्यांनी आपली छाप पाडली, त्यात अग्रक्रमानं नाव येतं ते म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं. कोविडसारखं मोठं संकट असताना, राज्यातली कोविड रुग्णांची संख्या उसळलेली असताना टोपे यांनी अत्यंत संयमानं परिस्थिती हाताळली. आपली आई आजारी असताना त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं आणि टोपेंना सहानुभूतीही मिळाली. राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीच्या काळात कसं काम केलं, याचं पर्सेप्शन त्यांना टोपेंच्या माध्यमातून मांडता येईल.

त्यांची काम करण्याची पद्धत पाहता, टोपेंना पक्षांतर्गत विरोधही कमी आहे. त्यामुळं ज्येष्ठ नेत्यांऐवजी दुसऱ्या पिढीतल्या टोपेंना संधी दिली जाऊ शकते असंही सांगण्यात येतंय.

आता ही सहा नावं म्हणजे चर्चेतून आलेले अंदाज आहेत, पण शरद पवार ही निवड अगदी विचारपूर्वक करतील यात शंका नाही. कारण असं म्हणतात, पवार पराभव विसरत नाहीत आणि या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्यासाठी विरोधी पक्षनेता प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.