तर या १० नेत्यांपैकी एकजण मनसेचा पहिला मंत्री होईल..!!!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. मंत्रीमंडळाची विस्तार अद्याप झालेला नाही. त्यात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत व बहुमत ठरावावेळी भाजप-शिंदे गटाकडे आपलं मत दिलं होतं. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी मात्र मनसे तटस्थ राहिली होती.

त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी अमित ठाकरेंची मंत्रीमंडळात वर्णी लागेल अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण खुद्द राज ठाकरेंनीच स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मनसेचा कोणी एक नेता मंत्री होईल व भाजपच्या कोट्यातून एकास विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेण्यात येईल असा अंदाज बांधण्यात येवू लागला..

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाल्याने, मनसे ला पहिल्यांदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

साहजिक मनसेला मंत्रीपद मिळालं तर या यादित कोणत्या नेत्यांची नावे असतील हे पाहणं देखील गरजेचं आहे..

तर या यादीत पहिलं नाव असेल तर मनसेचे आमदार राजू पाटील यांच.. 

१) राजू पाटील..

मनसेकडून मंत्रीपद स्वीकारण्यात आलं तर राजू पाटील यांच नाव अग्रकमावर येतं. कारण ते मनसेचे एकमेव विधानसभेतले आमदार आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १०० हुन अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते मात्र त्यातून फक्त मनसेचे एकमेव उमेदवार निवडून आले ते म्हणजे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील. 

राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा ७ जाहीर मतांनी पराभव केला होता.

कोरोनाकाळात मनसे रस्त्यावर उतरून कामं करीत होती याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजू पाटील. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत  स्वतःचं खाजगी आर. आर. हे खाजगी हॉस्पिटल महापालिकेच्या हवाली केलं होतं. त्यामुळे त्यांची प्रतिमा मनसेसाठी चांगली पोषक ठरणारी आहे.. 

सोबत दि.बा. पाटील यांच नाव नवी मुंबई विमातळाला देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकांमध्ये आगरी समाजाची भूमिका मनसेसाठी आवश्यक असणार आहे. आगरी-कोळी हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार असला तरी नामांतरावरून हा मतदार सेनेकडून दुरावला आहे.

दूसरीकडे राजू पाटील यांच्या रुपात आगरी-कोळी समाजाचं मिळणारं पाठबळ एकनाथ शिंदे यांच्या साठी देखील पूरक ठरू शकतं म्हणूनच राजू पाटील यांच नाव अग्रक्रमावर असेल.

त्यानंतर नाव येईल ते मनसे नेते, बाळा नांदगावकर यांच 

२) बाळा नांदगावकर

राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडणारा नेता म्हणजे बाळा नांदगावकर. प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांच्या सोबत ते सावली बनून राहतात. आज झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान देखील बाळा नांदगावकर उपस्थित होते. 

राज ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतले म्हणून बाळा नांदगावकर यांच्या शब्दाला पक्षात खूप मान आहे. राज्यात मनसेचं वारं असताना निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये बाळा नांदगावकर यांचाही समावेश होता. 

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेला किंगमेकर नव्हे तर किंग व्हायचंय, अशी भूमिका नांदगावकर ठेवून आहे त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. 

मनसेच्या शॅडो कॅबिनेट मध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं.

३) नितीन सरदेसाई

मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई राज ठाकरेंचे कॉलेजपासूनचे मित्र. राज ठाकरे यांच्यासोबत ते “मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर” नावाच्या रिअल इस्टेट एजन्सीमध्ये पार्टनर आहेत.  २००६ मध्ये मनसेच्या स्थापनेनंतर, पक्षाने २००९ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात सरदेसाई देखील होते. ते मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडून आले होते. 

त्यांच्याकडे सेनेचं सरचिटणीस पद होतं, तसेच ते पक्षाचे मुख्य समन्वयक आहेत आणि सेनेची वाहतूक क्षेत्रातील कामगार संघटना जी हवाई सेवा कर्मचार्‍यांसाठी काम करते त्याचे नितीन सरदेसाई हे अध्यक्ष आहेत. 

२००८ मध्ये जेट एअरवेजने जवळपास २ हजारहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते, तेंव्हा सरदेसाई यांच्या नेतृत्वात मनसेच्या खळ्ळखट्याक आंदोलनामुळे त्या हजारो कर्मचाऱ्यांना  परत घेण्यात आले होतं आणि हे आंदोलन मनसेचं मोठं यश मानलं जातं. 

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये नितीन सरदेसाई यांना वित्त आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं होतं.

४) अनिल शिदोरे

मनसेचे नेते व प्रवक्ते म्हणजेच अनिल शिदोरे. पक्षाच्या शॅडो कॅबिनेटमध्ये शिदोरे यांना मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान हे खातं देण्यात आलं होतं. सोशल मीडियावर सक्रिय असणारे आणि अभ्यासू नेते म्हणून शिदोरे हे अग्रस्थानी असतात. असं सांगितलं जातं कि राज ठाकरेंच्या भाषणांवर, त्यांच्या वक्तव्यांवर, प्रतिक्रियांवर अनिल शिदोरे यांचं विशेष लक्ष असतं. 

