दोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार ?

देशभरात गाजलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येतायेत. सध्याचं  चित्र बघितलं तर गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे घौडदौड सुरू आहे. १८२ पैकी दीडशेपेक्षा जास्त जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर आपकडे ६ आणि काँग्रेसकडे २० जागांची आघाडी आहे. थोडक्यात गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार हे जवळपास नक्की झालंय.

जसं भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचतंय तशी आणखी एका विषयाची चर्चा होतीये ते म्हणजे मुख्यमंत्रीपदी कोण ?

आतापर्यंतच्या बहुतांश निवडणुकांमध्ये भाजप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करत नाही, पण गुजरातमध्ये सलग सातव्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपनं निवडणुका होण्याआधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला होता.

जर भाजप पुन्हा सत्तेत आलं तर सध्या मुख्यमंत्रीपदी असलेले भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती.

आता भूपेंद्र पटेल यांना निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. विजय रुपानी यांना हटवून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. अमित शहा यांनी भाजप विधानसभा निवडणूका भूपेंद्र पटेल यांच्याच नेतृत्वात लढवेल असं स्पष्ट सांगितलंही होतं.

विजय रुपानी यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याच्या जागी भूपेंद्र पटेल यांना संधी देण्यात आली, आपला पायंडा मोडत निवडणुकीआधीच भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेच असतील, हे सुद्धा जाहीर केलं.

त्यामुळं साहजिकच प्रश्न पडतो की भूपेंद्र पटेल भाजपसाठी एवढे महत्त्वाचे का आहेत ?

तर याचं उत्तर सापडतं, पाटीदार आंदोलनात. २०१५ मध्ये गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे भाजपला नागरी आणि पंचायत निवडणुकीत प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. यानंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही याच आंदोलनामुळे भाजपला बॅकफूटवर जावं लागलं आणि २०१२ मध्ये ११५ जागा जिंकणाऱ्या भाजपला फक्त ९९ जागाच मिळाल्या. हेच नुकसान २०२२ च्या विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोसावं लागू नये म्हणून भाजपनं सावध पावलं उचलली आणि निवडणुकांच्या तोंडावर पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री केला.

गुजरात जिंकल्यानंतर भाजपचं पुढचं लक्ष्य २०२४ च्या लोकसभा निवडणूका जिंकून सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणं हेच असेल. त्यामुळं पाटीदार समाजाचं गुजरातमधलं पाठबळ महत्त्वाचं ठरणार आहे. साहजिकच त्यासाठी पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री असणं हाच भाजपचा प्लॅन असेल.

त्यात या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस सोबतच आम आदमी पक्षानंही आव्हान उभं केलं होतं, मात्र असं असलं तरी भाजपनं ९९ वरुन तब्बल १५० प्लस जागांवर झेप घेतली आहे. साहजिकच ५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.

या यशामुळे भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदाची दावेदारी आणखी प्रबळ झाली आहे.

पण भाजपनं ज्या पद्धतीनं रुपानी यांना हटवलं, नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असताना त्यांना साईडलाईन करुन भूपेंद्र पटेल यांना पुढं आणलं ते पाहता भाजपनं धक्कातंत्राच्या शक्यता कायम ठेवल्या आहेतच.

जर भूपेंद्र पटेल यांना ऑप्शन तयार करायचा असेल, तर कुठली नावं पुढं येतात ते पाहुयात –

पहिलं नाव येतं, खासदार चंद्रकांत पाटील यांचं.

सी. आर. पाटील या नावानं गुजरातच्या राजकीय वर्तुळात फेमस असलेले खासदार चंद्रकांत पाटील, मोदी आणि अमित शहा या दोघांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. मोदींच्या विकासकामांचा प्रचार करणं, सुरतसारखं शहर घडवणं यात चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं.

महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं, तेव्हा एकनाथ शिंदे आपल्यासोबतच्या आमदारांसह गुजरातला गेले होते, तेव्हा ही सगळी कामगिरी चंद्रकांत पाटील यांनीच पार पाडल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघातल्या विजयातही समन्वयक म्हणून पाटील यांच्यावरच जबाबदारी होती.

त्यांचं मताधिक्य बघायचं म्हणलं तर, त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराला ६.८९ लाखांच्या फरकानं पराभूत केलं होतं. मोदी लाट असताना चंद्रकांत पाटील यांना जितकी मतं मिळाली होती, तितकी खुद्द मोदींनाही मिळाली नव्हती. 

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास, वेळोवेळी सिद्ध केलेली ताकद आणि सोबतच प्रदेशाध्यक्ष म्हणून २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी असताना पक्षाला १५० पार जागा मिळवून देण्यात मिळालेलं यश, या सगळ्या गोष्टी बघता सी. आर. पाटील हे भूपेंद्र पटेल यांना पर्याय म्हणून हमखास पुढं येऊ शकतात.

दुसरं नाव येतं हार्दिक पटेल यांचं,

पाटीदार समाजाचे नेते म्हणून हार्दिक पटेल लोकप्रिय आहेत. जर भूपेंद्र पटेल यांच्या ऐवजी पाटीदार समाजातून दुसरा चेहरा पुढं आणायचा असेल, तर हार्दिक हे पर्याय ठरु शकतात. अगदी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाले तेव्हाही ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांचं नाव चर्चेत होतंच. पण या निवडणुकीत नितीन पटेल यांना तिकीटच देण्यात आलं नाही, त्यामुळं हार्दिक पटेल यांची दावेदारी मजबूत होते.

पण फक्त हेच एकमेव कारण नाही, तर पाटीदार समाजाचा पाठिंबा, आंदोलनामुळं दुरावलेला पारंपारिक पाटीदार मतदार, तरुण नेतृत्व या सगळ्या गोष्टींसाठी हार्दिक पटेल भाजपला फायद्याचे ठरतील. असं असलं तरी भाजपच्या जुन्या नेत्यांना डावलून हार्दिक पटेलांना संधी देण्याचा धाडसी निर्णय भाजप घेईल अशी शक्यता कमी असल्याचंही बोललं जातंय.

त्यामुळं आधी घेतलेल्या भूमिकेप्रमाणं भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदी कायम असणार की भाजप एखादं सरप्राईज देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.