२००८ साली राज ठाकरेंनी ब्लू प्रिन्टची घोषणा केली. या ब्लू प्रिन्टमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक विभागाची माहिती आहे. इतिहास आणि भविष्य याची मांडणी आहे. ही ब्लू प्रिन्ट २०१४ साली जाहीर करण्यात आली होती. अनिल शिदोरे यांच्याच नेतृत्वाखाली मनसेची ब्ल्यू प्रिन्ट तयार झाली होती.

५) मनसेची आणखी एक धडाडीचे नेते म्हणजे संदीप देशपांडे

संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते आहेत. माध्यमांमध्ये मनसेचे कायम बाजू लावून धरणारे, पक्षाचा एक सक्षम सक्रिय नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीचे कडवे टीकाकार म्हणून संदीप देशपांडे यांचं नाव कायमच पुढे असतं. त्यांनी अनेक मनसे स्टाईल आदोलनं गाजवली आहेत.

२०१७ मध्ये काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडे यांना आर्थर रोड कारागृहात ४ दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला.

२०१९ मध्ये जेंव्हा राज ठाकरे यांना कोहिनूर मिलप्रकरणी ईडी चौकशीला सामोरं जावं लागलं होतं तेंव्हा मनसैनिक आक्रमक झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी देशपांडे यांच्या नेतृत्वात EDiot Hitler’ (इडियट हिटलर) असा उल्लेख असलेला टी शर्ट परिधान करून निषेध व्यक्त केला होता. तेंव्हा देखील पोलिसांनी देशपांडे यांना ताब्यात घेतलं होतं.

ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांच्यासोबत मुंबईत मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला मनसेने मारहाण केली होती. या घटनेच्या निमित्ताने मराठीच्या मुद्द्यावरून मनसे मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली होती आणि त्यात संदीप देशपांडे यांचा पुढाकार होता..

६) अभिजीत पानसे

मनसे नेते अभिजित पानसे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय त्यांची ओळख म्हणजे अभिजित पानसे हे एक भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, जे प्रामुख्याने मराठी चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. 

२०१९ मध्ये अभिजित पानसे दिग्दर्शित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा बायोपिक आला. ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती. 

६) अविनाश जाधव

मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव. मनसेतील सक्रिय नेत्यांपैकी एक. अविनाश जाधव यांच्यावर अनेक राजकीय गुन्हे दाखल आहेत.  

करोनाच्या काळात ठाणे महापालिकेने काही परिचारिकांना नियुक्त केले होते. त्यानंतर ठेकेदाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्याविरोधात अविनाश जाधवमहापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयासमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांना पोलीस कोठडी सुनावली होती..त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. 

८) अमेय खोपकर

अमेय खोपकर हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत….याशिवाय ते मनसेत बरेच ऍक्टिव्ह असतात. अमेय खोपकर मनसेचे उपाध्यक्ष असून मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे ते अध्यक्ष आहेत. पक्षाने त्यांना सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार खात्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली.  आतापर्यंत त्यांनी मराठी सिनेमासृष्टीसाठी बरंच काम केलं आहे. 

त्यातीलच एक महत्त्वाच्या कामाचा उल्लेख म्हणजे त्यांनी मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्स मध्ये prime time show मिळायला हवा यासाठी आंदोलन केलं. 

९) अविनाश अभ्यंकर

मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणजे अविनाश अभ्यंकर. त्यांच्यावर पक्षाने आगामी मनगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबईची जबाबदारी दिली आहे. मनसेच्या शॅडो कॅबिनेट मध्ये अभ्यंकर यांना महसूल आणि परिवहन खातं देण्यात आलं आहे. त्यांनी एसटी युनियन, बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. 

१० ) प्रकाश महाजन 

मनसेतील आणखी एक महत्वाचे नेते म्हणजे मनसेचे राज्य राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन. याशिवाय त्यांची ओळख म्हणजे ते प्रमोद महाजन यांचे बंधू तर  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ते मामा आहेत.

 प्रकाश महाजन यांना २००९ मध्ये मनसेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र २०११ मध्ये शिवसेना सोडली आणि पुन्हा मनसेतच परत आले.  

“ठाकरे नावात काय जादू असते हे मला कळले आहे. राज ठाकरे हेच हिंदू जननायक आहेत. मी अमित ठाकरे यांच्या मुलांच्या हाताखाली देखील काम करायला तयार आहे”,असं विधान महाजन यांनी अलीकडेच केलं होतं..म्हणूनच ते स्वतःला राजसाहेबांच्या कट्टर सैनिक म्हणवतात.  

तर हे मनसेतील पहिल्या फळीतील १० महत्वाचे नेते आहेत.. मनसेला जर शिंदे-फडणवीस गटात मंत्रीपद मिळालं तर या दहानेत्यापैकी एकजण निश्चितच मंत्री होवू शकतो. विधानसभेचे आमदार राजू पाटील सोडले तर इतर ९ नेत्यापैकी कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली तर सोबतच विधानपरिषदेच्या आमदारकीची संधी देखील ओघाने येईलच.. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.